कराचीत शिक्षक ते भारताचे उपपंतप्रधान...

03 Feb 2024 18:23:49
नवी दिल्ली, 
LK Advani Political Career : लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म सध्या पाकिस्तानचा भाग असलेल्या कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. त्यांनी सुरुवातीला कराचीत शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आणि नंतर भारताचे उपपंतप्रधानपदही भूषवले. त्यांची राजकीय कारकीर्द प्रदीर्घ राहिली आहे.
 
l.k  
 
 
हिंदुस्थानची फाळणी करणे ही ब्रिटिशांची चूक होती. तर आणिबाणी स्वदेशी सत्ताधार्‍यांची चूक आहे, असे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या नेतृत्त्वाला लालकृष्ण अडवाणी यांनी ठणकावले होते. राष्ट्र प्रथम, पक्ष नंतर आणि स्व: सर्वांत अखेर, हे तत्त्व पाळत राजकारणात आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेपेक्षा देशहित आणि पक्षाला प्राधान्य देणारे नेते अशी त्यांची देशभरात ओळख आहे. 1990 च्या दशकात अयोध्येतील राम मंदिरासाठी त्यांनी काढलेली रथयात्रा हा जगभरात चर्चेचा विषय ठरला होता.
 
 
कराचीत जन्म
 
अडवाणी यांचा जन्म कराची येथे 8 नोव्हेंबर 1927 रोजी एका हिंदू सिंधी कुटुंबात झाला. त्यांचे वडील किशनचंद अडवाणी उद्योजक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण कराचीतील सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांनी डीजी नॅशनल स्कूल, हैदराबाद, सिंधमध्ये प्रवेश घेतला. कराचीतील मॉडल हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले.
 
 
तारुण्यात फाळणीची झळ
 
ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली. अडवाणी कुटुंब पाकिस्तान सोडून मुंबईत आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. 1970 मध्ये ते राज्यसभेचे सदस्य झाले. 1980 मध्ये भाजपाची स्थापना झाली. पक्षाच्या स्थापनेपासून देशभरात पक्ष रुजविण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. यानंतर त्यांनी राजस्थानमध्ये रा. स्व. संघाच्या प्रचारक कार्यात अनेक वर्षे योगदान दिले. भाजपाच्या पायाभरणी करणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
 
1980 मध्ये भाजपाला लोकसभेच्या दोन जागांवर विजय मिळवला. यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत 1980 ते 1990 या दहा वर्षांमध्ये भाजपाला राष्ट्रीय पातळीवरील पक्ष म्हणून ओळख निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यामुळेच दोन जागांवरून भाजपाने पुढील निवडणुकीत 86 जागा मिळाल्या. 1992 मध्ये 121 आणि 1996 मध्ये 161 जागांपर्यंत भाजपाने झेप घेतली. काँग्रेसनंतर भाजपा हा सर्वाधिक खासदार असणारा पक्ष ठरला. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या कालावधीत अडवाणी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवले.
 
राजकीय यात्रा आणि अडवाणी
 
विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिर बांधण्यासाठी चळवळ सुरू केली. दुसरीकडे 1990 च्या दशकात अडवाणींच्या नेतृत्वाखाली भाजपा राम मंदिर आंदोलनाचा चेहरा बनला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 25 सप्टेंबर 1990 रोजी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ येथून राम रथयात्रेला सुरुवात केली होती. अडवाणी यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक रथयात्रा काढल्या. यात जनादेश यात्रा, सुवर्ण जयंती रथयात्रा, भारत उदय यात्रा, भारत सुरक्षा यात्रा आणि जनचेतना यात्रा आदींचा समावेश आहे.
 
चॉकलेट, चित्रपट आणि क्रिकेटचे चाहते
 
लालकृष्ण अडवाणी राजकारणात रमले असले, तरी त्यांना चॉकलेट, चित्रपट आणि कि‘केट याची विलक्षण आवड आहे. विशेष म्हणजे, ते चित्रपट समीक्षकही राहिले आहेत.
 
वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान
 
लालकृष्ण अडवाणी यांनी 2002 ते 2004 दरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधानपद भूषवले होते. याआधी ते 1998 ते 2004 दरम्यान भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री होते. दहाव्या आणि चौदाव्या लोकसभेच्या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवले. 2015 मध्ये त्यांना देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांनी आपला जीवनप्रवास ‘प्रवास माय कंट्री, माय लाईफ’ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे.
 
गडकरी यांची प्रतिक्रिया 
‘‘देशातील सर्वांत ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत सुखद आणि आनंददायी आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्बांधणीत अडवाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अडवाणी हे राजकारणातील शुद्धतेचे जिवंत उदाहरण आहेत. अडवाणी यांना भारतरत्न घोषित केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि अडवाणींच्या आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो.’’
नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
Powered By Sangraha 9.0