करावी ते पूजा मनें चि उत्तम। लौकिकाचें काम काय असे॥

    दिनांक :04-Feb-2024
Total Views |
तुका आकाशाएवढा
Saint Tukaram Maharaj : कुठलेही कार्य चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याच्या हेतूने करीत असताना त्या संदर्भातील कोणती काळजी घ्यावी तसेच त्या कार्यावर आपला विश्वास असेल व ते काम श्रद्धापूर्वक करीत असाल तर त्या बाबतीत विनाकारण इतरांना दिसण्यासाठी कुठलाही दिखावा करण्यात काहीच अर्थ नाही. जे काही काम करायचं असेल ते पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने मन:पूर्वक करावे. तेव्हा मनातील सत्यता त्यामध्ये उतरत असते. असे जे कार्य पार पाडले जाते त्यालाच त्या कार्याचे खरे पूजन, असे म्हटले जाईल. पूजा म्हणजे त्या कार्याविषयीची असलेली निष्ठा. म्हणूनच निष्ठापूर्वक काम करीत असताना आपला त्या प्रती प्रामाणिक भाव असणे महत्त्वाचे असून आपलं मन तेवढंच प्रामाणिकपणे आपल्या ताब्यात ठेवून प्रसन्नतेने कार्य केल्यास त्या कार्याप्रती असलेली खरी पूजा ठरते. म्हणूनच पवित्र कार्याकरिता मन शुद्ध असावं लागतं; केवळ दिखावा नको. मनात वेगळे व कार्य वेगळे असे असल्यास मन समाधानी राहत नाही.
 
 
sant-tukaram
 
पूज्य भाव ठेवणे म्हणजे काय तर त्या संदर्भातील आपल्यात असलेला स्नेह, जिव्हाळा प्रामाणिक असणे जरूरीचे आहे. त्यासाठी आपलं मन संतुलित ठेवणं तेवढंच महत्त्वाचं ठरतं. मनात असेल तर होईल अन्यथा अपाय पदरी पडेल. म्हणून पूजा करतेवेळी मन महत्त्वाचं आहे. पांडुरंगाची भक्ती मनोभावेच केली गेली पाहिजे. मनोभावे पूज्य भाव ठेवल्यास ते पूर्ण होऊ शकते व आपल्याला अपेक्षित ठिकाणापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा होता. जसे स्पर्धेच्या युगात आपणास पुढे जायचे असेल तर भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आळस सोडून द्यावा लागेल. सन्मार्गाने या मिळविण्याकरिता समोर आलेल्या अनेक अडचणींशी सामना करावा लागेल. कामात सातत्य ठेवावे लागेल तरच कुठे मनासारखे या प्राप्त होऊ शकते. आज आपण पाहतो की, अनेक लोक कार्य करताना अपयशी ठरतात. वास्तविक परीक्षा एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच मार्गदर्शनाखाली झालेली असताना काही यशस्वी तर काही अयशस्वी ठरताना दिसतात. असे का होते तर अपयशी ठरणारे केवळ करायचे म्हणून करतात. त्यांचं मन त्यामध्ये नसते; ते कुठेतरी इतरत्र असते. ते कार्य करण्याचा केवळ दिखावाच करतात. मग ते ध्येयापर्यंत तरी कसे पोहोचणार? म्हणूनच कुठलीही पूजा करीत असताना आपलं मन शुद्ध ठेवल्यास कार्य उत्तमरीतीने पार पाडता येते. ईश्वर प्राप्तीकरिता आपण करीत असलेल्या पूजेवर तेवढीच भक्तिपूर्वक श्रद्धा ठेवून व मन प्रसन्न ठेवून मनोभावे पूजन केल्यास त्याला इतर दिखावूपणाची काही गरज नाही. ते मनाला सर्व कळत असते. म्हणूनच जीवनात आनंद मिळवावयाचा असेल तर मन प्रसन्न ठेवून कार्य करावे. मनापासून त्याची पूजा केल्यास त्याला लौकिक व्यवहारात केल्या जाणार्‍या गोष्टींची काय आवश्यकता आहे? ही बाब अधिक स्पष्ट करून सांगताना Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून मांडतात की,
 
करावी ते पूजा मनें चि उत्तम।
लौकिकाचें काम काय असे॥
कळावें तयासि कळे अंतरीचें।
कारण तें साचें साच अंगीं॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात।
फळ देते चित्त बीजा ऐसें॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान।
ऐसें तें भजन पार पावी॥
अ. क्र. 46
Saint Tukaram Maharaj : खरं तर मनोभावे पूजा करीत असताना त्याला सांगण्याची काही गरज नसते. त्याला सर्व कळते. आपल्या मनातलं. म्हणूनच मन हे महत्त्वाचं ठरतं. कारण मनातून एखादं काम करायचं नसेल तर ते शेवटापर्यंत जातच नाही. गेलं तरी त्या कामामधून काही निष्पन्न निघत नाही. वेळ, पैसा, सर्व व्यर्थ ठरते. जसे एखाद्या विद्यार्थ्याला मनापासून शिकायचं नसेल तर तो अनेक कारणं काढून त्यापासून दूर जातो. वेळेचं नियोजन तो करू शकत नाही. केवळ करायचं म्हणून करीत असतो. तो उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यालाच आपण दुसर्‍या शब्दात पालथ्या घड्यावर पाणी टाकणे असे म्हणतो. म्हणूनच मनापासून त्या कामाची आवड असायला पाहिजे तरच तो त्या कामाप्रती निष्ठा ठेवू शकतो. अन्यथा ते कार्य अपयशी ठरते. हे कार्य करणार्‍याच्या मनावर अवलंबून असते. मनोधर्म खूप महत्त्वाचा आहे. मनामध्ये असते तेच पुढे येते. तेच सत्य असते. म्हणूनच असत्याला थारा नसतो. मनापासून जे कार्य केले तेव्हाच अंत:करणापर्यंत पोहोचते. असे कार्य मग आदराचे, प्रेमाचे, जिव्हाळ्याचे होऊन जाते. फसवून कार्य केल्यास व त्यामध्ये फायदाही झाला तरी मनास मात्र ते पटत नाही. त्याचे परिणाम त्याला भोगून द्यावेच लागतात. त्यामधून त्याची सुटका नाही. आपले कर्म हे बीजाप्रमाणे असतात. जसे केले तसे ते भोगावेच लागतात. कारण ते सत्य लपत नाही. जसे पेराल तसेच ते उगवते. मधुर, रसाळ आंब्याची बीज म्हणजेच कोय लावल्यास त्याची मधुर, रसाळ फळे चाखावयास नक्कीच मिळतील. परंतु बाभळीचे बीज लावल्यास पुढे काटेच म्हणजे दु:खच पदरी पडेल.
 
 
आज आपण पाहतो की, काही लोक आयुष्यभर भ्रष्टाचार करताना दिसतात. परंतु त्यांचा शेवट मात्र खूप हलाखीचा नजरेस पडतो. त्यांना मुलांपासून, नातेवाईकांपासून, समाजापासून सुख मिळतच नाही. कारण बीज त्याने बाभळीचे लावून आयुष्यभर त्याचेच संगोपन केले; त्याचे हे परिणाम असून दु:खाशिवाय त्याच्या काहीच पदरी पडत नाही. हे त्याच्या कर्माचे फळ समजावे. समाधानानं जगण्याकरिता सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे आपलं मन. मन समाधानी असेल तर हाती आलेलं कार्य चांगलं करू शकतो. अहितकारक होईल असं कधीही करू नये. मन समाधानी नसेल तर चांगलंही काम योग्यरीतीने करू शकणार नाही. अती लोभ किंवा अती अहितकारक वागणं त्रासदायक ठरू शकते. म्हणून जीवनात आनंद मिळवावयाचा असेल तर आपलं मन उत्तम ठेवावं लागेल.
 
 
वाईट काम करताना अपेक्षित लाभ जरी मिळत असला, तरी तो काही कामाचा नसतो. कारण तो मनाला मान्य नसतो. तो मनाविरुद्ध असतो. मिळणारा आनंद हा खरा आनंद नसून तो आसुरी आनंद असतो. अशा या आसुरी आनंदानं आतापर्यंत तरी कुणीच सुखी समाधानी झालेलं कुणी पाहिलं नाही, हे सत्य त्याने जाणले पाहिजे. म्हणून चांगल्या मनानं चांगलं काम करावं. आयुष्यात जेवढं जे जे उत्कृष्ट कार्य करता यईल तेवढं करण्याचा प्रामाणिक व निष्ठापूर्वक प्रयत्न करावा. कारण त्या कार्यापासून जीवनात जो आनंद मिळवता येईल तेवढा मिळवावा आणि हा आनंद दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणून आयुष्यभर माणूस सुखी व समाधानी राहून चांगल्या पद्धतीनं जीवन जगताना त्याला त्रास म्हणजेच दु:खाला सामोरे न जाता सर्वांपासूनच सुख मिळू शकते. कारण त्याने पेरलेले बीज हे त्याने केलेल्या कामाच्या निष्ठेचे असते. म्हणून त्याची अवहेलना कुणीही करू शकत नाही. जे पेराल तेच उगवते; विनाकारण दोष देऊ नये. आत्मपरीक्षण करावे. म्हणून आपले कार्य श्रद्धा व भक्तिपूर्वक केल्यास तीच खरी पूजा ठरेल की; ज्यामुळे आपले जीवन उजळून निघेल. या अभंगाच्या माध्यमातून Saint Tukaram Maharaj संत तुकाराम महाराजांनी अत्यंत समर्थ असा वैचारिक अनुभव व्यक्त होताना दिसतो. त्यामागे त्यांची जीवनविषयक अनुभव व चिंतन दिसून येते.
 
- प्रा. मधुकर वडोदे
- 9422200007