फाल्गुन मासातही गर्द केशरी "पळसा"चा उत्साह कायम

बहरलेल्या पळसाने वनांच्या सौंदर्यात भर

    दिनांक :15-Mar-2024
Total Views |
भंडारा,
Phalgun Mass : होळी, रंगपंचमीची चाहूल लागताना वातावरणात येणारा शुष्कपणा प्रत्येकाच्या उत्साह कमी करणारा असाच असतो. म्हणूनच तर आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास अशी म्हणून आमच्याकडे प्रचलित आहे. परंतु याच फाल्गुन मासात जंगलात बहरलेला पळस रखरखत्या उन्हातही माणसाचे मन प्रफुल्लित करून जातो. आज जिल्ह्यातील जंगलांमध्ये गर्द केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेला पळस उन्हाच्या चटक्यांमध्येही शितलता अनुभवास देणारे आहे.
 
 
PALASA
 
फाल्गुन महिन्याची सुरुवात झाली की वातावरण बदलू लागते. तापणारे ऊन, घामाच्या धारा आणि होणारी चिडचिड उत्साहाचा हिरमोड करणारी असते. म्हणूनच आमच्याकडे फाल्गुन मास काहीसा बदनाम झाला आहे. ज्याला आधीच कामे करण्याचा कंटाळा येतो, त्याला फाल्गुन मासाचे निमित्य मिळाल्याने त्यात भर पडते आणि म्हणूनच आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास असे उपवासाने म्हटले जाते. ही म्हण जरी प्रचलित असली तरी याच फाल्गुन मासात तेवढ्याच उत्साहाने रणरणत्या उन्हात दिमाखात डोलणाऱ्या पळसाच्या फुलांनी उत्साह अजूनही कायम असल्याचे सांगून टाकले आहे. आज भंडारा जिल्ह्यातील जंगलांमध्ये गर्द केशरी रंगांची पळसाची फुले अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. एकीकडे ऊन तापत असले तरी दुसरीकडे मात्र या गर्द केशरी रंगाच्या फुलांची शीतलता मनाला मोहून टाकत आहे.
 
फाल्गुन महिन्यात होळी आणि रंगपंचमीचे महत्त्व आहे. प्रत्येक जण या सणाची वाट पाहत असतो. धुळवडीची चाहूल देणारा म्हणूनही या पळसाकडे पाहिले जाते. कधीकाळी या पळसांच्या फुलाचा रंग धुळवडीत महत्त्वाची भूमिका बजावायचा. पण आज कृत्रिम रंगांच्या गर्दीत तो दिसेनासा झाला आहे. रंग म्हणून धुळवडीत दिसत नसला तरी, आज जंगलांमध्ये गर्द रंगाची ही फुले उन्हातही वातावरण प्रसन्न करण्याचे काम करीत आहे. माणसांसाठी हा फाल्गुन मास निरुत्साह आणणारा असला तरी, पळसाने कशाही परिस्थितीत उत्साही राहण्याचा संदेशच जणू यातून दिला आहे.
...