अग्रलेख
Election 2024-CEC India अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेल्या भारतातील लोकशाहीच्या सर्वांत मोठ्या उत्सवाला अखेर प्रारंभ झाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या देशातील अठराव्या लोकसभेसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. Election 2024-CEC India देशात ९६.८ कोटी मतदार यावेळी आपला मताधिकार बजावणार आहेत आणि तेच या निवडणुकीत निर्णायक भूमिका वठवतील, हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या ४९.७ कोटी तर महिला मतदारांची संख्या ४७.१ कोटी इतकी आहे. Election 2024-CEC India भारतीय मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून लोकशाहीला अधिकाधिक बळकट करणाऱ्या या सर्वात मोठ्या उत्सवात उत्साहाने सहभाग घेतला पाहिजे. मतदानाची टक्केवारी वाढल्यास आणि सुशिक्षित मतदार मोठ्या संख्येत घराबाहेर पडल्यास कार्यक्षम सरकार निवडण्यास मदत होते, हे आधीच्या अनुभवांवरून सिद्ध झाले आहे. Election 2024-CEC India सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या मतदारांनी आपल्या पवित्र मताधिकाराचा वापर करून मतदान केले असेल त्यांनाच लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा नैतिक अधिकार आहे. Election 2024-CEC India मतदानाचा हक्क न बजावता केलेली ओरड ही नेहमीच व्यर्थ ठरते आणि अशांना लोकप्रतिनिधींना किंवा सरकारला जाब विचारण्याचा मुळीच अधिकार नाही.

मतदार निष्क्रिय, सुस्त राहिल्यास, मतदानाच्या दिवशी आळशीपणाने घरातच बसून राहिल्यास मतदानाच्या टक्केवारीवर गंभीर परिणाम होऊन अयोग्य, अकार्यक्षम व चरित्रहीन व्यक्ती निवडून येण्याची दाट शक्यता असते. सुदृढ लोकशाहीसाठी हे घातक आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आवाहनाला सक्रियपणे, सकारात्मकतेने प्रतिसाद देऊन लोकांनी भारतीय लोकशाहीची इमारत अधिक बळकट करण्यास हातभार लावला पाहिजे. दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी जे परिश्रम करीत आहे, जे सुव्यवस्थित नियोजन आखत आहे, त्याचेही कौतुक केलेच पाहिजे. कारण, भारतासारख्या १४० कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशात लोकसभेची निवडणूक घेणे ही मुळीच सोपी गोष्ट नाही. गेल्या ७२ वर्षांपासून निवडणूक आयोग ही जबाबदारी कार्यक्षमतेने पार पाडत आहे. भारतात जेवढी विविधता आहे तेवढी जगात कुठेच नाही. एकीकडे प्रचंड जंगले, डोंगरदऱ्यातील सुदूर प्रदेश तसेच किनारपट्टीचे प्रांत तर दुसरीकडे राजस्थानसारखे वाळवंटी प्रदेश, एकीकडे ईशान्येकडील दुर्गम व आसामसारखे दलदलीचे प्रांत तर दुसरीकडे काश्मीरसारखे हिमालयाच्या कुशीतील प्रांत या परस्परविरोधी हवामान आणि प्रतिकूल वातावरण असलेल्या विविध प्रांतात एकाचवेळी निवडणूक घेणे हे येरागबाळ्याचे काम नाही.
चारही बाजूंनी जंगलांनी वेढलेल्या आसामच्या काही गावांत, छत्तीसगडच्या बस्तर, जगदलपूर परिसरात तसेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात हत्तींच्या मदतीने ईव्हीएम व अन्य निवडणूक साहित्य मतदान केंद्रापर्यंत न्यावे लागते, यावरून निवडणूक आयोगापुढे असलेल्या आव्हानांची कल्पना यावी. त्यामुळे भारतातील सार्वत्रिक निवडणुकीचे यशस्वी नियोजन व व्यवस्थापन म्हणजे एक चमत्कारच आहे. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामगिरीकडे जगाचे लक्ष लागलेले असते. अमेरिका व युरोपमधील अनेक लोकशाहीवादी संस्थांचे पदाधिकारी, राज्यशास्त्राचे अभ्यासक व विद्वान यांनी भारत निवडणूक आयोगाचे अफाट कार्य प्रत्यक्षपणे पाहून, अनुभवून आश्चर्याने तोंडात बोटे घातली आहेत व भारताच्या निवडणूक आयोगाने त्यांच्या देशात येऊन तेथील संस्थांना मार्गदर्शन करावे, तसेच प्रशिक्षित करावे, अशी विनंती केली आहे. यासंदर्भातील एका महत्त्वाच्या घडामोडीकडे लक्ष वेधण्याची गरज आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये अमेरिकेतील नागरी सुरक्षा, लोकशाही आणि मानवाधिकार विभागाच्या अंडर सेक्रेटरी उजरा झेया यांच्या नेतृत्वाखालील चार सदस्यीय अमेरिकी शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि तत्कालीन निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांची भेट घेतली होती.
खंडप्राय देश व जगात सर्वाधिक संख्येने मतदार असूनही भारत निवडणूक आयोग मतदानाचे, निवडणुकीचे व्यवस्थापन कसे पार पाडतो, याबद्दल त्यांना जबरदस्त कुतूहल होते व भारताच्या या महत्त्वाच्या संस्थेकडून मार्गदर्शन हवे होते. विशेष म्हणजे लोकसभा, विधानसभा किंवा अन्य कुठलीही निवडणूक घेण्याविषयीचे ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि अनुभव याबाबतीत भारत निवडणूक आयोग जगातील इतर लोकशाहीवादी देशांपेक्षा कितीतरी अव्वल, सरस व कार्यक्षम असल्याचे अमेरिकन सरकारच्या या प्रतिनिधींनी देखील मान्य केले होते. तसेच जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्थांना (ईएमबीएस) प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी कार्यक्रम उपलब्ध करून देण्याची आणि इतर निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या गरजेनुसार तांत्रिक सल्लामसलत पुरवण्याची विनंतीदेखील त्यांनी निवडणूक आयोगाला केली होती. भारत निवडणूक आयोगाने मुक्त, निष्पक्ष, शांततापूर्ण आणि विश्वासार्ह निवडणुकांच्या आयोजनाबरोबरच त्या सर्वसमावेशक कशा बनवल्या याचे सुस्पष्ट विवेचन या विदेशी अभ्यासकांपुढे केले होते. या घटनेनंतर जागतिक लोकशाही शिखर परिषदेत भारत निवडणूक आयोगाने जगातील सुमारे १०० हून अधिक लोकशाहीवादी देशांना निवडणूक व्यवस्थापनाविषयी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विशेष नाव व दबदबा असलेल्या भारताच्या या सर्वोच्च निवडणूकविषयक संस्थेची विश्वसनीयता सिद्ध झाली आहे. आयोगाचे अतिशय बुद्धिमान, कार्यक्षम, तडफदार आणि सजग अधिकारी व कर्मचारी सुमारे अडीच महिने लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अखंड परिश्रम करीत असतात. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांनीदेखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष अभियान राबविले गेले. त्यामुळेच मतदार यादीत १.८२ कोटी नवमतदारांचा समावेश होऊ शकला. तसेच २० ते २९ वर्षे वयोगटातील १९.७४ कोटी युवा मतदार आहेत आणि तेच प्रामुख्याने या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार आहेत. स्थिर, कार्यक्षम व बळकट सरकार आणण्याच्या दृष्टीने मतदारांनी विवेकबुद्धीने मतदान करणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य माणूस हा भारतीय लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. इंग्लंड, अमेरिका तसेच युरोपातील अनेक देशांत मताधिकारासाठी नागरिकांचा संघर्ष अनेक दशके सुरू होता. भारतात मात्र लोकशाहीला अनुकूल वातावरण असल्याने एका फटक्यात सर्वांनाच मताधिकार मिळाला.
सर्वसामान्य माणसाला मतदानाची संधी मिळाली आणि त्यातूनच लोकशाहीची वाट प्रशस्त होत गेली. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांकडे या अंगाने पाहायला हवे. अजिंक्य मानल्या गेलेल्या अनेक नेत्यांना आणि पक्षांनाही भारतीय मतदारांनी आजवर पराभवाची धूळ चारली आहे. अतिशय बलाढ्य आणि एकमेवाद्वितीय समजल्या गेलेल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला गेल्या साडेतीन दशकात एकदाही स्वबळावर सरकार स्थापन करता आलेले नाही. याउलट एकेकाळी उपेक्षित असलेल्या भाजपासारख्या पक्षाला गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. ‘मोदी पर्वामुळे' भारतीय राजकारणाचे, सत्तेचे सारे संदर्भच त्यामुळे पार बदलून गेले. हे भारतीय मतदारांचे सामर्थ्य आहे. तुम्ही व्यापारी, उद्योजक असा, बडे अधिकारी असा, सेलिब्रिटी असा किंवा विद्यार्थी अथवा सर्वसामान्य व्यक्ती असा, तुमच्यापैकी प्रत्येकाला तोच मताधिकार आहे. या मताधिकारानेच भारतीय लोकशाही आज एका निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे कोणत्याही आमिषाला बळी न पडता तसेच जातिपंथाच्या आणि संकुचित भावनांच्या बाहेर येऊन राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे.