तभा वृत्तसेवा
वर्धा,
Amar Kale : वर्धा लोकसभा मतदार संघात काँग्रेसने उमेदवार शोध मोहीम केली. त्यावेळी फक्त शैलेश अग्रवाल यांनीच आपण उमेदवार होऊ शकतो, असे काँग्रेसला सांगितले होते. त्याशिवाय अमर काळेसह कोणत्याही नेत्यांने उमेदवारीला होकार दिला नव्हता.
त्यानंतर शरद पवार यांनी वर्धा लोकसभा मतदार संघ आपल्याला द्यावा अशी मागणी केली आणि मतदार संघ दिल्या गेला. काँग्रेसमधून काल 29 रोजी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज 30 रोजी माजी आमदार अमर काळे यांचे नाव पहिल्या यादीत जाहीर झाले. योगायोगाने महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचेही नाव पहिल्याच यादीत जाहीर झाले होते.
आर्वी विधानसभा मतदार संघात काँग्रेस म्हणजे अमर काळे असे समिकरण आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या वर्धा लोकसभा मतदार संघात अनेक दिवसांपासुन उमेदवार शोध मोहीम सुरू होती. परंतु, समर्थ उमेदवार काँग्रेसला सापडत नव्हता. त्यामुळे वर्धा मतदार संघावर शरद पवार यांनी दावा केला. पवार यांचे अतिशय विश्वासू हर्षवर्धन देशमुख यांनी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. परंतु, त्यांनी अचानक माघार घेतल्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीत उमेदवारासाठी हालचाली सुरू झाल्या. परंतु, काँग्रेसकडे उमेदवारच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अमर काळे यांना शरदचंद्र पवार राकाँकडून लढण्याचा आग्रह करण्यात आला.
त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्याचा घाट घातला. त्यानंतर त्याच गटातील सामान्य कार्यकर्त्यांनी काळे यांच्या उमेदवारीला विरोधही केला. हा सर्व प्रकार मुंबईत पोहोचला. काल 29 रोजी सामंज्यस करार झाल्यानंतर अमर काळे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला. त्याचवेळी अमर काळे यांची उमेदवारी पक्की समजल्या गेली होती. आज 30 रोजी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिल्या 5 उमेदवारांमध्ये अमर काळे यांच्या नावाची घोषणा केली. अमर काळे यांच्या उमेदवारीने या निवडणुकीत रंगत चढणार असुन तेली विरुद्ध कुणबी असेच चित्र तयार होणारआहे. आज रात्री 8 वाजता अमर काळे यांचे नागपूर विमानतळावर आगमण झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.