गडचिरोली,
Vijay Wadettiwar : देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे करून उद्योगपतींचे घर भरणार्या सरकारकडून राज्यातील कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक, मानसिक व शारीरिक छळ सुरू आहे. तर प्राणाची जोखीम उचलून सेवा देणार्या वीज मंडळाच्या कंत्राटी कामगारांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव आहे. आपल्या रास्त मागण्या व प्रलंबित प्रश्नांना घेऊन आगामी अधिवेशनात तुमचा मुद्दा प्रखरपणे मांडणार असून अशा निष्ठूर सरकारला धडा शिकविण्यासाठी रस्त्यावर उतरा असे आवाहन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.ते गडचिरोली येथील वीज मंडळ कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या बेमुदत संपास्थळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती गडचिरोलीचे ऊर्जागड पोटेगाव रोड गडचिरोली येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज या उपोषणस्थळी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट देत समस्या जाणून घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, युवक प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा विजय क्रांती कामगार संघटनेच्या अध्यक्षा शिवानी वडेट्टीवार, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसाकडे, युवक काँग्रेसचे विश्वजीत कोवासे तथा बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
तर पुढे बोलताना विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार म्हणाले की, देशात धर्मांधतेचा उन्माद घालून, मीडियाला धाकात ठेवून बहुजनांच्या युवकांना दिशाहीन करण्याचे काम सत्ताधार्यांकडून केले जात आहे. देशातील व्यापार्यांचे 19 लाख कोटींचे कर्ज माफ केल्या जाते. मात्र देशातील शेतकरी सर्वसामान्य नागरिक, कंत्राटी कामगार यांच्या वाढत्या महागाई व बेरोजगारीनुसार उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यात सरकार सपेशल अपयशी ठरत असल्याचे टीकास्त्र त्यांनी सत्ताधार्यांवर डागले. तुमच्या कामांची कंत्राट हे सत्ताधार्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांना असून त्यांच्या दावणीला तुम्हाला बांधून त्या कंपन्यांना 18 टक्के कमिशन देत तुमचे आर्थिक खच्चीकरण केल्या जात आहे. अशा निष्ठूर सरकार विरुद्ध पेटून उठून देशातील संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये यांना धडा शिकवा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉ. किरसान यांनी सरकारचे खाजगीकरण धोरण व कंत्राटी भरती या बाबीला आमचा स्पष्ट विरोध असून काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा असल्याचे ते म्हणाले. तर शिवानी वडेट्टीवार यांनी म्हणाले की, तुम्हा कंत्राटी कामगारांना वार्यावर सोडणार्या सरकार विरुद्ध जो संघटित लढा उभारलेला आहे. या लढ्याला आमचा सर्वस्वी पाठिंबा असून या संघर्षाला अधिक बळ देणे हेतू आपण सहकुटुंबनिशी रस्त्यावर उतरून सरकारचा विरोध करावा, असे आवाहन यावेळी केले.