- शरयूतीरी उसळणार 50 लाखांचा जनसागर
अयोध्या,
तब्बल 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येतील भव्य दिव्य मंदिरात 22 जानेवारी रोजी विराजमान झाले. अशातच येत्या मंगळवारी रामनवमीचा सण आला आहे. रामलला प्राणप्रतिष्ठेनंतर तीन महिन्यांतच Ram Navami रामनवमी आल्याने, हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी मंदिर प्रशासन आणि रामनगरी सज्ज झाली असून, देश-विदेशातून भाविकांचे अयोध्येत आगमन होणे सुरू झाले आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रथमच होणार असलेल्या या रामनवमी उत्सवात 50 लाखांवर भाविक अयोध्येत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षीच्या रामनवमी उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली असून, रस्तोरस्ती रांगोळ्या, रंगबेरंगी फुलांची सजावट, आकर्षक रोषणाई तसेच मनमोहक फुलांनी सजलेली राम मंदिराची प्रत्येक भिंत अन् रामनामात चिंब भिजलेली लाखो रामभक्तांची मांदियाळी अयोध्येत आतापासूनच दिसत आहे.
रामललाच्या कपाळावर पडणार सूर्याची किरणे
रामलला भव्य मंदिरात विराजमान झाल्यानंतर येणारी ही पहिलीच रामनवमी असल्याने, त्यासाठी खास व्यवस्था करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या कपाळावर रामनवमीच्या अभिजित मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील, तेव्हा सुवर्ण वातावरणात प्रभूरामाचा राजतिलक होणार आहे.
जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल
Ram Navami : प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच येणारी ही रामनवमी प्रचंड उत्साहात साजरी होणार आहे. सात्विकतेचा हा महन्मंगल सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी जगभरातून रामभक्त अयोध्येत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, भाविकांच्या निवास, भोजनासाठी खास सुविधा असणार आहे. भाविकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात येत असून, शरयू नदीत सहा फायबर बोट तैनात असणार आहेत.