नवी दिल्ली,
Sunil Ambekar : अस्तित्व, अस्मिता आणि ओळख यासाठी संघर्ष केलाच पाहिजे. रामजन्मभूमीचा संघर्ष हा असाच देशाच्या आणि समाजाच्या अस्मितेचा संघर्ष होता, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
रामजन्मभूमीच्या पाचशे वर्षांच्या संघर्षाचा आढावा घेणाऱ्या लेखक अरुण आनंद यांच्या रामजन्मभूमी पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून आंबेकर बोलत होते. आध्यात्मिक गुरू आणि साधो संघचे प्रमुख अनीशजी यावेळी अध्यक्षस्थानी होते. सुरूची प्रकाशनने मालवीय स्मृती भवनात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात डॉ. अमितकुमार वाष्र्णेय आणि आरुषि अग्रवाल यांच्या संयोजनाखाली तयार करण्यात आलेल्या रामजन्मभूमीवरील दोन चित्रकथांचे (कॉमिक) प्रकाशनही करण्यात आले. देशाच्याच काय पण जगाच्या इतिहासातही जेवढा मोठा संघर्ष आजपर्यंत झाला नाही, तेवढा मोठा म्हणजे ५०० वर्षांचा संघर्ष आपल्याला रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी तसेच त्यावर भव्य मंदिर बांधून रामललाच्या स्थापनेसाठी करावा लागला, याकडे आंबेकर यांनी लक्ष वेधले.
एखाद्या मंदिराचा पाया जेवढा भक्कम असेल, तेवढे दीर्घकाळ ते मंदिर टिकत असते, त्याचप्रमाणे समाजाचेही आहे. ज्या समाजाचा पाया न्याय, ज्ञान, श्रद्धा आणि अभ्यास अशा घटकांवर आधारित असतो, तो समाजही तेवढाच दीर्घकाळ राहात असतो. हिंदू धर्माकडे पाहिल्यावर याची खात्री पटते, असे ते म्हणाले.
मंदिर हे ऊर्जेचे केंद्र : अनीशजी
मंदिर हे उर्जेचे केंद्र असते. मंदिरातील ऊर्जा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या आभामंडळाशी एकरूप होत असते, म्हणजे मंदिर हे ऊर्जाक्षेत्रासारखे कार्य करीत असते, असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणात अनीशजी यांनी केले. ही ऊर्जा किमान एक हजार वर्षे टिकावी म्हणून राममंदिराचे बांधकाम तेवढेच भक्कम करण्यात आले, असे स्पष्ट करीत त्यांनी रामजन्मभूमीच्या जागेवर मंदिरच उभारणे का आवश्यक होते, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले. सुरूची प्रकाशनचे अध्यक्ष राजीव तुली यांनी प्रास्ताविक केले. लेखक अरुण आनंद तसेच डॉ. अमितकुमार वाष्र्णेय यांनी आपापल्या पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. सुरूची प्रकाशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त रजनीश जिंदल यांनी आभार मानले.