अशोक नेते व डॉ. नामदेव किरसान यांचे भाग्य मशिनबंद

(गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात अंदाजे 72 टक्के मतदान)

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
गडचिरोली, 
Lok Sabha Election 2024 : गडचिरोली-चिमूर या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले असून एकूण सरासरी 72 टक्केच्या दरम्यान मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
 
 
GADCHIROLI...
 
 
काही ठिकाणी लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांनी उत्सापूर्वक वातावरणात भाग घेतला, तर काही ठिकाणी मात्र मतदारांची अनास्था दिसून आली. दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान केवळ 55 टक्केपर्यंत पोहोचले होते. काही अतिदुर्गम भागातील आकडेवारी यायला उशिर होता. याशिवाय चिमूर व ब्रम्हपूरी या दोन निर्वाचन ़क्षेत्रातील मतदान सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरु असल्याने या मतदानसंघात मतदानाची टक्केवारी 3 वाजेनंतर वाढायला सुरुवात झाली. त्यामुळे सरासरी मतदानाची टक्केवारी अंदाजे 72 टक्क्यापर्यंत पोहोचली.
 
 
कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडला नसून सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत वातावरणात पार पडली. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कुरखेडा येथील मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाला. मात्र प्रशासनाने ही बाब लक्षात येताच तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. प्रशासनामार्फत मतदारांसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मतदान केंद्रांवर करण्यात आल्या होत्या.
 
 
विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान
 
 
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी 1891 मतदान केंद्रावर मतदान प्रकिया पार पडली. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतत गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव विधानसभा मतदारसंघात 64.60 टक्के, आरमोरी 65.23 टक्के, गडचिरोली 65.31 टक्के, अहेरी 63.40 टक्के, ब्रम्हपुरी 67 टक्के आणि चिमुर 64 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काही मतदान केंद्र संवेदनशील व दुर्गम भागात येत असल्याने तेथील आकडेवारी उद्यापर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच अंतिम आकडेवारी स्पष्ट होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. मात्र एकूण झालेल्या मतदानाची अंदाजित टक्केवारी 72 टक्क्यापर्यंत पोहोचली असल्याचे सांगीतल्या जात आहे.
 
नवमतदार, दिव्यांग व वृद्धांची मिरवणूक
 
 
यंदाच्या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघात 24 हजार नवमतदारांचा समावेश असून त्यांनी प्रथमच आज मतदानाचा हक्क बजावला. या नवमतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. प्रशासनाने नवमतदारांचे स्वागत करुन त्यांना वाजत-गाजत मतदान केंद्रापर्यंत पोहोचवले. याशिवाय दिव्यांग व वृद्ध मतदार यांना रथावर बसवून वाजत-गाजत त्यांना मतदान केंद्रावर नेण्यात आले. या नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला.
 
 
आदर्श मतदान केंद्र
 
 
प्रशासनाने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एका मतदान केंद्राला आदर्श मतदान केंद्र म्हणून घोषीत करुन त्या मतदान केंद्रावर जय्यत तयारीसह मतदान केंद्र शामियाना टाकून सजविण्यात आले होते. या मतदान केंद्रावर रंगीबेरंगी फुगे, कमान लावून मतदान केंद्र लग्नमंडपासारखे सजविण्यात आले होते. गडचिरोली व आरमोरी येथील विधानसभा क्षेत्रातील या आदर्श मतदान केंद्रावरील सजावट पाहून मतदारही भारावून गेले होते.
 
 
गडचिरोलीचा खासदार कोण, हे तरुणाई ठरवणार?
 
 
गडचिरोली-चिमुर या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात 18 ते 29 वयोगटातील जवळपास सव्वातीन लाख मतदार असून 30 ते 39 वयोगटातील साडेतीन लाखाहून अधिक मतदार या लोकसभा क्षेत्रात आहेत. याशिवाय 24 हजार नवमतदार असून या तरुण मतदारांची संख्या 7 लाखाच्या आसपास आहे. निवडणुकीत तरुणाईची ही संख्याच निर्णायक ठरणार आहे. तरुणाईची पसंती ज्या उमेदवाराला असेल, तोच गडचिरोलीचा खासदार म्हणून निवडल्या जाईल. या तरुण मतदारांचा मतदानादरम्यान उत्साह शिगेला पोहोचल्याचे जाणवत होते.