वरुण गांधींनी चिराग पासवानांचा आदर्श ठेवल्यास त्यांचा हंसराज हंस होऊ शकतो

02 Apr 2024 20:58:06
दिल्ली, 
पिलिभितचे खासदार Varun Gandhi वरुण गांधींना भाजपाने उमेदवारी नाकारली असली, तरी भाजपात आता त्यांना भविष्य नाही, असा निष्कर्ष काढणे घाईगर्दीचे होईल. त्यांनी आपल्यासमोर चिराग पासवान यांचा आदर्श ठेवला, तर त्यांचा हंसराज हंस होऊ शकतो. हातातोंडाशी आलेला मंत्रिपदाचा घास हिसकला गेला, तरी चिराग भाजपाच्या नेतृत्वावर नाराज झाले नाही आणि रालोआतून दूर जाण्याचा निर्णयही घेतला नाही. त्याचे फळ आज त्यांना मिळाले. काका पशुपतीकुमार पारस यांना दूर करीत भाजपाने चिराग पासवान यांच्या लोजपाला बिहारमध्ये पाच जागा दिल्या.
 
 
Varun Gandhi
 
भाजपाने अमेठीतील आपला उमेदवार जाहीर केला असला, तरी रायबरेलीतील उमेदवाराची घोषणा केली नाही. भाजपा रायबरेलीत काँग्रेसचा उमेदवार कोण राहील, याची वाट पाहत आहे. काँग्रेसने रायबरेलीतील आपल्या उमेदवाराची घोषणा करताच भाजपा आपला उमेदवार जाहीर करेल. यात एखादवेळी वरुण गांधींना लॉटरी लागू शकते. वरुण यांना गांधी घराण्यातील नेत्याविरुद्ध म्हणजे राहुल वा प्रियांकाविरुद्ध रायबरेलीत उतरवले जाऊ शकते.
 
 
भाजपाने उत्तर-पश्चिम दिल्लीचे विद्यमान खासदार असलेल्या हंसराज हंस यांना उमेदवारी नाकारली. मात्र, पंजाबमच्या फरीदकोटमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. वरुण गांधींच्या बाबतही असेच झाले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘धिरज का फल मिठा होता है’, याचा अनुभव पासवान यांनी घेतला, तसाच तो Varun Gandhi वरुण गांधींनाही येऊ शकतो. भाजपाने उमेदवारी नाकारल्यानंतर वरुण गांधी या मतदारसंघात बंडखोरी करतील, अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, पण ती चूक त्यांनी टाळली. भाजपाने आपल्याला उमेदवारी का नाकारली, याचे आत्मपरीक्षण करीत स्वत:मध्ये काही सुधारणा वरुण गांधींनी घडवल्या तर त्यांचे राजकीय भविष्य उज्ज्वल राहू शकते.
Powered By Sangraha 9.0