आसनसोलमध्ये तृणमूलला पहिल्यांदाच मिळाला होता विजय

    दिनांक :10-May-2024
Total Views |
नवी दिल्ली, 
Asansol in West Bengal : पश्चिम बंगालमधील आसनसोल हा सुरुवातीपासून माकपचा बालेकिल्ला होता. सर्वाधिक म्हणजे 9 वेळा या मतदारसंघातून माकपचे उमेदवार विजयी झाले. राज्यात सत्तेवर येऊन 15 वर्षे होत असताना तृणमूल काँग्रेसला मात्र या मतदारसंघात कधी विजय मिळवता आला नाही. त्यांची ती कसर शत्रुघ्न सिन्हा यांनी 2022 च्या पोटनिवडणुकीत भरून काढली. यावेळी पुन्हा एकदा तृणमुल काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवायचा आहे.
 
 
Asansol
 
Asansol in West Bengal : काँग्रेसने आतापर्यंत चारवेळा या मतदारसंघातून विजय मिळवला, भाजपाने दोनदा तर तृणमूल काँग्रेसला फक्त एकदा विजय मिळाला. विशेष म्हणजे, संयुक्त समाजवादी पक्षही या मतदारसंघातून एकदा निवडून आला. आसनसोल लोकसभा मतादरसंघात विधानसभेचे सात मतदारसंघ आहेत, यापैकी पाच मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे, तर दोनमध्ये भाजपाचे आमदार आहेत. त्यामुळे यावेळी या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या आशा वाढल्या आहेत. इंडिया आघाडीचे घटक पक्ष म्हणून राज्यात काँग्रेस आणि डावे पक्ष यांची आघाडी आहे. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ माकपकडे आला आहे. 2014 आणि 2019 मध्ये जिंकलेला हा मतदारसंघ भाजपा पुन्हा आपल्याकडे हिसकण्यात यशस्वी होते की तृणमूल काँग्रेस या मतदारसंघावरील वर्चस्व कायम ठेवते, हे 4 जूनच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.