वनोजा पिंजर रोडवरील तो पूल देत आहेत अपघातास निमंत्रण
26 May 2024 17:11:01
मंगरुळनाथ,
accidents वनोजा पिंजर मुख्य रोडवरील फाटा ते वनोजा गावादरम्यान असलेला पाचमोर्या पूल व येथून काही अंतरावर असलेला एकमोर्या पुलाला एका काठावर मोठे भगदाळ पडले आहे. त्यामुळे हे पूल अपघातास निमंत्रण देत आहेत. संबंधित विभागाकडून दरवर्षी याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु ही दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने, पुन्हा जैसे थे ची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा थातूरमातूर दुरुस्ती करून बिले काढण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
पावसाळ्यात थोडाही जास्त पाऊस पडला की या पुलासह लेंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे वनोजा ते पिंजर कडे जाणारी वाहतूक प्रभावित होते. तसेच पूल लहान असल्याने शेतकर्यांच्या शेतात पाणी जात असून, शेतातील पिके पाण्यात जातात त्यामुळे शेतकर्यांचेही नुकसान होते. या रस्त्याने शेकडो दुचाकी व प्रवाशी वाहतूक करणारे अनेक वाहने त्याच बरोबर शेती उपयोगी असणार्या वाहनांची वर्दळ नेहमी असते.accidents शेलुबाजार येथे मोठी आठवडी बाजारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे पिंजर पासून येणार्या सर्व खेडे गावातील प्रवासी शेलुबाजारला जाण्यासाठी याच रस्त्याने प्रवास करतात. वनोजा येथे शाळा, महाविद्यालय, निवासी वस्तीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, संस्था, पतसंस्था, बँक आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वाहतूक सुरू असते. यामुळे या पुलांची उंची वाढवून नव्याने निर्मिती करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांन मधून होत आहे.