महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे माध्यम : प्रदीप दाते

बदलता महाराष्ट्र विषयावर परिसंवाद

    दिनांक :03-May-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Pradeep Date : शिक्षणातूनच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बदल होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघ नागपूरचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केले.
 
 
jakSD
 
ते महाराष्ट्र दिनानिमित्त पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया वर्धा चॅप्टरच्या वतीने बदलता महाराष्ट्र या विषयावर आयोजित परिसंवादात मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. वर्धा येथील निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्क येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीआरएसआय वर्धा चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. राजेश लेहकपुरे होते. दाते पुढे म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 वर्षात काय गमावले आणि काय मिळवले याचे मूल्यांकन करण्याची गरज आहे. त्यांनी कामगार दिनानिमित्तही आपले विचार मांडले.
 
 
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयातील प्रा. डॉ. बालाजी चिरडे म्हणाले की, महाराष्ट्र ही देशातील सर्व विचारधारांची जन्मभूमी आहे. बदलत्या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी शिक्षण प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्यावर आपण भर दिला पाहिजे. मुलांवर आपल्या आवडीचे शिक्षण लादण्याऐवजी त्यांना नैसर्गिकरित्या शिक्षण घेण्याची संधी दिली पाहिजे. महाराष्ट्रातील भाषा, शिक्षण आणि समाज यांच्यात झालेले बदल अधोरेखित करून युवकांनी आपल्या कलागुणांचा उपयोग करून युवा राष्ट्राला पुढे नेण्यात योगदान द्यावे असेही ते म्हणाले.
 
 
निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी राष्ट्रविकासाचा पाया रचण्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सुब्बाराव आदी विचारवंतांच्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच महाराष्ट्राने स्त्री शिक्षण, ग्रामीण विकास, नई तालीम, राष्ट्र भाषा या संदर्भात एक आदर्श स्थापित केला आहे असेही ते म्हणाले. डॉ. राजेश लेहकपुरे यांनी बदलत्या महाराष्ट्राच्या विविध पैलूंवर चर्चा केली. संचालन बी. एस. मिरगे यांनी केले तर प्रफुल्ल दाते यांनी आभार मानले.