साप्ताहिक राशिभविष्य

16 Jun 2024 06:00:00
साप्ताहिक राशिभविष्य 
 
 rashibhavishy
 
मेष (Aries): अपेक्षित यश मिळावे
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण आपल्याला सर्वप्रकारचे बळ देत असल्यामुळे शिक्षण पूर्ण करून नोकरी-व्यवसायाच्या दिशेने प्रयत्न करीत असलेल्या युवा वर्गाला त्यांची स्वप्ने पूर्ण होताना दिसू लागतील. स्पर्धा परीक्षा, विविध प्रवेश चाचण्यांमध्ये देखील सरशी साधता येईल. उच्च शिक्षणाचे मार्ग प्रशस्त होतील. अपेक्षित यश मिळेल. प्रगतीचा अनुभव घेता येईल. या राशीच्या तरुण वर्गास जीवनाचा जोडीदार शोधण्याच्या दृष्टीनेही हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. साधारणतः सर्व शुभ संकेतांची जणू उधळण या राशीच्या मंडळींना अनुभवता येईल. शुभ दिनांक- 18, 19, 20, 21
 
 
वृषभ (Taurus): सामाजिक प्रतिष्ठा वाढावी
या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता कार्यक्षेत्रातील यश व प्रसिद्धीमुळे आपल्याभोवती एक विशिष्ट प्रकारचे वलय निर्माण होऊन त्याचा फायदा आपणास सामाजिक मानसन्मान, प्रतिष्ठा लाभाच्या स्वरूपात होऊ शकतो. आपला जनसंपर्क वाढता राहील. व्यवसायात नवी गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, नवीन शाखा उघडणे असेही निर्णय आपणास घेता येऊ शकतील. नोकरीत असलेल्या मंडळींना या काळातील कामाचे, यशाचे दूरगामी लाभ नक्कीच मिळू शकतात. युवकांना उत्तम शैक्षणिक यश लाभावे. नोकरीच्या प्रयत्नातील युवांना शुभता लाभेल. हेही वाचा : भारतीय रेल्वेचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामील
शुभ दिनांक- 19, 20, 21, 22.
 
 
मिथुन (Gemini): स्वभावात उग्रपणा नको
Weekly Horoscope : या आठवड्यातील गोचर ग्रहमान आपल्याला बव्हंशी अनुकूल असले तरी सप्ताहाच्या अखेरीस होणार्‍या काही किरकोळ बदलांमुळे आपणास सारे व्यवहार करताना, मोठी झेप घेण्याचा प्रयत्न करताना पुरेशी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. यासोबतच आपल्या व्यवहारात काहीसा उग्रपणा व निष्काळजी निर्माण होण्याची शक्यता देखील आहे. त्याचे परिणाम आपल्या कार्यक्षेत्रावर होऊ शकतात. त्यामुळे आपल्या व्यवहाराने कुणीही दुखावणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे.
शुभ दिनांक- 16, 17, 21, 22
 
 
 
कर्क (Cancer): ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपयोगी
या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण विशेषतः आपले कर्मस्थान बलवान करणारे दिसत आहे. ही ग्रहस्थिती नोकरी-व्यवसायातील आपले महत्त्व वाढविणारी ठरावी. आपल्या योजनांना यश प्रदान करू शकेल असा हा सप्ताह आपणास अनुभवास यावा. काही व्यावसायिक मंडळींना धाडसी पावले उचलण्याचे बळ देखील प्राप्त होईल. त्याचवेळी स्वतःच्या स्वभावावर, वागण्यावर नियंत्रण ठेवण्याची देखील या काळात गरज आहे. कुणाच्या तरी सल्ल्याने, मार्गदर्शनाखाली आपली कामे केल्यास त्यात मिळणार्‍या यशाचे व आनंदाचे प्रमाण निश्चितपणे वाढेल.
शुभ दिनांक- 17, 18, 19, 20
 
 
सिंह (Leo): काहीशी खर्चीक सुरुवात
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता या सप्ताहाची सुरुवात काहीशी खर्चीक स्वरूपाची ठरणार असली तरी आपला ताळेबंद समाधानकारक राहील. या सप्ताहाच्या मध्यात काही मंडळींपुढे संततीच्या संबंधाने एखादा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता राहू शकते. कदाचित त्यावरून कुटुंबांमध्ये पेचप्रसंग देखील निर्माण होऊ शकतात. त्या प्रसंगांना धैर्याने, समजूतदारपणे व संयमाने तोंड देण्याची गरज आहे. मुलांना विश्वासात घेऊन, त्यांना असहाय वाटणार नाही अशा पद्धतीने त्यांच्याशी वागणूक ठेवून प्राप्त अडचणीतून मार्ग काढावा.
शुभ दिनांक- 18, 19, 20, 21
 
 
 
कन्या (Virgo): व्यावसायिक कामांना वेग
या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता आपली व्यावसायिक आणि सरकारी कामे वेगाने होऊ शकतील. आतापर्यंतच्या काहीशा कुंद झालेल्या स्थितीतून आपणास आता नक्कीच दिलासा मिळू शकतो. दरम्यान, याच ग्रहमानामुळे काही मंडळींच्या स्वभावात काहीसा उग्रपणा निर्माण होऊ शकतो, मात्र आपल्या वागण्याने, बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपली कामे सहजपणे करून घेण्यासाठी जिभेवर साखर ठेवण्याची हातोटी अंगीकारावी लागू शकते. हवामान बदलाच्या या काळात आपणास आरोग्याची काळजी घेण्याचीही गरज आहे.
शुभ दिनांक- 17, 20, 21, 22
 
 
 
तूळ (Libra): कार्यक्षेत्रात प्रसन्नतेचे वातावरण
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता आपल्या कार्यक्षेत्रात या सप्ताहात प्रगती व प्रसन्नतेचे वातावरण राहील असे म्हणावयास हरकत नाही. आपली आर्थिक आवक वाढेल. दरम्यान, हवामान बदलाच्या या काळात आपल्या प्रकृतीला जपणे आवश्यक आहे. काही मंडळींना किरकोळ स्वरूपाच्या पडझडीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. हाडे व स्नायूंशी संबंधित दुखणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे व असे काही उद्भवेल तर त्यावर वेळीच सुयोग्य उपचार केले पाहिजेत.
शुभ दिनांक- 17, 18, 21, 22.
 
 
वृश्चिक (Scorpio): प्रलोभनांपासून दूर राहा
या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण आपणास काहीसे मनमौजी बनविणारे आहे असे वाटते. या सप्ताहात हौस, मौज, व्यसने, खरेदी यावर आपल्या व आपल्या कुटुंबाचा खर्च वाढू शकतो. काही मंडळींना कुटुंबात एखादी मोठी आर्थिक जबाबदारी देखील उचलावी लागू शकते. मित्रमंडळीतही पैसा द्यावा लागू शकेल. मात्र हे सारे व्यवहार करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे. गरज ओळखून पैसे खर्च केले पाहिजेत. आर्थिक अंदाजपत्रक कोलमडणार नाही याची काळजी घ्यावी. व्यसनांवर नियंत्रण हवे. प्रलोभनांपासून दूर राहावयास हवे.
शुभ दिनांक- 17, 18, 20, 21
 
 
धनु (Sagittarius): आरोग्याची काळजी घ्या
Weekly Horoscope :  या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण आरोग्याच्या दृष्टीने या राशीच्या मंडळींना फारसे हितावह नाही, असे म्हणावे लागेल. हवामानातील किरकोळ बदल देखील या मंडळींना बर्‍यापैकी सतावणारे ठरू शकतात. त्यामुळे आपल्या प्रकृतीची प्राधान्याने काळजी घ्यावी. संसर्ग टाळावा. पथ्ये, औषधोपचार, प्रतिबंधात्मक उपाय योजावेत. तसेच या काळात वाहने सांभाळून चालवावीत. अपघातांबाबत सावध असावे. रस्त्यावरील वावर सावध असावा. कौटुंबिक जीवनातही हे योग तापदायक ठरू शकतात. काहींना विदेशात जाण्याच्या दृष्टीने सुयोग यावेत.
शुभ दिनांक- 18, 19, 20, 22
 
 
 
मकर (Capricorn): आर्थिक व्यवहारांमध्ये सावध
या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता या राशीच्या मंडळींना या सप्ताहात आर्थिक सावधगिरी बाळगणे अतिशय आवश्यक आहे, असा इशारा द्यावा लागेल. सर्वप्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पूर्ण सतर्कता ठेवावयास हवी. आपल्या कोणत्याही व्यवहारामध्ये कोणावरही विसंबून राहू नये. पुरेशी खातरजमा करूनच व्यवहार पूर्ण करावयास हवेत. उधार, उसनवारी टाळायला हवी. त्याचप्रमाणे वादविवाद, भांडणे यासारख्या घटनांपासून देखील दूर राहणेच बरे. आपल्या भोवतालच्या व्यक्तींची खात्री करूनच त्यांना जवळ करा.
शुभ दिनांक- 17, 20, 21, 22
 
 
 
कुंभ (Aquarius): व्यवसायात आगेकूच कराल
Weekly Horoscope :  या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता आपले कर्मस्थान प्रामुख्याने सक्रिय होत असल्यामुळे या सप्ताहात नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍या काही युवकांना त्यांचा शोध पुरा करता येऊ शकेल, असे वाटते. व्यावसायिक- व्यापारी मंडळींना व्यवसायात आगेकूच करता येईल. मात्र या सार्‍यात कुठेही अनधिकृत आर्थिक व्यवहाराचा मुद्दा उपस्थित होत असेल तर त्याबाबत अतिशय सावध राहावयास हवे. कोणत्याही क्षणी गाफील राहून कोणावरही विश्वास टाकून आर्थिक व्यवहार करू नयेत. मोठ्या फसवणुकीचा धोका निर्माण होऊ शकतो, हे लक्षात ठेवावे. विद्यार्थी व युवा वर्गाला चांगल्या संधी लाभतील.
शुभ दिनांक- 17, 18, 19, 21
 
 
 
मीन (Pisces) : संततीला शैक्षणिक सुयोग
Weekly Horoscope : या आठवड्यातील ग्रहांचे गोचर भ्रमण पाहता आपल्या कुटुंबात व विशेषतः आपल्या संततीला उत्तम योग देणारा हा सप्ताह ठरू शकतो. कुटुंबातील मुला-मुलींच्या शैक्षणिक प्रगतीच्या बातम्या आनंद देणार्‍या असतील. अपेक्षेप्रमाणे लागलेले निकाल, प्रवेशादी प्रक्रियांमध्ये मिळणारे यश हे उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण करणारे असेल. मुलांमध्ये नवा हुरूप संचरताना दिसेल. उच्च शिक्षणाचे बेत आखले जातील. त्यासाठीची आर्थिक तरतूद देखील सहज होताना दिसू शकेल. विदेशात जाण्याच्या स्वप्नांना बळकटी लाभून त्या दिशेनेही हालचाल होऊ शकेल.
शुभ दिनांक- 17, 18, 20,21
 
- मिलिन्द माधव ठेंगडी/ज्योतिष शास्त्री, 8600105746
Powered By Sangraha 9.0