बाबा...तुजविण आयुष्याची कल्पनाच नाही

    दिनांक :16-Jun-2024
Total Views |
- वडिलांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस
आज जागतिक पितृदिन
नागपूर, 
World Father's Day : मुलांच्या आयुष्याला दिशा मिळावी, आपल्या नशिबी आलेले कष्ट, हालअपेष्टांचे जीवन मुलांच्या वाटेला नको म्हणून रक्ताचे पाणी करून झटणारा बाबा प्रत्येकानेच अनुभवला असेल. असे म्हटले जाते की, जगात आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. परंतु, मुलांसाठी वडिलांशिवाय आयुष्याची कल्पना करणे फार कठीण आहे. बाहेरून कणखर आणि आतून मऊ असणारे वडील त्याग आणि कुटुंबासाठी ढालीप्रमाणे असणारे व्यक्तिमत्त्व आहे. वडिलांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी दरवर्षी जून महिन्याच्या तिसर्‍या रविवारी ‘फादर्स डे’ अर्थात् पितृदिन जगभर साजरा केला जातो.
 
father
 
World Father's Day : पितृदिनामागे रोमांचक कहाणी आहे. अमेरिकेची सोनेरा डोड लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाला. वडील विलियम स्मार्ट यांनी सोनेरोला कधीच आईची कमी जाणवू दिली नाही. तिच्यासह भावंडाचा सांभाळ करताना वडिलाने कुठलीही कमतरता भासू दिली नाही. वडिलांचे प्रेम आणि त्याग बघून सोनेराला वाटेल की, एक तरी दिवस केवळ वडिलांच्या नावावर असावा. तिने सर्वप्रथम 19 जून 1910 रोजी पितृदिन साजरा केला होता. 1916 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी पितृदिन साजरा करण्याचा प्रस्ताव स्वीकारला होता. त्यानंतर 1924 मध्ये राष्ट्राध्यक्ष केल्विन कूलिज यांनी हा दिवस राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित केला, तर 1966 मध्ये राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जूनच्या तिसर्‍या रविवारी पितृदिन साजरा करण्याची घोषणा केली. यंदा जगभरात हा दिवस 16 जूनला साजरा केला जात आहे.
कुटुंबाचा आधार, मुलांचा विश्वास
World Father's Day : वडील म्हणजे कुटुंबाची आशा, धीर आणि विश्वासाचे ज्वलंत उदाहरण आहे. वडिलांशिवाय चार भिंतीचे घर अपूर्ण असते, त्यांच्याशिवाय कुटुंबाला अजिबात आधार नसतो. मुलांसाठी निस्वार्थीपणे सर्वच गोष्टींचा त्याग करणारे, स्वत:चे अ‘ख आयुष्य कुटुंबासाठी समर्पित करणारी व्यक्ती म्हणजे वडील असते. स्वत:चा खिसा रिकामा असला, तरी मुलांचे सर्व हट्ट पूर्ण करणारा आणि प्रत्येक संकटात मुलांसोबत खंबीरपणे उभा असणार्‍या वडिलांना समर्पित करणारा हा दिवस आहे.
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती...
‘वडील म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर,
वडील म्हणजे अपरिमित काळजी करणारे मन,
तुम्हाला जवळ घेते, जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते, जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारे अंतःकरण...’