संत प्रबोधन
Saint Kanhopatra : समाजजीवनामध्ये ज्यांना उपेक्षित ठेवले गेले, त्या सर्वांना भक्तिमार्गाने आपल्या प्रवाहात आणून जगण्याचा अधिकार दिला.
सकळाशी येथे आहे अधिकार ।
कलियुगी उद्धार हरीच्या नामे ।।
मंगळवेढे येथील शामा नायिकेची मुलगी म्हणजेच संत कान्होपात्रा होय. आपल्या आईचा गणिकेचा व्यवसाय तिने सोडून दिला. भक्तिमार्गामध्ये तल्लीन होऊन ती पंढरपूरला पोहोचली. लावण्यवती असल्यामुळे तिच्या सौंदर्याची कीर्ती बेदरच्या बादशहाच्या कानावर गेली. मनातून विठुमाउलीला अनावर भक्तीने आळवत तिने आपला जीव वाचवला. त्यानंतर ती कधीही त्या मार्गाला गेली नाही. तिला तो व्यवसाय मान्यच नव्हता.
Saint Kanhopatra : निश्चय भक्ती आणि आर्त मागणं यामुळेच तिचे रक्षण साक्षात विठ्ठलाने केले. तिला भक्तिमार्गाची गोडी लागली होती. भक्तिसुखाचा तो आनंद तो अवर्णनीय असल्याने तिने लौकिक जगणे सोडून देऊन ती भक्तिमार्गामध्ये तल्लीन झाली होती. एका गणिकेची मुलगी ते संतश्रेष्ठ कान्होपात्रा हा तिच्या जीवनाचा प्रवास खूप महत्त्वपूर्ण आहे. मानवी जीवनामध्ये तुमची सुरुवात जरी कोणत्याही व्यवसायात, कोणत्याही घराण्यात कितीही खालच्या स्तरामध्ये झाली तरीही, आपल्या भक्तीच्या बळावर आपल्या आत्मिक शुद्धतेच्या बळावर तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचता. याचा उत्तम दाखला म्हणजे संत कान्होपात्रा होय.
संत कान्होपात्रा आणि संत दिंडी
Saint Kanhopatra : वारकऱ्यांची दिंडी निघावी आणि दिंडीमध्ये कान्होपात्रा हिने लपून-छपून जावे. आईचा दिंडीमध्ये पंढरपूरला जाण्यासाठी प्रचंड विरोध. कारण आपला परंपरागत व्यवसाय बंद पडेल, ही शामा नायिका या तिच्या आईला भीती वाटत होती. आपली लावण्यवती मुलगी जर दिंडीत निघून गेली तर, चरितार्थाचे साधन बंद पडेल. यामुळे तिला दिंडीत जाण्यापासून ती रोखत होती. परंतु त्या व्यवसायाला कंटाळून तिने दिंडीचा मार्ग, भक्तीचा मार्ग मनापासून स्वीकारला होता. परंतु, तिला तिच्या आईचा विरोध. तरीही भगवंताच्या ओढीने ती पंढरपूरला पोहोचते आणि काय चमत्कार...! तिचा भक्तीचा टाहो तिच्या आर्ततेची निस्सीम भक्ती यामुळे ती विठ्ठलाला प्रिय होते. गणिकेची मुलगी व त्यात दिसायला सौंदर्यवान म्हणून तिच्याकडे पाहणाऱ्या लोकांच्या वाईट नजरा. परंतु, त्याला न जुमानता आपल्या सात्त्विक तेजाच्या भक्तीने तिने सर्वांना उत्तर दिल्याचे जाणवते.
संत कान्होपात्रा यांची संत भेट
समाजाने एका स्त्रीला हिणवल्यानंतरही तिने आपली अतिरिक्त कोटीतील पांडुरंगाची भक्ती करावी. या भक्तीद्वारे त्याला प्रसन्न करून घ्यावे. प्रसंगी आपला प्राणसुद्धा द्यावा. अशा पद्धतीचा जीवन आलेख संत कान्होपात्रा यांचा आहे. संतांची भेट घेत तिने आपली वैचारिक उंची व भक्तीची पात्रता वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला दिसतो. संत ज्ञानेश्वर भेटीचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही ।
सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई ।।
धन्य कान्होपात्रा आजि झाली भाग्याची ।
भेटी झाली ज्ञानदेवाची म्हणूनीया ।।
संत ज्ञानेश्वरांच्या भेटीमध्ये ते आळंदी या गावाचा उल्लेखसुद्धा करतात.
अलंकापुरी पुण्य ठाव । तेथे समाधी ज्ञानदेव ।।
Saint Kanhopatra : या अभंगावरून त्यांची संत ज्ञानेश्वरांची प्रत्यक्ष भेट झाली की संत ज्ञानेश्वरांच्या समाधीवरून उल्लेख तिने केला असावा, असा भेद व भ्रम काही अभ्यासक व्यक्त करतात. संत चोखा महार यांनी आपल्या अभंगांमध्ये संत कान्होपात्राचा उल्लेख मोठ्या सन्मानाने केलेला आहे. त्यांची वाट ही काय आहे...? काही असो, पण एवढे मात्र निश्चितपणे सांगता येईल की, संत कान्होपात्रा यांची अभंग रचना ही उच्च कोटीतली आहे. आर्त भक्तीपर आहे. त्या अभंगावरून निष्कर्ष काढता येईल की, संत कान्होपात्रा यांची भक्ती अनन्यसाधारण कोटीतली होती. भक्तीसाठी तिने प्रत्यक्ष जिवाची आहुती दिलेली आहे. कान्होपात्रा ही मंगळवेढा येथील शामा नावाच्या एका नायिकीची मुलगी ते संत कान्होपात्रा हा त्यांचा जीवन प्रवास अनन्यसाधारण आहे. तिच्या जीवनातील हे परिवर्तन ज्या पद्धतीने घडून आले तो भक्तिमार्ग म्हणजे तिच्यासाठी सुळावरची पोळी होय.
वारकऱ्यांच्या मेळाव्यासोबत पंढरीला प्रयाण
घरासमोरून वारकऱ्यांचा मेळा चालला होता आणि वास्तव जीवनामध्ये मन रमत नव्हतं. आईचा व्यवसाय अजिबात पटत नव्हता, म्हणून ती त्या मेळाव्यासोबत पंढरपूरला गेली. तेथे विठ्ठलाचे व सर्व संत मांदियाळीचे दर्शन होताच ती सात्त्विक आनंदाने अतिशय भारावून व मोहरून गेली होती. तो अवर्णनीय आनंद ती शब्दात व्यक्त करते-
जन्मांतरीचे सुकृत फळासी आले ।
म्हणूनही देखीले विठ्ठल चरण ।।
धन्य भाग्य आजी डोलीया लाधले ।
म्हणून देखीले विठ्ठल चरण ।।
घाली गर्भवासा कानोपात्रा म्हणे ।
जन्मोजन्मी देखेन विठ्ठलचरण ।।
विठ्ठल भक्तीची अनावर ओढ संत कान्होपात्रा यांच्या आर्तभक्तीतून आपल्याला पाहावयास मिळते. जेव्हा कुणीही वाचवायला तयार नसतो, तेव्हा साक्षात भगवंत पाठीशी असतो, असा निर्वाळा त्या आपल्या भक्तीतून देतात.
लावण्यवती कान्होपात्रा व बेदरचा बादशहा
Saint Kanhopatra : संत कान्होपात्रा पंढरीमध्ये वास्तव्यास असताना तिच्या सौंदर्याची कीर्ती बेदरच्या बादशहाच्या कानावर गेली. त्याने लगेच दूत पाठवून तिला पकडून घेऊन येण्यास सांगितले. शिपायांची धाड तिला पकडण्यासाठी पंढरीला पोहोचली तेव्हा तिने विठुमाउलीसमोर जो आकांत मांडला तो महत्त्वपूर्ण आहे. आर्त भक्तीचा तो एक उत्तम नमुना आहे. ज्याप्रमाणे महाभारतामध्ये द्रौपदीने वस्त्रहरणाच्यावेळी श्रीकृष्णाची आर्ततेने करुणा भाकून त्या प्राणसख्या श्रीकृष्णाला बोलावून आपल्या देहाचं रक्षण केलं होतं. साक्षात श्रीकृष्णाने तिला वस्त्र पुरवले होते. अगदी त्याच पद्धतीचा हा प्रसंग या कान्होपात्रेच्या जीवनामध्ये आलेला आहे. तिने विठुमाउलीला आर्त हाक मारत आपली सुटका त्या दूतांच्या हातून करून घेतली आणि तिची प्राणज्योत त्या विठुमाउलीमध्ये लुप्त झाली.
संत कान्होपात्रा यांची प्राणांतिक करुणा भक्ती
बादशहाचे सैनिक जेव्हा पकडावयास आले तेव्हा विठ्ठलाच्या दारात तिने मांडलेला आकांत तिच्याच अभंगातून असा पाहायला मिळतो -
पुरविली पाठ न सोडी खळ ।
अधम चांडाळ पापराशी ।।
वारीता नायके दुष्ट दुराचार ।
काय करू विचार पांडुरंगे ।।
तू माय माउली जगाची जननी ।
म्हणवोनी मिठी चरणी घालितसे ।।
विनवी कान्होपात्रा जोडुनिया हात ।
आता देह अंत समय आला ।।
धाय मोकलून तिने देवरायाचा धावा केला. जगाची जननी असलेली ती माय माउली या पिल्लाचं रक्षण कर, तू माझा सांभाळ कर, अशी हाक विठुमाउलीला मारते. तिच्या या आर्त हाकेतून तिची करुणा प्रकट होते. याच समयी तिच्या भक्तीतून करुणेचा पाझर फुटतो. साक्षात पांडुरंग तिला या सर्व बंधनातून, संकटातून मुक्त करतात. तिची प्राणज्योत प्रत्यक्ष पांडुरंगामध्ये विलीन होते.
पांडुरंग तत्त्वात विलीन झालेलीसंत कान्होपात्रा
Saint Kanhopatra : बेदरच्या बादशहाच्या सैनिकांनी जेव्हा तिला पकडण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शरीराला या आदमांचा स्पर्श होऊ नये यासाठी ती विठ्ठलाला प्रार्थना करते की -
नको देवराया अंत आता पाहू ।
प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।
हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुनी ।
धावे हो जननी विठाबाई ।।
मोकलोनी आस जाहले मी उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ।।
शेवटी पांडुरंगाने तिची प्रार्थना ऐकली आणि तिने आपल्या हृदयात स्थान दिले. तिची प्राणज्योत पांडुरंग तत्त्वामध्ये विलीन झाली. अशी ही सर्वश्रेष्ठ संत कान्होपात्रा भक्तीसाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी एक आगळीवेगळी संत ठरली आहे. बादशहाच्या पापी हस्तकांचा जिवंतपणी स्पर्शसुद्धा नको म्हणून तिने आपला देह त्याग केला. ती परमात्मा रूपात मिळून गेली, एवढी थोर भक्ती तिने पांडुरंगाची केली आहे.
संत तुकाराम महाराज अशा भक्तीबद्दल आपल्या अभंगगाथेमध्ये वर्णन करतात -
हीच थोर भक्ती आवडते देवा ।
संकल्पावी माया संसाराची ।।
ठेवीले अनंत तैसेची रहावे ।
चित्ती असू द्यावे समाधान ।।
वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ ।
भोगणे ते फळ संचिताचे ।।
तुका म्हणे घालू तयावरी भार ।
वाहू हा संसार देवा पा ।।
अशा पद्धतीने सर्व संसार देवाच्या चरणावरती वाहून देऊन आपला प्राणांतिक ठेवा जो स्वतःचा जीव आहे, प्राण आहे तो सुद्धा संत कान्होपात्राने देवाच्या चरणावरती सोडून दिला.
संत कान्होपात्रा यांची अभंग रचना
Saint Kanhopatra : संत कान्होपात्रा यांच्या नावावर एकूण २७ अभंग पाहायला मिळतात. त्या अभंगांमध्ये त्यांनी मांडलेले विषय भ्रष्ट, पतीत, यातिहीन अशा अवस्थेतील त्यांची जी मनोवस्था मांडली आहे, ती अगदी निरागसता या अभंगातून प्रकर्षाने उमटलेली पाहायला मिळते.
दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।।
मी तो आहे यातिहीन । न कळे काही आचरण ।।
याती शुद्ध नाही भाव । दुष्ट आचरण स्वभाव ।।
मुखी नाम नाही । कान्होपात्रा शरण पायी ।।
स्वतःची यातिहिनता तिने प्रस्तुत अभंगातून प्रकट केली आहे. तिला कोणतेही ज्ञान नाही, शुद्ध आचरण नाही आणि कोणते आचरण करावे तेसुद्धा माहीत नाही. माझा भाव शुद्ध नाही त्यामुळे मी कसं कशी भक्ती करू, या विवंचनेमध्ये ती पडते. परंतु, तिला शेवटी नाम भक्तीचा मार्ग सापडतो. भगवंताच्या नामाचा आधार घेत ते आपलं पुढील जीवन मार्गक्रमण करते.
संत कान्होपात्रा यांची नाम भक्ती
संत कान्होपात्रा यांची नाम भक्तीवर अतूट श्रद्धा आहे. ती नाम भक्तीच्या मार्गे निश्चय भक्ती करतात. परमेश्वरा नामामुळेच तिला सिद्धता प्राप्त होते. असा सिद्धांत त्या मांडतात.
ज्याचे घेता मुखी नाम । धाकी पडे काळ यम ।।
ऐसी नामाची थोरी । उद्धरिले दुराचारी ।।
नामे दोष जळती । नामे पापी उद्धरती ।।
नामामुळेच सर्व पापी, दुराचारी उद्धार पावतात असा सिद्धांत आपल्या अभंगातून त्या व्यक्त करतात. ज्याला या संसारसागरातून मुक्त व्हायचे आहे, त्यांनी भगवंताचे नाम स्वीकारावे, असा संदेश त्या आपल्या अभंग वाणीतून देतात. योग, याग, वेदाध्ययन, शास्त्राभ्यास यांनी ईश्वरभक्ती शक्य होईल, पण मला ईश्वर फक्त खèया भक्ताचीच हाक ऐकतो, असे त्यांचे सांगणे आहे.
संत कान्होपात्रा यांची प्रेम सुख भक्ती
भगवंताचं नाव अतिशय प्रेमानं घेतलं तर प्रत्येक मनुष्यमात्राच्या जीवनामध्ये प्रेम सुखाचा अनुभव सुरू होईल. त्या भक्ती प्रेमामध्ये, त्या प्रेम सुखामध्ये तो आनंदाने आपले जीवन व्यतीत करीन असा भाव कान्होपात्रा आपल्या अभंगाद्वारे व्यक्त करतात.
योग याग तपे करिता भागली ।
तीच ही माउली विठेवरी ।।
न येई ध्यानी साधिता साधनी ।
भक्ताशी निर्वाणी धावतसे ।।
चारी वेद साही शास्त्री शिणली ।
कान्होपात्रा लाधली प्रेमसुखे ।।
Saint Kanhopatra : योग, याग, तप, साधना करूनही ही विठाई माउली आतापर्यंत भेटली नाही, समजली नाही. तोच भगवंत निर्वाणीची भक्ती करून भगवंताला आपले करून घेतले. त्याला समजण्यासाठी चारी वेद, साही शास्त्र थकून गेली. त्या भगवंताला कान्होपात्रांनी मात्र प्रेमसुखामध्ये बांधून ठेवलं. अशी ही संत कान्होपात्रा ईश्वराची एक श्रेष्ठ भक्त आहे. आर्त भक्ती आणि उत्कट करुणरसाचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून पाहायला मिळतो.
या रे या रे लहान थोर । याती भलत्या नारी नर ।।
न करावा विचार । चिंता कवनाची ।।
असा संदेश त्या सर्वांना भक्तिमार्गामध्ये येण्यासाठी देतात.
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००