चार विधानसभेतील आघाडीने पडोळेंच्या विजयाचा मार्ग सुकर

    दिनांक :05-Jun-2024
Total Views |
रवींद्र तुरकर
 
गोंदिया, 
Bhandara-Gondia Lok Sabha Election : गोंदिया विधानसभा क्षेत्रात अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तर तिरोडा विधानसभा क्षेत्रात भाजपचे आ. विजय रहांगडालेंसह समर्थकांनी सुनिल मेंढे यांना आघाडी मिळवून देण्यात प्रयत्नांची पराकष्टा केली, मात्र इतर चार विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना मिळालेल्या निर्णायक आघाडीने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
 
 
Padole
 
सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या Bhandara-Gondia Lok Sabha Election भंडारा-गोंदिया लोकसभेची निवडणूक सुरवातीपासून अंत्यत चुरशीची ठरली. राजकीय वारसा नसतानाही लोकसभेसाठी नवखा उमेदवार कॉग्रेसने प्रशांत पडोळे यांच्या रुपाने दिला. विद्यमान खा. सुनिल मेंढे यांच्या उमेदवारीला विरोध व जनमानसात नाराजी असतानाही त्यांना भाजपने तिकीट दिले. भाजपसह महायुतीच्या घटक पक्षांना निवडणूक विकासाच्या मुद्यावर नेण्यात अपयश आले. जनमानसात फारशी ओळख नसतानाही पडोळे यांना गावोगावी सहानुभूती मिळत गेली. धनशक्ती विरूद्ध जनशक्ती असा प्रचार मतदारांमध्ये बिंबवण्यात पडोळे समर्थक यशस्वी झाले. गोंदिया, तिरोडा वगळता अर्जुनी मोर, साकोली, भंडारा, तुमसर या विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळविण्यात कॉग्रेस समर्थकांना यश आले. अर्जुनीत 20658, साकोली 27366, भंडारा 22853 व तुमसर विधानसभा मतदार संघात 9016 मतांनी पडाळे यांनी आघाडी घेतली. गोंदियात मेंढेंना 35499 व तिरोड्यात 8938 मतांची आघाडी मिळाली.
 
 
 
Bhandara-Gondia Lok Sabha Election : विशेष म्हणजे तुमसरात माजी आमदार तथा विकास फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चरण वाघमारे यांनी पडोळे यांना त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह समर्थन देत त्यांचा प्रचार केला. मात्र येथे पडोळेंना अपेक्षित आघाडी मिळवून देण्यात वाघमारेंना यश आले नाही. भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ असताना मताधिक्यात वाढ होईल असे अपेक्षित होते. मात्र 2019 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत गोंदिया व तिरोड्यात आघाडी कमी झाली. अनुक्रमे 38000 व 18000 पेक्षा अधिकची आघाडी मेंढेंना होती. बॅलेट मतदानातही मेंढे माघारले. मेंढेंना 3811 तर पडोळेंना 5735 मते मिळली. बसपाचे संजय कुंभलकरांना 25462 तर वंचितचे संजय केवट यांना 24858, काँग्रेसचे बंडखोर सेवक वाघायेंना 13103 आणि 10268 मतदारांनी नोटाला पसंती दिली. सुरवातीच्या चार फेर्‍यांमध्ये मेंढेंनी तर पाच, सहाव्या फेरीत पडोळेंनी आघाडी घेतली. 7, 9, 12 व्या फेरीत पुन्हा मेंढे आघाडीवर आले. 13 ते 27 फेर्‍यांमध्ये पडोळेंनी सलग आघाडी घेतली. 28 व 30 व्या फेरीत मेंढे तर 29, 31, 32 व्या फेरीत पडोळेंनी आघाडी घेत 37,380 मतांनी विजय मिळविला. अनुशाषीत व संघटीतपणे कार्य करणार्‍या भाजपला पराभव पत्करावा लागला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कार्यप्रणाली बघता आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत भाजपाचा परंपरागत मतदाता व्यक्त करीत आहे. निवडणुकीत कुणी, कसे व कुणासाठी किती प्रभावीपणे काम केले आहे हे लपून राहीले नाही, याची मिमांसा होणेही महत्वाचे ठरणार.