...अखेर बजाज रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरचे यशस्वी लाँचिंग

10 Jul 2024 19:52:22
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Bajaj Railway Flyover Girder : शहरातील बजाज चौकात असलेल्या आचार्य विनोबा भावे रेल्वे उड्डाण पुलाच्या गर्डरचे मंगळवार 9 रोजी रात्री उशिरा ते बुधवारी पहाटेपर्यंत यशस्वीपणे लाँचिंग करण्यात आले. त्यामुळे उर्वरित कामे करणे सोपे होणार आहे. दरम्यान, दीर्घ प्रतीक्षेनंतर एक-दोन महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
 
 
jhjhj
 
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर बजाज चौकात पूल बांधण्यात आला. नंतर या रेल्वे मार्गावर इलेक्ट्रिक इंजिन गाड्यांची वाहतूक सुरू झाली. त्यासाठी 1990 मध्ये छोटा पूल पाडून नवीन पूल बांधण्यात आला. त्यानंतर शहराचा विस्तार झपाट्याने होऊ लागला. सावंगी रुग्णालय, हिंगणघाट मार्गावरील फार्मसी महाविद्यालय, भूगाव येथे एव्होनिथ मेटल कंपनी यामुळे परिसराचा विस्तार वाढला. त्यामुळे या पुलावरून ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या वाढली. अशातच पुलावरील वाहतूक नेहमीच विस्कळीत होत होती. त्यामुळे पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी होऊ लागली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली होती. पुलाच्या कामाला 15 फेब्रुवारी 2015 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर 2016 मध्ये कामाला सुरूवात झाली. पूल मंजूर झाल्यानंतर कामालाही सुरुवात झाली. या कामाचे कंत्राट अहमदनगर येथील एम. शेख एंटरप्रायझेस या कंपनीला देण्यात आले होते.
 
 
 
जुन्या पुलाची देखभाल करून त्याच्या बाजूला नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल्वे मार्गाच्या दोन्ही टोकांना पूल बांधण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे मार्गाच्या वरच्या भागात टाकण्यात येणार्‍या गर्डरचे डिझाईन तयार केले होते. मात्र, त्याला रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली नाही. अखेर बॉलस्टरिंग गर्डर रद्द करून ओपन वेब गर्डर बांधण्यात आले. त्याला रेल्वे प्रशासनाने 19 जून 2019 रोजी मान्यता दिली. हे कामही पूर्ण झाले. मात्र, त्यापूर्वी रेल्वे मार्गाच्या वरच्या भागात ओपनवेब गर्डर टाकण्याचे काम तीन वेळा रद्द करावे लागले. अखेर, मंगळवारी रात्री 12 वाजतापासून बुधवार 10 जुलैच्या सकाळपर्यंत गर्डरचे काम यशस्वीरित्या करण्यात आले. आता पुलावरील सिमेंट रस्ता, नाली, दिवे व इतर कामे पूर्ण करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
 
 
यावेळी पुलाचे काम पुर्ण करण्यासाठी माजी खासदार रामदास तडस यांनी संसदेत प्रश्‍न उपस्थित करीत पाठपुरावा केला. मात्र, पूल पुर्ण होताना खा. अमर काळे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0