तभा वृत्तसेवा
वर्धा,
silk production निसर्गाचा लहरीपणा कधी अस्मानी तर सुलतानी संकटातून हातातोंडाशी आलेले पीक हातातून जात असल्याने पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून हिंगणघाट तालुक्यातील आर्वी छोटी येथील युवा शेतकरी विद्याधर खोडे यांनी 10 लाखाचे भरघोस रेशीम उत्पादन घेतले.
रेशीम उद्योग सुरू करण्याआधी खोडे खरीप हंगामामध्ये कापूस, सोयाबिन, तूर अशा पारंपरिक पिकांची लागवड करून उत्पादन घेत होते. परंतु, खर्च वजा हाती काही शिल्लक राहत नव्हते. यानंतर त्यांनी पीक पद्धतीमध्ये बदल करीत भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरूवात केली. परंतु, अनेकदा अवकाळी पावसाचा फटका बसून हाती आलेले पीक उध्वस्त होत होते. शेतकरी विद्याधर खोडे यांना रेशीम शेतीची माहिती भोजराज खोडे व अरुण जगताप यांच्याकडून मिळाली. सन 2021-22 मध्ये मनरेगा अंतर्गत रेशीम तूती लागवड करून रेशीम शेती करण्यास सुरूवात केली. silk production पहिल्याच वर्षी पहिल्या पिकामध्ये 95 किलो कोष उत्पादन करून निव्वळ नफामधून 55 हजार रुपयांमध्ये कोष विक्री केली. कच्चे ताडपत्रीचे किटक संगोपनातून विक्रमी कोष उत्पादन करून नफा मिळविला. मनरेगा योजनेमधून त्यांनी पक्के किटक संगोपनगृह बांधकाम करून 4 ते 5 बॅचेस मधून प्रत्येक बॅचेसला 80 ते 90 हजार रुपयांचा आर्थिक मोबदला कमवित आहेत. आज त्यांच्याकडे 12 बॅचेस असून त्यामधून 10 लाखांचे वार्षिक उत्पन्न घेत आहेत. मनरेगा योजनेतून खोडे यांना मिळालेली आर्थिक साथ यामुळे त्यांचा शेती करण्याचा दृष्टिकोन बदलेला असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. खोडे यांनी रेशीम शेतीमध्ये केलेली प्रगती पाहून गावातील अनेक शेतकरी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहे.