मौल्यवान वस्तूंच्या स्थानांतरणासाठी उघडले रत्न भंडार

18 Jul 2024 17:00:42
पुरी, 
Jagannath Temple : तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग रूममध्ये मौल्यवान वस्तू स्थानांतरित करण्यासाठी बाराव्या शतकातील जगन्नाथ मंदिराचे रत्न भंडार आज दुसर्‍यांदा उघडण्यात आले. एकाच आठवड्यात रत्नभंडार उघडण्याची ही दुसरी वेळ आहे.
 
 
RATN
 
 
सकाळी 9.51 वाजता रत्न भंडार उघडण्यात आले. भगवान जगन्नाथ आणि त्यांच्या भाऊ व बहिणीची आरती झाल्यानंतर ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या पर्यवेक्षक समितीने मंदिरातील रत्न भंडारात प्रवेश केला. रत्न भंडाराच्या आतील खोलीत असलेल्या मौल्यवान वस्तू स्थानांतरित करण्याची प्रकि‘या सुरळीत पार पडावी यासाठी आम्ही भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद मागितला, असे या पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. बिस्वनाथ रथ यांनी रत्न भंडारात प्रवेश करण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
 
 
46 वर्षांनंतर 14 जुलै रोजी पहिल्यांदा हे रत्न भंडार उघडण्यात आले. यावेळी त्याच्या बाहेरील खोलीत असलेल्या मौल्यवान वस्तू स्ट्राँग रूममध्ये हलवण्यात आल्या होत्या. मौल्यवान वस्तूंच्या स्थानांतरण प्रकि‘येवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती न्या. रथ यांनी पुरीचे राजे आणि गजपती महाराज दिव्यसिंह देव यांना केली होती.
 
 
केवळ अधिकृत व्यक्तींनाच पारंपरिक पोशाखात रत्न भंडारात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली, असे पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ स्वेन यांनी सांगितले. मौल्यवान वस्तू स्थानांतरित करण्याचे काम आज न झाल्यास मानक संचालन प्रकि‘येप्रमाणे ते केले जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाईल, असे स्वेन म्हणाले.
Powered By Sangraha 9.0