ऑलिम्पिकची वारी

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
वेध
- महेंद्र आकांत
'Olympic Games' : ‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा’ जगाच्या पाठीवरील सर्वांत मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत सहभागी होता यावे आणि आपल्या देशासाठी एका ना एक तरी पदक प्राप्त करावे, अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते. तसे प्रयत्नही असतात. नाही काही तर, किमान सहभागी होता यावे, यासाठी खेळाडूंचा अट्टहास असतो. या स्पर्धेतील यशापयशावरही संबंधित देशाचे जगातील वर्चस्व सिद्ध होत असते. भारतीय खेळाडूंचेही आपल्या वर्चस्व सिद्धतेसाठी इच्छा आणि तसे प्रयत्नही असतात. मात्र, जगात वर्चस्व राखणार्‍या देशांच्या तुलनेत भारतीय खेळाडू या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर पात्र होत नाहीत. तथापि, अलिकडच्या काळात जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून खेळाकडे विशेष दिले जात आहे.
 
 
Modi
 
विशेषत: आशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लायक असलेल्या खेळाडूंकडे जास्त लक्ष दिले जात आहे. त्यांच्यासाठी विविध योजना आणि प्रकल्प हाती घेतले जात आहेत. ग्रामीण भागातून आणि समाजाच्या शेवटच्या घटकापासून उत्कृष्ट खेळाडू निवडून त्याला परिपक्व आणि आंंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू म्हणून तयार करण्यासाठी ‘खेलो इंडिया’सारख्या इतरही अनेक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. हळूहळू का होईना भारत या क्षेत्रात प्रगतीच करीत आहे. याआधी ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग म्हणजे एक ट्रिप समजली जात होती. खेळाडू सहभागी व्हायचे म्हणून सहभाग घेत होते. खेळाडूंचा इव्हेंट सुरू असताना त्यांचे प्रशिक्षक, व्यवस्थापक व सहकारी खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा स्थळी उपस्थित न राहता शॉपिंग किंवा आजूबाजूची पर्यटन स्थळे पाहण्यासाठी गेलेले असायचे. आता तसे राहिलेले नाही. पूर्ण ताकदीनिशी खेळाडू आणि प्रशिक्षक व इतर पथक सहकारी स्पर्धेत सहभागी होत असल्याचे समाधानकारक चित्र दिसते आहे. नुसता सहभागच नव्हे तर पदकासाठी झुंजही देत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
'Olympic Games' : प्रारंभीच्या काळात ऑलिम्पिकच्या हॉकी खेळातच भारताला आपला दबदबा निर्माण करता आला होता. भारताने आतापर्यंत या स्पर्धेतील हॉकी खेळात आठ सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण 11 पदकांची कमाई केली आहे. ही 11 पदके मिळून भारताने आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या इतिहासात एकूण 28 पदकांची कमाई केली असून यातील बहुतांश पदके ही खेळाडूंच्या वैयक्तिक तयारीच्या आधारे मिळाली आहेत. भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण 9 ऑलिम्पिक सुवर्णपदके जमा झाली आहेत. त्यापैकी 8 पदके ही एकट्या हॉकी खेळातील आहे; उर्वरित एक सुवर्णपदक नेमबाजीमधील आहे. हे वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकाविण्यासाठी आपल्याला सुमारे 100 वर्षे प्रतीक्षा करावी लागली होती. आताही ही प्रतिक्षा पुन्हा आहे. सुवर्णाचा हा दुष्काळ अभिनव बिंद्राने दूर केला आणि जागतिक नकाशावर सुवर्णपदक विजेता म्हणून भारताचे नाव रोशन केले होते. अभिनवने पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात बाजी मारून देशवासीयांना सोनेरी यशाचा आनंद मिळवून दिला होता. स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक पदक कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये भारताला मिळवून दिले होते. त्याआधी नॉर्मन प्रिचार्ड यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत 1900 सालच्या ऑलिम्पिकमध्ये दौड स्पर्धेत भारतासाठी दोन रौप्यपदक जिंकले होते. मल्ल खाशाबा नंतर भारताला वैयक्तिक पदकाचा आनंद टेनिसपटू लियांडर पेसने मिळवून दिला होता. त्याने 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक हस्तगत केले होते. लियांडरपाठोपाठ कर्नाम मल्लेश्वरी, राज्यवर्धन सिंह राठोड, विजेंदर सिंह, सुशील कुमार (दोन वेळा), विजय कुमार, सायना नेहवाल, मेरी कोम, गगन नारंग, योगेश्वर दत्त हे खेळाडू भारतीय वैयक्तिक पदक विजेते ठरले आहेत.
 
 
'Olympic Games' : यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारतीय खेळाडू जोमाने सहभागी होत आहेत. त्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिले आहे. भारताने जरी जोमाने तयारी केली असली, तरी इतर देशही तयारीच्या बाबतीत मागे नाहीत. त्यांच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या तुलनेत भारतीय खेळाडू कितपत टिकाव धरून बाजी मारतात, हे आता बघावे लागणार आहे. पंढरीच्या वारीप्रमाणेच आता खेळाडूंनी या पाच वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिक वारीत सहभागी होणार आहेत. भारतीय पथकातील हॉकी संघासह इतर खेळांमध्ये वैयक्तिक बाबतीतही खेळाडू चांगली कामगिरी करील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊ या...! 
 
- 9881717803