मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा उपोषणवर

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी
 
जालना, 
Maratha reservation : कुणबींना मराठा समाजाच्या रक्ताचे नातेवाईक म्हणून मान्यता देण्याच्या मसुद्याच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांनी शनिवारी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले. जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात उपोषण सुरू करताना ते म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्यावर महाराष्ट्र सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने आपल्याला हे पाऊल उचलावे लागले आहे.
 
 
Jarange
 
याआधी जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्यावर उपोषण सुरू केल्यानंतर सहा दिवसांनी ते स्थगित केले होते आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याची मुदत दिली होती. शनिवारी जरांगे यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकारने आश्वासन न पाळल्याने मला हे उपोषण सुरू करावे लागले. शेवटच्या श्वासापर्यंत मी हे उपोषण सुरू ठेवणार आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यात मराठा समाजाने आगामी विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. बेमुदत उपोषणादरम्यान 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान राज्यव्यापी दौरा करणार आहे.
 
 
Maratha reservation : मी रुग्णवाहिकेतून महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि सभांना संबोधित करणार आहे. त्यानंतर 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान अंतरवली सराटीमध्ये विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी अनेक बैठका होणार आहेत. 29 ऑगस्ट रोजी समाजाने कोणताही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही कोणताही उमेदवार उभा करणार नाही. पण, त्यानंतर आम्ही मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍यांना पराभूत करण्यासाठी आणि त्याच्या बाजूने असलेल्यांना पाठिंबा देऊ, असे जरांगे यांनी सांगितले.