‘आत्मनिर्भर नारी, बांबू लेडी’

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
- मुंबई वार्तापत्र
 
नागेश दाचेवार
चंद्रपूरसारख्या मागास आणि दुर्गम भागातील बांबू कलेतून आत्मनिर्भर झालेली एक नारी, जगभरात ‘बांबू लेडी’ नावाने ओळखली जावी, ही बाब त्या महिलेसाठी आणि चंद्रपूरकरांसाठी खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. बांबूच्या साहाय्याने कल्पक आणि सुबक अशा कलाकृती तयार करून जगभरात नावलौकिक प्राप्त करणार्‍या ‘बांबू लेडी’ म्हणजे Meenakshi Valke मीनाक्षी वाळके होय! विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली ही ‘बांबू लेडी’ आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे; ती आपल्या नव्या आलेल्या ‘बांबू रे बांबू’ या कविता संग्रहामुळे.
 
 
Meenakshi Valke
 
Meenakshi Valke : अलिकडे नव्या दृष्टीने बदलत्या जगाच्या गरजा ओळखून प्रयोगशील लेखन होताना दिसत नाही. पारंपरिक लेखनातही उदासीनता जाणवते. वाचन संस्कृतीला आव्हाने देणार्‍या काळात दुर्लक्षित विषयावर काही प्रयोग करता येईल का? ही आगळीवेगळी संकल्पना घेऊन साकारलेला एक काव्यसंग्रह नुकताच मुंबईत दाखल झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच ‘बांबू रे बांबू’ नामक पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘बांबू रे बांबू’ या पुस्तकाने मराठी साहित्याला नवा विषयच दिला नाही, तर नवे प्रयोग आणि संकल्पनेने मराठी साहित्य किती व कसे समृद्ध होऊ शकते, याचा आदर्श घालून दिला आहे, असेच वाटते. कारण ‘बांबू रे बांबू’ हा भारताचा बांबू विषयाला वाहिलेला पहिलाच काव्य संग्रह आहे. हा काव्य संग्रह एका साहित्यिक परंपरा नसलेल्या सामान्य बांबू कारागिराने साकारला आहे. गीत, गझल, अभंग, कलगीतुरा, हायकू, चारोळी, मुक्तछंद असे काव्य प्रकार या संग्रहातील 36 कवितांमध्ये वाचायला मिळतात. सर्वच कवितांमधून बांबूचा उपयोग, त्याची शेती, त्याचा पाषाण काल, मानवाशी संबंध, पारंपरिक उपयोग आणि लोकजीवनात त्याचे स्थान, पर्यावरणात स्थान आणि भूमिका, बांबूत झालेले बदल आणि प्रयोग, आधुनिक विज्ञानामुळे आलेले वेगळेपण, भारतातून झालेला प्रचार आणि उपेक्षा, उद्योग आणि आयटी क्षेत्रातील स्थान, औषधी निर्मितीत महत्त्व, बाहुली, राखी आणि ब्रश इतका पसारा मांडलाय. साधे सहज शब्द आणि सुरेल मांडणी यामुळे या कविता वाचत राहाव्या अशा वाटतात. यात काल्पनिक काहीच नाही. जे काही आहे ते सर्व शास्त्रोक्त आणि संदर्भ आहेत. अत्यंत अभ्यासपूर्ण असा हा जणू बांबूचा काव्यमय विश्वकोश वाटून जातो. एकूण 36 कवितांमध्ये सुमारे 11 कविता या बाल कविता आहेत. त्या निक्षून त्यांच्यासाठीच आहेत. कवयित्रीने आपली भूमिका मांडताना याबद्दल स्पष्टच केले आहे. ‘येणार्‍या नव्या पिढीला बांबू कळावा आणि पुन्हा तो जनमानसात रुळावा म्हणून उज्ज्वल भविष्यासाठी हा खटाटोप केला आहे,’ असे त्या म्हणाल्या. आपल्या मर्यादा स्वीकारून कवयित्रीने हा संग्रह वाचकांच्या हवाली केला आहे.
 
 
Meenakshi Valke : विज्ञान शाखेतील बारावी उत्तीर्ण एवढे शिक्षण आणि अवघे 31 वयोमान असलेल्या या कवयित्रीची पुस्तकाइतकीच रंजक आणि प्रेरक कथा भावून जाते. मीनाक्षी मुकेश वाळके असा या कवयित्रीचा परिचय आहे. सावरगाव या छोट्याशा खेड्यात वीटभट्टीच्या पालावर मीनाक्षी यांचा जन्म झाला. पुढे मनाविरुद्ध लग्न लावून दिले गेले. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले. नवर्‍याची परिस्थिती संघर्षमय तितकीच बेताची. म्हणून कलात्मक दोर्‍यांचे दागिने बनविणे सुरू केले. ते सुरळीत चालले असतानाच दुसर्‍या प्रसूतीच्या वेळी मुलीचा मृत्यू झाला. हा धक्का जिव्हारी लागला. नवर्‍याने धीर दिला. इस्पितळातून घरी येताच बाराव्या दिवशी हाती बांबू आला. या हिरव्या सोन्याने मीनाक्षी यांनी स्वतःचे आणि सुमारे 1100 हून अधिक महिलांच्या जीवनाचे सोने केले. ‘बीआरटीसी’ या शासकीय संस्थेतून 70 दिवसांचे जुजबी प्रशिक्षण आटोपून 2018 पासून मीनाक्षीचे ‘मिशन आत्मनिर्भर नारी’ सुरू झाले. सुरुवातीला बांबू राखीत नवलाई आणण्याचा प्रयत्न केला. जागतिक दर्जाच्या सौंदर्य स्पर्धेसाठी बांबूचे मुकुट बनवून दिले. त्याच पंचतारांकित मंचावर मीनाक्षी सन्मानित झाल्या. वेगळ्या प्रयोगांची दखल घेतली जाते, हे कळल्यावर त्या बांबूतून कलात्मकतेचा नवा शोध घेऊ लागल्या. पॉकेट बॅच, तोरण, फ्रेंडशिप बँड, दागिने यात वेगळे प्रयोग केले. मीनाक्षी वाळके यांनी बांबूतून भारताचा पहिला ‘क्युआर कोड स्कॅनर’ बनवून देशाचे नाव उंचावले. हे सारे करत असताना कधी पालघरच्या वारली आदिवासी महिला तर कधी नक्षलग्रस्त भामरागडसारख्या भागातील माडिया, गोंड महिला यांना आपले कौशल्य शिकविले. भूतान आणि बांगलादेशच्या सीमेवर वीरभूम जिल्ह्यात क्लस्टरच्या 350 महिलांना आत्मनिर्भर केले. चार राज्यांत भटकंती करून सुमारे 1100 हून अधिक वंचित आदिवासी महिलांच्या उपजीविकेची गुरुकिल्ली दिली. अडीच वर्षांच्या मुलाला सांभाळत हे दिव्य त्या पेलत आल्या. मीनाक्षी यांच्या कलाकृती स्वबळावर सहा देशांत पोहोचल्या. अगदी इंग्लंडच्या भारतीय दूतावासातसुद्धा मीनाक्षी यांना ‘आयआयडब्लू’ संस्थेने इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘शी इन्स्पायर्स अवॉर्ड’ देऊन गौरविले. इंडो कॅनेडियन आर्ट्स अ‍ॅण्ड कल्चरल इनिशिएटिव्ह संस्थेने ‘वर्च्युअल वूमन हिरो’ पुरस्काराने सन्मानित केले. भारतीय स्त्री शक्तीचा ‘तेजस्विनी’ सन्मानही त्यांना प्राप्त आहे.
 
 
राहायला स्वतःचे घर नाही, काम करायला पुरेशी जागा नाही आणि अद्ययावत यंत्रसामग्री असे नावालाही नाही. अशात मीनाक्षी यांनी बांबू डिझाईनमध्ये केलेले प्रयोग दखलपात्र ठरले. त्यामुळेच कारगिल इंडिया या कंपनीने त्यांच्यावर ‘ताई’ नावाचा प्रेरक लघुपट बनविला. शेतकरी पृष्ठभूमी असलेल्या मीनाक्षी वाळके यांना ‘कोण होणार करोडपती’ या शो मध्ये सेलिब्रिटी गेस्ट म्हणून, शुभांगी गोखले आणि विभावरी देशपांडेसारख्या दिग्गज अभिनेत्रींसोबत मान मिळाला. गोंडवाना विद्यापीठाने मीनाक्षी यांना ‘बांबू’ हा विषय पदवीला शिकविण्यासाठी अभ्यागत प्राध्यापक म्हणून संधी दिली आहे. मीनाक्षी यांचा प्रवास गुळगुळीत नसून कटांग बांबूप्रमाणेच आहे, असे म्हणायला हरकत नाही. कुणापुढे हात पसरायचा नाही, या स्वाभिमानाने त्यांचा ‘बांबू रथ’ पती मुकेश यांच्या सोबतीने पुढे जातोय. त्यातल्या एका टप्प्यात ‘बांबू रे बांबू’ हा अद्भुत काव्य संग्रह साकारला आहे. उच्चशिक्षितांमध्येसुद्धा बांबूबद्दल गंभीर अज्ञान आणि अनास्था असल्याचे दिसल्यामुळे हा संग्रह साकारला असल्याचे मीनाक्षी वाळके यांचे म्हणणे आहे. त्यांनी अर्पण पत्रिकेत स्पष्टच केले आहे. माझा मुलगा अभिसारप्रमाणेच येणार्‍या पिढीसाठी प्रेरणा आणि संदर्भ मिळावेत म्हणून... शहाणी माणसे बरेचदा एकमेकांना बांबू लावायच्या शोधात असतात. मात्र, मीनाक्षीसारखी अत्यंत सामान्य माणसे मेंदूतून बांबूची मशागत झाली पाहिजे आणि सोन्याचा धूर निघणार्‍या हिंदुस्तानात बांबूचाही सुवर्ण काळ आला पाहिजे, यासाठी अव्याहत अविरत प्रयत्न करतात.
 
Meenakshi Valke : मीनाक्षी यांना कुठल्या पुरस्काराची अपेक्षा नाही. मात्र, पर्यावरणपूरक शाश्वत विकासासाठी शिक्षणात बांबूची हिरवीगार बेटं फुलून यावीत, एवढेच त्यांची आशा आहे. मीनाक्षी यांचा बांबूसाठीचा हा आटापिटा खरोखर वाखाणण्यासारखा आहे. 
 
- 9270333886