नीट परीक्षेचा घोळात घोळ

    दिनांक :20-Jul-2024
Total Views |
अग्रलेख...
Neet Exam : वैद्यकीय प्रवेशाच्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचा घोळ काही केल्या संपत नाही. या संदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने आपल्या ताज्या निर्णयात 20 जुलैला दुपारी 12 पर्यंत नीट युजी परीक्षेचा निकाल केंद्रनिहाय आणि शहरनिहाय जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शनिवारी हा निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापासून रोखण्यात यावे तसेच ही पूर्ण परीक्षाच रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा सर्वोच्च निर्णय दिला आहे. असा महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय देत न्यायालयाने एकप्रकारे या परीक्षेचा निकाल जाहीर करू नये तसेच ही परीक्षा रद्द करत पुन्हा परीक्षा घ्यावी, ही मागणी एकप्रकारे फेटाळून लावली आहे. नीटच्या फेरपरीक्षेचा आदेश देण्यासाठी त्याबाबतचे ठोस पुरावे तसेच पेपरफुटीच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरातील नीटची परीक्षा प्रभावित झाली का, हे पाहणेही आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ही परीक्षा दिलेल्या देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना तसेच पालकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपणारा आदेश दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन करायला हरकत नाही. नीट पदवी परीक्षेचा पेपर फुटला, त्यात काही गैरप्रकार झाले, हे उघड आहे. या परीक्षेचे गांभीर्य आणि पावित्र्य घालवल्याचा ठपकाही न्यायालयाने ही परीक्षा घेणार्‍या यंत्रणेवर ठेवला आहे. नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर करू नये तसेच ही परीक्षा रद्द करत नव्याने परीक्षा घेण्यात यावी, ही मागणी व्यवहार्य आणि शहाणपणाची वाटत नाही. देशभरातील वैद्यकीय प्रवेशाच्या 1 लाख 8 हजार जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली, त्याला 23 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. त्यामुळे झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता ती परीक्षाच रद्द करून नव्याने परीक्षा घेण्यात यावी, ही मागणी वर्षभरापासून या परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी असलेले त्यांचे पालक यांच्यावर अन्याय करणारी म्हणावी लागेल.
 
 
Neet Exam
 
Neet Exam : नव्याने परीक्षा घेतो म्हटले तर त्याच्या तयारीसाठी आणखी किमान एक महिन्याचा वेळ जाईल आणि या परीक्षेचा निकाल जाहीर व्हायला आणखी एक महिना लागू शकतो. त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रकच कोलमडू शकते. आता या परीक्षेचा निकाल जाहीर झाला तरी समुपदेशन आटोपून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करायला आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तर अनेक वेळा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र संपून परीक्षेची वेळ आली तरी नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश होतच असतो. त्यामुळे उशिरा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असते. तो अन्य विद्यार्थ्यांच्या मागे पडतो. परीक्षेचा निकाल रोखून परीक्षा रद्द करावी तसेच नव्याने परीक्षा घ्यावी, ही मागणी रोगापेक्षा उपचार भयंकर अशा प्रकारची म्हटली तर ते चूक ठरू नये. नव्याने परीक्षा घेतली तर पुन्हा पेपर फुटणार नाही, परीक्षेत गैरप्रकार होणारच नाही, याची खात्री कोणतीही विशेषत: परीक्षा घेणारी सरकारी यंत्रणा देऊ शकते का, याचे उत्तर नकारार्थी आहे. नीट परीक्षेचे जे पेपर फुटले ते देशभर फुटले की काही विशिष्ट भागात फुटले, याचाही विचार झाला पाहिजे. पेपरफुटीची ही घटना बिहारमधील पाटणा आणि हजारीबागपुरतीच मर्यादित आहे, असे मान्य करत गुजरातच्या गोधरा येथे पेपरफुटीची अशी घटना घडल्याचे दिसत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे देशभरात नीटची परीक्षा घेणार्‍या एनटीए या यंत्रणेला या परीक्षेचा पेपर फुटल्याचेच मान्य नाही. या परीक्षेचा पेपर फक्त 45 मिनिटे आधी फुटला, म्हणजे विशिष्ट परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना तो फक्त 45 मिनिटे आधी मिळाला, असा एकप्रकारे पेपरफुटीचा दुजोरा देणारा पण त्याची तीव्रता कमी करणारा हास्यास्पद दावा सरकारी वकील न्यायालयात करतात. परीक्षा पूर्णपणे निर्दोष झाली, कोणताही गैरप्रकार या परीक्षेत झाला नाही, असा त्यांचा दावा आहे. नीटची परीक्षा सकाळी 10.15 ची असताना पेपर सकाळी 8 वाजून 2 मिनिटांनी फुटल्याचे तसेच त्याचा फायदा फक्त 150 विद्यार्थ्यांना मिळाल्याचे सरकारी वकिलांनी सुनावणीत मान्य केले होते. दुसरीकडे नीट परीक्षेचा पेपर एक दिवस आधी फुटल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आल्याचा दुसर्‍या पक्षाच्या वकिलाचा दावा आहे. यामुळे नीटची परीक्षा घेणारी एनटीए ही यंत्रणा पेपर फुटल्याचे कितीही नाकारत असली, तरी तो पेपर फुटल्याचे यातून स्पष्ट होते. या परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी सीबीआयकडे आहे. सीबीआयने देशभरात अनेक ठिकाणी छापे मारून अनेक जणांना अटकही केली आहे. त्यामुळे एनटीए ही यंत्रणा मान्य करत नसली, तरी नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचे तसेच त्यात गैरप्रकार झाल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. देशातील अन्य घोटाळ्यांची ज्या पद्धतीने चौकशी केली जाते, त्याच पद्धतीने सीबीआयने या प्रकरणाची संथगतीने चौकशी करू नये. कारण, हा मुद्दा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित आहे. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे, या परीक्षेचा पेपर फुटल्याचे आता लपले नाही. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या नावावर दुसर्‍याने परीक्षा दिल्याच्याही घटना घडल्या आहेत. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना उत्तरे सांगितल्याचा, त्यांना कॉपी करू देण्याच्याही घटना घडल्याचे आरोप होत आहेत.
 
 
Neet Exam : पेपरफुटीची व्याप्ती किती आहे, याचा अदमास घेण्यासाठी न्यायालयाने या परीक्षेचा केंद्रनिहाय आणि शहरनिहाय निकाल लावण्याची जी सूचना केली आहे, ती स्वागतार्ह म्हणावी लागेल. नीट परीक्षेच्या आतापर्यंतच्या निकालाची जी सरासरी टक्केवारी आहे, त्यापेक्षा जास्त टक्केवारी काही विशिष्ट गावात आणि केंद्रात आढळून आली, तर पेपरफुटीचा सर्वाधिक परिणाम या केंद्रात आणि गावात झाल्याचे दिसून येईल. यामुळे विद्यार्थ्यांची गोपनीयता धोक्यात येईल, असा आक्षेप सरकारी वकिलांनी घेतला; त्यावर विद्यार्थ्यांची ओळख लपवण्यासाठी त्यांना डमी क्रमांक देऊन निकाल लावण्याचा पर्याय खुला असल्याचे न्यायालयाने सुचविले. नीट परीक्षेतील पेपरफुटीची घटना ही अतिशय अक्षम्य असून यासाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही; मात्र त्याचवेळी कोणताही दोष नसलेल्या आणि वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना याची शिक्षा मिळू नये, हे सर्वांनाच मान्य असेल. म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाऊ नये. आपल्या देशात चोर सुटून जातात आणि संन्याशी फासावर लटकतात, ही वस्तुस्थिती आहे. नीट परीक्षेतील या गैरप्रकाराची सीबीआयने युद्धपातळीवर चौकशी पूर्ण करून दोषींना अटक केली पाहिजे तसेच त्यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करून जलदगती न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा होईल, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या देशात एखादे प्रकरण खूप गाजले की त्या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटतात. कारण, त्यांना तपासातील चौकशी यंत्रणांच्या निष्काळजीपणाचा तसेच कायद्यातील पळवाटांचा फायदा मिळतो, असा इतिहास आहे. चौकशी यंत्रणा असा निष्काळजीपणा जाणीवपूर्वक करतात की अनावधानाने तो त्यांच्याकडून होतो, हे सांगता येणार नाही. मात्र, कोणत्याही पद्धतीने निष्काळजीपणा झाला तरी तो मान्य करता येणारा आणि खपवून घेण्यासारखा नाही. नीट परीक्षेवर जी काजळी चढली ती लवकर दूर होऊन डॉक्टर बनून रुग्णांच्या सेवेचे स्वप्न पाहणार्‍या वैद्यकीय प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. या घोटाळ्यातील दोषी सुटणार नाही आणि निर्दोष भरडले जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची जबाबदारी आता सीबीआय आणि सर्वोच्च न्यायालयाचीच आहे.