महाराष्ट्रातील भक्ती चळवळ व अध्यात्म विचार

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
संत प्रबोधन
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
Bhakti in Maharashtra : धर्म व भक्तीचे व्यापकत्व स्पष्ट करताना भक्ती चळवळीच्या उदयामागची पृष्ठभूमी सखोलपणे व्यक्त करणारी आपली अध्यात्म परंपरा आहे. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ काळाच्या विविध टप्प्यातून कशी प्रवाही झाली, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील विविध भक्ती संप्रदायाचा परिचय व आचारधर्म संतांनी मांडला आहे. भक्ती चळवळीचे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, अध्यात्म तत्त्वज्ञान यावर संत साहित्याने अतिशय अचूकपणे भाष्य केले आहे. धर्म व भक्ती या संज्ञांची उकल करताना एक गोष्ट महत्त्वाची वाटते की, धर्माची बाब माणसाच्या उत्पत्तीसोबतच जुळलेली आहे, असा महत्त्वाचा उलगडा संत करतात. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली, तरी तिला नीती व तत्त्वज्ञानाची जोड ही प्रत्येक धर्माने दिलेली आहे.
 
 
diva
 
महाराष्ट्राच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पृष्ठभूमीचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रमुख बौद्ध, इस्लाम, हिंदू, ख्रिश्चन, इसाई या धर्मांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. आर्य आणि द्रविड संस्कृती या दोघांचाही विचार महत्त्वाचे मानतात. त्यात भक्ती चळवळीच्या उदयामागची कारणे राजकीय, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक पृष्ठभूमी याचा संत साहित्याने घेतलेला मागोवा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. भक्ती चळवळ एकूणच ज्या पृष्ठभूमीवर निर्माण झाली; त्यामध्ये विविध पंथांचे आध्यात्मिक व सांस्कृतिक योगदान हा महत्त्वाचा धागा वाटतो. समाजातील वैफल्यग्रस्तता, देवाची, पापकर्माची भीती, भक्तीचे स्थान, अघोरी भक्ती, भूतखेत यांना प्रसन्न करणारी भक्ती या सर्व बाबी संत विचारात घेतात. स्त्रियांना समाजातील दुय्यम स्थान, देवादिकांच्या जीवनातील घटना व प्रसंग या सगळ्या बाबी विचारात घेऊन मूर्तिपूजा, शाक्त, शैव शक्ती संप्रदाय, नरबळी, उत्सव, अंधश्रद्धा, भूतखेत या बाबींचा समाजातील रुजलेला विचार कारणीभूत ठरतो.
 
 
Bhakti in Maharashtra : ‘वारकरी संप्रदाय’ हा अद्वैत तत्त्वज्ञानावर आधारित असलेला संप्रदाय आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भक्ती संप्रदायांनी जसे नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, महानुभाव पंथ, आनंद संप्रदाय, रामदासी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय या सर्वांनी आपापल्या कालखंडामध्ये भक्तीचा मार्ग अधिक सुकर केला आहे. भक्ती चळवळीची पताका या प्रत्येकाने आपल्या खांद्यावर घेऊन वेगवेगळे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यातील वारकरी संप्रदाय आजतागायत खंबीरपणे उभा आहे. त्यामुळे भक्ती चळवळीतील वारकरी संप्रदायाचे स्थान हे आजही अढळ आहे, असा महत्त्वाचा विचार सर्व अभ्यासक अधोरेखित करतात. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही...
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ।
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य ॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षशी केला ।
गोरक्ष वोळला गहिनीप्रती ॥
गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ।
ज्ञानदेवा सार चोजविले ॥
 
 
प्रस्तुत उक्तीप्रमाणे आदिनाथांपासून चालत आलेली ही वारकरी संप्रदायाची परंपरा जवळजवळ 700 वर्षांपूर्वीपासूनचा हा वारकरी चळवळीचा वाहणारा झरा वेगवेगळ्या कालखंडातून वेगवेगळ्या शतकांच्या प्रवासातून फुलत गेलेला आहे. त्यामध्ये सर्वांचे आराध्य दैवत असणारा श्री विठ्ठल व भक्त पुंडलिक या दोन अनुबंधातून निर्माण झालेला आहे. त्यामध्ये नाथ संप्रदायाचे हटयोगी विचारापासून तर महानुभावांचा महानुभावी स्मरण भक्ती विचारापर्यंत सर्वांचा एकत्रित केलेला भक्ती पुष्पगुच्छ म्हणजे वारकरी संप्रदाय होय.
 
 
Bhakti in Maharashtra : संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहून या वारकरी संप्रदायाला अद्वैत तत्त्वज्ञान विचाराचा भक्कम आधार दिला. त्यानंतर संत एकनाथ, संत नामदेव, तुकोबा या संतांनी तर या वारकरी परंपरेची पताका अधिक उंच केली. संत नामदेवांनी ही पताका महाराष्ट्राबाहेर नेऊन पंजाबातसुद्धा फडकविली. महाराष्ट्रामध्ये आजही सर्वांच्या मुखोद्गत ही अभंगवाणी आहे. वारकरी संत परंपरा ही अतिशय शुद्ध, सात्त्विक व स्पष्ट असल्याने या संप्रदायाशी अनेक संप्रदायांनी जुळवून घेतले. महाराष्ट्राच्या या मातीमध्ये संत बहिणाबाई वारकरी परंपरेचा इतिहास परंपरा लिहिताना म्हणतात -
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ॥
नामा तयाचा किंकर । जेणे केला हा विस्तार ॥
नाथ दिला खांब तोचि मुख्य आधार ।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
 
 
Bhakti in Maharashtra : महाराष्ट्रातील भक्ती चळवळीतील वारकरी संप्रदायाने आपले तत्त्वज्ञान निश्चित केले आणि या तत्त्वज्ञानाच्या बळावर अद्वैत सिद्धांत मांडला. या अद्वैत सिद्धांताने आमचा विठ्ठल हा एकच आहे, तो आमच्या अंतरात्म्यामध्ये बसलेला आहे, याची साक्ष प्रत्येक अभंग व प्रत्येक ओवी वारकरी संप्रदायाची समाजाला देत असते. पंढरपूरचे आराध्य दैवत विठ्ठल आणि चंद्रभागा ही या संप्रदायाची भक्ती-मुक्तीची प्रमुख साधने आहेत. जो वारकरी असेल त्याने गळ्यामध्ये तुळशी माळ घालावी, कपाळाला बुक्का लावावा, मुखामध्ये ‘राम-कृष्ण-हरी’ हा मंत्र असावा, असा साधा आचारधर्म वारकरी संप्रदायाने मांडला.
 
 
Bhakti in Maharashtra : अध्यात्माच्या भक्ती चळवळीचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास व जीवन तत्त्वज्ञान हे खूप सात्त्विक सृजनशील आणि प्रत्येकाने अंगीकारावे असे आहे. प्रत्येक व्यक्तीने आपले मूल्यमापन केले तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये समाधानाचा व मनःशांतीचा भाव निर्माण होईल, इतकी ताकद त्या भक्ती संप्रदायामध्ये आहे.
समाधान ही तर अलौकिक बाब, परंतु तीसुद्धा संतांच्या विचारांच्या अभ्यासामध्ये प्राप्त होते. हा विश्वास संताच्या विचारांचा परामर्श घेताना व्यक्त करावासा वाटतो. संत विचाराची मांडणी करताना अतिशय प्रांजळपणे कबुली देता येईल की, महाराष्ट्रातील भक्ती चळवळ व वारकरी संप्रदाय हा सामान्य भक्तांचा जीवनाचा मूलाधार आहे. भक्ती विचार हा जीवन विचार आहे आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा विचार आहे.
 
 
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ॥
माणसाच्या जीवनातील दुःखाची वास्तवता आणि सुखाची क्षणभंगुरता ही संत तुकाराम मांडतात. जणू काही ते आपल्याच जगण्याची कथा सांगत आहेत, असे प्रत्येकाला वाटते, असा विचार संतांनी व्यक्त केला आहे. जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये दुःख येते, तेव्हा माणसाने खचून जाऊ नये. जेव्हा आनंदाचा क्षण असेल, तेव्हा मातून जाऊ नये, असा वास्तववादी विचार हेच संत मांडतात.
जगाच्या कल्याणा संताच्या विभूती ।
देह कष्टवीती परोपकारे ॥
 
 
Bhakti in Maharashtra : प्रबोधन परंपरेचा हा मुख्य स्थायीभाव संत मोठ्या ताकदीने मांडतात. वेद, उपनिषद, स्मृती आणि श्रुती यातून दिशा देत आलेला भक्ती चळवळीचा हा अध्यात्म विचार सामान्य समाजाचे जीवन समृद्ध व्हावे, असा विचार करताना दिसतो. भक्ती चळवळीने समाजाला काय दिलं? तर, जेव्हा सर्व मध्ययुगीन कालखंडातील विविध मुसलमानी आक्रमणास चिरडले होते. सांस्कृतिक अस्मिता धोक्यात आली होती. सर्व महाराष्ट्रीयन समाज अनागोंदीच्या नावाखाली वेगवेगळ्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक दडपणाखाली दडपून टाकला जात होता. तेव्हा भक्ती चळवळीतील या संतांनी आपली सांस्कृतिक वैभव असणारी भारतीय संस्कृती टिकून ठेवण्याचे महत्त्वाचे कार्य केले. एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. त्यांनी परोपकार आणि स्वकर्माचा आचारधर्म आपल्या लेखणीतून सातत्याने समाजासमोर दीपस्तंभाप्रमाणे तेवत ठेवला. सामान्य माणसाच्या जीवनाला आधार व अधिष्ठान निर्माण केले.
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
चालविल्या हाती धरूनीया ।
चालू वाटे आम्ही तुझाच आधार ।
 
 
भक्ती चळवळीतील वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान भगवंत पांडुरंग यांचा आधार तुकारामांच्या अभंगवाणीद्वारे आधाराचा भाव लेखिका खूप मोठ्या तन्मयतेने व्यक्त करतात. या चळवळीने प्रत्येकाचे हित जोपासले आहे.
हिताचा विचार बोलेलो ते काही तुमच्या हिता ।
 
 
Bhakti in Maharashtra : तुमच्या कल्याणासाठी जे काही बोललो असेल तर तुम्ही आनंदाने स्वीकारा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करून घ्या, असा वारकरी संतांचा विचार स्पृहणीय वाटतो. संत साहित्याच्या ग्रंथाची भाषा सुबोध व सर्वांना समजेल अशी आहे. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ व वारकरी संप्रदायाचा विषय हाताळताना महाराष्ट्रामध्ये भक्ती चळवळीमध्ये प्रामुख्याने इतर संप्रदायाचाही मागोवा घेणे हे महत्त्वाचे ठरते. संतांनी ग्रंथ साकारताना उभी केलेली प्रतिमाने आणि रूपक यांचा विचारही खूप महत्त्वाचा वाटतो. संतांच्या अनुभवसंपन्न सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेले ग्रंथ वाचताना मनाला एक वेगळ्या प्रकारचे सात्त्विक व वैचारिक भक्तीची अनुभूती देतो. भक्तीचा विचार असंख्य लेखकांनी वेगवेगळ्या विचारधारेतून उभा केलेला आहे. परंतु, वारकरी तत्त्वज्ञानाच्या, अध्यात्म अंगातून भक्ती चळवळ समजून घेणे, ही काळाची गरज आहे.
 
- 7588566400