वंदावे गुरुपद

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
- वैष्णवी कुलकर्णी
 
॥ गुरुपौर्णिमा विशेष ॥
 
Gurupurnima : आज आपल्याकडे अभावानेच गुरू-शिष्य परंपरेतील शिक्षण पद्धती अस्तित्वात दिसते. आपले घरदार सोडून, गुरुगृही निवास करत, गुरूच्या आज्ञेनुसार, त्याने सांगितलेल्या कसोट्यांवर खरे उतरत ज्ञान प्राप्त करणे आणि गुरूच्या मतांचा आदर राखत गृहस्थाश्रमात प्रवेश करून उत्तम प्रपंच करणे ही एकेकाळी भारतात नांदणारी संस्कृती होती. या संस्कृतीने अनेक गुरू पाहिले आणि गुरूंनी घडवलेल्या अनेक शिष्योत्तमांनी घडवलेला इतिहासही आपण पाहिला. आज काही मोजकी क्षेत्र वगळता हे चित्र अभावेच दिसते. गुरूच्या नावाखाली गैरफायदा घेणारे, श्रद्धेचा बाजार भरवून त्यावर पोळी भाजून घेणारे अनेक आहेत. असे असले तरी योग्य गुरू आणि योग्य शिष्य काय चमत्कार घडवून दाखवू शकतात हे सांगणारी काही उदाहरणेही आहेत. म्हणूनच आजच्या काळातही या परंपरेचे पाईक होण्याचा प्रयत्न होताना दिसतो.
 
 
guru
 
आपल्या संस्कृतीत दान सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. गुरू विद्यादान करत असतो. आपले ज्ञान इतरांना देत असतो. ज्ञान दिल्याने वाढते असे म्हणतात. म्हणूनच त्याचे शिष्य हा ज्ञानरूपी वसा सांभाळून त्याचा वारसा पुढे चालवतात. जुन्या काळात गुरुकुल पद्धत अस्तित्वात होती. आज ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ज्ञानदानाचे कार्य कोणत्याही पद्धतीने सुरू असले तरी गुरू हा त्यातला समान धागा आहे. गुरू शिष्याचे व्यक्तिमत्त्व घडवतो. या जगात टिकून राहण्यासाठी सज्ज करतो. गुरू कधीही हातचे राखून ठेवत नाही. तो शिष्यावर भरभरून प्रेम करतो. शिष्याला आपले मूल मानतो. त्याच्यावर संस्कार करतो. तो अत्यंत निरपेक्ष वृत्तीने विद्यादानाचे पवित्र कर्तव्य करत असतो. शिष्याचे यश हीच त्याची गुरुदक्षिणा. शिष्याचे कौतुक झाले की तो भरून पावतो. म्हणूनच गुरुपौर्णिमेला गुरूचा महिमा सांगितला जातो. गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. या दिवसाचे महत्त्व मोठे, महतीही मोठी. गुरुपौर्णिमेला शिष्य गुरूला भेटायला जातात, त्यांचे आशीर्वाद घेतात. ही गुरुमाउलीही शिष्याच्या भेटीने आनंदते, सुखावते. प्रत्येकाला गुरू वेगवेगळ्या रूपात भेटत असतो. वेगवेगळ्या विद्या शिकवत असतो. मात्र आपण कितीही ‘टेकसॅव्ही’ झालो किंवा ऑनलाईन वर्गांमध्ये रमलो तरी गुरूचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही आणि होणारदेखील नाही.
 
 
Gurupurnima : तसे पाहायला गेले तर विधात्याने प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गुणांनी उपकृत केलेले असते. प्रत्येकाच्या अंगी काही दोष असतात तसेच बरेच गुणही असतात. नित्याच्या परिचयात पालकांना मुलांच्या अंगीचे हे गुण जाणवतातच असे नाही. मात्र पारखी नजर असणारा गुरू मुलामुलींमधील हे गुण तत्काळ ओळखतो आणि त्याला बाहेर काढण्याचे काम करतो. गुरू साम, दाम, दंड, भेद या सर्व प्रकारांचा वापर करत शिष्याला पारंगत करण्याचा प्रयत्न करतो. विशेष म्हणजे हे काम अत्यंत नि:स्वार्थी वृत्तीने होत असते. माणूस घडवण्यासाठी, दैवी देणगीचा यथोचित वापर होण्यासाठी, व्यक्तिमत्त्व बहरण्यासाठी याची नितांत आवश्यकता असते. शिष्य केवळ अनुसरणाने बरेच काही शिकत असतो. गुरूचा सहवास त्याला अनेक गोष्टींचे अप्रत्यक्ष धडे देत असतो. परिस्थितीविषयी अवगत करत असतो. त्याचे अनुभवाचे बोल न शिकवताही बरेच काही सांगून जात असतात. म्हणूनच प्रत्येकाला पुढे जाण्यासाठी एखाद्या गुरूची आवश्यकता असते. प्रापंचिक आणि पारमार्थिक अशा दोन्ही प्रकारच्या प्रवासात मिळणारी त्याची साथ प्रवासाला योग्य दिशा देणारी ठरते. आज नानाविध अंगाने माहितीचे भांडार उपलब्ध होत असले, तरी ज्ञान मिळण्याची काही मोजकेच ठिकाणे आढळतात. गुरूचे चरण हे त्यातील एक विश्वसनीय ठिकाण आहे.
 
 
आज एखाद्याकडे समग्र माहिती असते, पण त्याचा नेमका कुठे आणि कसा वापर करायचा, हे ज्ञान गुरूशिवाय मिळत नाही. साहित्य, कला, विज्ञान, तंत्रज्ञान कुठल्याही क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळविण्यासाठी गुरूला पर्याय नाही. संपर्काची अनेक साधने आणि विद्याग्रहणाचे अनेक पर्याय समोर असले, तरी आजही गुरूचे स्थान अबाधित आहे. कारण गुरू कुठलेही ज्ञान आपल्यापर्यंत सोप्या शब्दात पोहोचवत असतो. ज्ञानावर त्याचे संस्कार झालेले असतात. एखाद्या विषयावर अभ्यास, मनन आणि चिंतन करून त्याने तो विषय समजून घेतलेला असतो. असा स्वत:ला समजलेला विषय दुसर्‍यापर्यंत पोहोचवताना तो आनंदी असतो. दुसर्‍याला हे ज्ञान देण्यामागे त्याची तळमळ असते. आपल्याला आकलन झालेल्या विषयावर विद्यार्थ्याने आणखी काम करावे, त्यावर अधिक संशोधन व्हावे आणि ज्योतीने ज्योत प्रज्वलित होत राहावी, ही सच्च्या गुरूची मनोधारणा असते. म्हणून शिष्य आपल्यापेक्षा मोठा व्हावा, त्याने त्रिखंडात कीर्ती मिळवावी या उद्देशाने तो काम करतो. शिष्याच्या प्रगतीवर त्याच्या या सकारात्मक भावनांचा परिणाम स्पष्ट दिसून येतो. म्हणूनच काळ बदलला तरी गुरूला पर्याय नाही.
 
 
Gurupurnima : आपल्याकडील गुरू-परंपरा बहुआयामी आहे. गुरूचे निवासस्थान, त्यातील शिष्याचा निवास आणि कठोर नियमांचे आचरण या सगळ्याच बाबी त्याच्या जडणघडणीसाठी आणि सामाजिक सलोख्याशी संबंधित आहेत. वडीलधार्‍यांबरोबर समवयस्कांमध्ये राहून इथे होणारे संस्कार मुलांना जगण्याच्या पद्धतींशी अवगत करायचे. आता आपण त्या वातावरणातून बाहेर आलो आहोत. मुले शाळेत शिकतात. मात्र असे असतानाही संस्कारांमध्ये बदल होणे अपेक्षित नाही. परिस्थितीच्या बदलत्या रेट्यामध्ये आजचे शिक्षण विद्यार्थी नव्हे तर परीक्षार्थी घडवत आहे. आता सगळ्याच घटांना एकसारख्या साच्यातून बाहेर काढले जातेय. सर्वांना एकाच तागडीत तोलू पाहतेय. अर्थातच याचे तोटेही समोर दिसत आहेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. गुरूची रत्नपारखी नजर प्रत्येकातील विशेष गुण चाणाक्षपणे हेरत असे. प्रत्येक मातीचा कस लक्षात घेऊनच त्याला पूरक साच्यात घडवले जात असे. म्हणूनच तयार होणार्‍या प्रत्येकाचा आकार वेगळा, रंग वेगळा, रूप वेगळे आणि अस्तित्व वेगळे असे. प्रत्येकाच्या अस्तित्वाला अर्थ देण्याचे काम असे विनासायास पार पडत असे. पण आता या संकल्पनेचे विकेंद्रीकरण झाले आहे. सकाळी शाळेत शिकायचे, दुपारी क्लासला जायचे, एखाद्या तिसर्‍याचे साहित्य अभ्यासाला पूरक म्हणूनच वापरायचे, गरज वाटल्यास घरातल्याचे सहाय्य घ्यायचे. म्हणजेच एक गुरू-एक शिष्य ही स्थितीच आता राहिलेली नाही.
 
 
गुरुगृही असल्यामुळे विद्यार्थ्याच्या चारित्र्याचा, व्यासंगाचा, वागणुकीचा, व्यवहारज्ञानाचा प्रभाव शिष्यांवर पडत असतो. हे संस्कार अगदी कळत-नकळत घडतात आणि तेच त्या कोवळ्या वयात आदर्श निर्माण करत असतात. आयुष्यभर दीपस्तंभासारखी साथ देत असतात. पण काळाच्या प्रवाहात हा प्रघात मागे पडला आणि शिक्षणाचा बाजार मांडणारी एक व्यवहारी व्यवस्था अस्तित्वात आली. पण याचा अर्थ असा नव्हे की, आज गुरुपदी बसवावे असे लोकच नाहीत. सगळीकडे पसरलेली भेसळीची कीड इथेही पसरली असली, तरी अनेक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वे आपल्या आयुष्यात येतात. त्यातील काही लोक तर निरिच्छ भावनेने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी झटत असतात. आज गुरूप्रती आदर कमी होतोय, ही वस्तुस्थिती आहे. गुरूला एकेरी संबोधण्यापर्यंत र्‍हास झालाय हे देखील वास्तव आहे. पैसा मिळविणे हे ईप्सित समोर ठेवून विद्यादान करणार्‍यांची संख्या वाढत आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. पण म्हणून सगळे संपले असे नाही. कल्पना आणि वास्तव या दोन विरुद्ध बाबी असतात. त्या सांधणे हे कर्मकठीण काम. पण काहींना ही किमया साधते आणि बदलत्या प्रवाहातही स्वत्त्व टिकवून प्रवास सुरू ठेवला जातो. आजही असे अनेक आदर्श आहेत.
 
 
Gurupurnima : आजही गतस्मृतींचा धांडोळा उलगडतो तेव्हा आपले शिक्षक, त्यांनी केलेला उपदेश आठवतो. शिक्षक अचानक रस्त्यात भेटले तर नकळत पायाला हात लावून नमस्कार केला जातो, जातीने विचारपूस केली जाते. वय आणि प्रगल्भता वाढत असताना शिक्षकांचा आठव अधिक गहिरा होत जातो. आजच्या पिढीलाही या अनुभूतीचा आनंद घेता यावा अशी इच्छा आहे. Gurupurnima गुरुपौर्णिमा इव्हेंट होता कामा नये. किमती भेटवस्तू, हार-फुलांचे गुच्छ देऊन गुरुपौर्णिमेचा इव्हेंट साजरा होईल, पौर्णिमा नाही. ही व्यासपौर्णिमा साजरी करायची तर दोघांची मनेे विशुद्ध हवीत. मनात प्रेमभाव दाटून यायला हवा आणि हा वसा पुढे चालवण्याचा संकल्प सोडायला हवा. दिल्याने वाढणारी ही एकमेव संपत्ती आहे.