कारवाईची टांगती तलवार असताना काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

    दिनांक :21-Jul-2024
Total Views |
मुंबई, 
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मते फुटली. क्रॉस व्होटिंग करणार्‍या आमदारांवर कारवाईची टांगती तलवार असताना, इगतपुरीचे काँग्रेस आमदार Hiraman Khoskar हिरामण खोसकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यां ठाण्यातील आनंदाश्रमात भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 

Hiraman Khoskar 
 
ही भेट अतिक्रमण संदर्भात होती, असे स्पष्टीकरण खोसकर यांनी दिले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत, असे विधान त्यांनी अलिकडेच केले होते. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसने ज्या आमदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला, त्यात खोसकर यांचाही समावेश आहे का, अशीही चर्चा आहे.
 
 
Hiraman Khoskar हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त केली होती. विधान परिषद निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी सांगितले, त्यांनाच मतदान केले. माझ्यासह 7 आमदारांना मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी सांगितले होते. ते आम्ही केले. जयंत पाटील यांना ज्या 6 आमदारांनी मतदान केले, त्यांची मते फुटली, त्यावर पक्षश्रेष्ठी का बोलत नाही, त्या 6 जणांवर कारवाई का करीत नाही, अशी विचारणा त्यांनी केली.
...अन्यथा माझी बदनामी थांबवा
मिलिंद नार्वेकर यांना 23 मते पडणार होती, त्यातील एक मत फुटले. नाना पटोले, के. सी. पाडवी यांच्यासह 7 जणांनी मिलिंद नार्वेकर याना मतदान केले. मी मराठीत मतदान केले, कुणाला संशय असेल, तर माझी मतपत्रिका कोर्टाचा आदेश घेऊन तपासावी आम्ही दोन जणांनी मराठीत मतदान केले, त्यामुळे मतपत्रिका सापडेल. मी दोषी असेल, तर माझी पक्षातून हकालपट्टी करा, अन्यथा माझी बदनामी थांबवा, असे खोसकर यांनी स्पष्ट केले.