ब्रह्मापुरीत वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

तळोधी वनपरिक्षेत्रातील दुसरी घटना

    दिनांक :25-Jul-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
नागभीड, 
tiger attack शेत काम करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने एका 51 वर्षीय महिलेच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना गुरूवार, 25 जुलै रोजी ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत येणार्‍या तळोधी वनपरिक्षेत्रातील देवपायली बिटातील नवानगर शेतशिवारात उघडकीस आली. जनाबाई जनार्धन बागडे असे मृतक महिलेचे नाव आहे. गेल्या दोन दिवसात या वनपरिक्षेत्रात वाघाने दोघांचा बळी घेतला. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. तळोधी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक 132 मध्ये जनार्धन बागडे यांचे शेत आहे. सद्या खरीप हंगाम सुरू असून, काही भागात रोवणीची कामे आटोपली. तर काही ठिकाणी भात पिकांतील निंदणाचे काम सुरू आहे. मृतक महिला स्वतःच्या शेतात निंदणाचे काम करण्यासाठी गेली होती. निंदण आटोपून सायंकाळच्या सुमारास ती लगतच्या नाल्यात प्रसाधनगृहासाठी बसली.
 
 
attck
 
दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ती मृत्यूमुखी पडली. महिला घरी न परतल्याने गावातील काही लोकांनी शेतशिवार गाठले. महिलेचा शोध घेतला. tiger attack पण, ती मिळून आली नाही. याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाची चमु घटनास्थळी दाखल झाली. त्यांनीही शोध घेतला. पण, अंधार पडल्याने तिचा पत्ता लागला नाही. गुरूवार, 25 जुलै रोजी पुन्हा शोधमोहिम राबवली असता, तिचा मृतदेह घटनास्थळापासून 800 मिटर अंतरावर आढळून आला. वनाधिकार्‍यांनी पंचनामा करून मृतदेत उत्तरीय तपासणीसाठी नागभीड ग्रामीण रूग्णालयात पाठवला. 
 
वनविभागाने तात्काळ मृतकाच्या कुटुंबियास 25 हजार रूपयाची आर्थिक मदत दिली. दरम्यान, एका दिवसांपूर्वीच नागभीड वनपरिक्षेत्रातील दोडकू शेंदरे यांचा वाघाने बळी घेतला. नागभीड तालुक्यात वाघाचा वावर वाढला असून, नागरिकांचा जीव जात आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून, शेतकामे ठप्प पडले आहेत. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.