महापालिकेतील अनियमिततेच्या चौकशीस प्रारंभ

26 Jul 2024 21:15:40
- उपसमितीने अधिकार्‍यांकडून घेतली माहिती
- पुढील बैठक ३१ जुलै रोजी

अमरावती, 
Amravati-Municipality महापालिकेच्या तत्कालीन प्रशासकाने आपल्या कार्यकाळात केलेल्या गैरव्यवहार व अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या निर्देशान्वये गठित करण्यात आलेल्या जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय उपसमितीची पहिली बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सात सदस्यीय उपसमितीने अमरावती मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती घेत अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणाचे संबंधित सर्व दस्तावेज येत्या सोमवारी सादर करण्याचे निर्देश दिले. या उपसमितीची पुढील बैठक ३१ जुलै रोजी होणार आहे.
 
 
mahapalika
 
Amravati-Municipality तत्कालीन प्रशासक व आयुक्तांनी केलेल्या गैरव्यवहारांची चौकशी करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या अनुषंगाने राज्य सरकारने दिलेल्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित करण्यात आली होती. या उच्चस्तरीय उपसमितीची पहिली बैठक गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीसाठी अमरावती मनपाच्या सर्व विभाग प्रमुखांना उपस्थित राहण्याचे बजाविण्यात आले होते. सदर बैठकीस उपस्थित मनपा अधिकार्‍यांची उपसमितीमधील सदस्यांनी झाडाझडती घेत येत्या सोमवारपर्यंत गैरव्यवहार प्रकरणातील मुद्यांशी संबंधित सर्व कागदपत्र समितीपुढे सादर करण्याचे निर्देश दिले. यासोबतच उपसमितीमधील सदस्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केलेल्या तक्रारीतील विविध मुद्यांच्या अनुषंगाने काही सवाल-जवाब मनपा अधिकार्‍यांना केल्याची माहिती आहे. सदर प्रकरणाशी संबंधित संपूर्ण माहिती आल्यानंतर उपसमिती त्याची चौकशी करणार असून चौकशीअंती त्यासंदर्भात तयार झालेला अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे.
 
 
पारदर्शीपणे चौकशी व्हावी : सुनील खराटे
तत्कालीन प्रशासकांनी विकासक आणि कंत्राटदारांशी हात मिळवीत मनपामध्ये नियमबाह्य पद्धतीने विविध ठराव पारित केले. त्याची प्रोसिडिंग बुकमध्ये नोंद घेण्यात आली नाही. कामाच्या वर्क ऑर्डर व करारनाम्याच्या नियमांना फाटा देत तसेच अटी व शर्ती बदलण्याचा प्रकार मनपात घडला आहे. या सर्व प्रकरणांची उपसमितीने अत्यंत पारदर्शीपणे चौकशी करावी, अशी अपेक्षा तक्रारकर्ते शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0