हिंदू तनमन... हिंदू जीवन...

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
विश्लेेषण
Hinduism : हिंदुत्वाचे अस्तित्व आणि अस्मिता 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात आमच्या राष्ट्राभिमानी ऋषीमुनींनी सर्व देशवासीयांसमोर प्रस्तुत केली. युरोपातील राष्ट्र- तत्त्ववेत्त्यांनी, अभ्यासकांनी या विषयावर अधिक संशोधन केले आणि त्या विचारमंथनातून ‘राष्ट्रवाद’ नावाचा नवा विषय उदयास आला. जगातील इतर देशातील विद्वानांनी देखील राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. देश, लोक, पंथ, भाषा, संस्कृती, इतिहास इत्यादी जेव्हा समान असतात तेव्हा तेथील लोकांचा समूह एक राष्ट्र बनतो.
 
 
Swamiji-Yogi
 
या विचारप्रवाहाची लाट भारतातही उठली आणि इथल्या राजकीय नेत्यांनीही भारतीय राष्ट्रवादाचा शोध सुरू केला. या पृष्ठभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘सर्च ऑफ हिंदुत्व’ या पुस्तकाचा उल्लेख करता येईल. स्वामी विवेकानंदांसारख्या महान ऋषींच्या समाधीनंतर ते देशाच्या रंगमंचावर अवतरले आणि अंदमानच्या कारावासातून मुक्त झाल्यानंतर ते कोकणातील रतनगिरी येथे राहू लागले. क्रांतिकारक सावरकर हे लढाऊ देशभक्त होते. केवळ भारतच का, भारताचे स्वातंत्र्य हाच त्यांचा मोक्ष, हीच मुक्ती, हेच त्यांचे दैवत आणि मांगल्य होते. त्यांच्या मौन चिंतन तपश्चर्येचे फलित म्हणजे हिंदू शब्दाची प्रसिद्ध व्याख्या - ‘आसिन्धु सिन्धु पर्यन्ता यस्य भारतभूमिका पितृभू: पुण्यभूश्चैव स वे हिन्दुरितिस्मृत:’। (1923) या आधी हिंदू शब्दाची व्याख्या कोणीही केली नव्हती. लोकमान्य टिळकांचा लेख हिंदू धर्माची व्याख्या नसून स्पष्टीकरण आहे. त्यांनी हिंदू धर्माचे तीन विशेष लक्षण अर्थात खास वैशिष्ट्ये सांगितली. क्रांतिवीर सावरकरांचा ‘हिंदुत्व’ हा सविस्तर निबंध आहे जो तर्कसंगत आणि सुव्यवस्थित आहे. हा अनेक उदाहरणांनी, दृष्टांतांनी सुशोभित आहे आणि त्याचे खंडन करणे कठीण आहे. एक प्रामाणिक वाचक निश्चितच ग्रंथकारापुढे नम्रपणे नतमस्तक होईल.
 
 
बदलत्या व्याख्या
Hinduism : पण आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात ते मूलभूत प्रतिपादन वाचून आजच्या समस्यांवर तोडगा काढण्यात ते कमी पडते असेच म्हणावे लागेल. राष्ट्रत्वाशी संबंधित कल्पना जगभर बदलल्या आहेत, परिणामी व्याख्याही बदलल्या आहेत. त्या निबंधात आर्यांचा वसाहतवादाचा सिद्धांत त्यांनी मान्य केला आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात असे सूचित करणारी अनेक वाक्ये आहेत. आज नवनवीन संशोधन पुढे येत आहे. या पृष्ठभूमीवर तो सिद्धांत कालबाह्य झाला आहे आणि नाकारला गेला आहे. दुसरे म्हणजे, अथर्ववेदातील ‘माता भूमि:’चा वापर सर्वश्रुत आहे. पुढे वंगभंग आंदोलनापासून संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यांपर्यंत सर्वत्र ‘भारत माता की जय’ ही घोषणा निनादत होती. वीर सावरकरांच्या निबंधाच्या आधीच्या भागात ‘मातृभू’ हा शब्द अनेक वेळा आला आहे. मग ‘पितृभू’ हा शब्द व्याख्येत का आला हे एक कोडेच आहे. तिसरी गोष्ट. ही व्याख्या राष्ट्रीय अस्मितेबाबत मौन धारण करते. स्वामी विवेकानंदांसारख्या श्रेष्ठ विचारवंतांनी ती संकल्पना जरी समोर आणली असली तरी पाश्चात्त्य विश्वाला त्याची कल्पना नव्हती. ‘राष्ट्राचा आत्मा’ ही संकल्पना त्या राजकीय तत्त्वज्ञांना मान्य नव्हती. हीच भावना ‘आसिन्धु सिन्धु’ या व्याख्येमध्ये दिसते.
 
 
‘हिंदुत्व’ पुस्तकाचे प्रकाशन 1923 मध्ये झाले. त्यानंतर दोन वर्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. ‘हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे संरक्षण करून हिंदू राष्ट्राला स्वतंत्र करणे’ हे संघाच्या ध्येय प्रतिज्ञेत म्हटले आहे. पण संघ संस्थापक कधीही ‘हिंदू’ शब्दाची व्याख्या करण्याच्या मागे गेले नाहीत. कोणत्याही प्रकारच्या वादात न पडण्याची त्यांची कार्यशैली होती. हिंदू शब्दाची निश्चित अशी व्याख्या नसल्याचीही त्यांना फिकीर नव्हती. पण तरीही हिंदूच्या नावाने कार्य करत संघाचे कार्य पुढील 22 वर्षे वाढत गेले आणि अपेक्षेप्रमाणे विस्तारत राहिले.
 
 
Hinduism :1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशभरात नवे वातावरण निर्माण झाले. त्यावेळी दुसरे महायुद्धही संपले होते. युद्धानंतरच्या वातावरणात जगात नवनवीन राष्ट्रे उदयास आली. जणू एका नवीन विश्वाचा उदय झाला. विविध प्रकारच्या जागतिक संघटना किंवा संस्था उदयास आल्या. त्यानुसार नवीन अपेक्षा, नवीन समस्या, नवीन कर्तव्ये इत्यादींचाही उदय झाला. भारताला या वैश्विक प्रवाहापासून वेगळे राहणे अशक्य होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही या बदललेल्या परिस्थितीनुसार चिंतन करावे लागले. संघ प्रतिज्ञेत ‘स्वातंत्र्य’ याऐवजी ‘सर्वांगीण प्रगती’ अशी सुधारणा करावी लागली. तेव्हापासून परमपूजनीय गुरुजींच्या बौद्धिकांमध्ये एक नवीन विषय आला - ‘भारताचे जागतिक कर्तव्य’, ‘हिंदूंचे जागतिक ध्येय’. तेव्हापासून संघ अधिकार्‍यांच्या बौद्धिकांमध्ये ‘कृण्वन्तो विश्वमार्यम’ चा उल्लेख होऊ लागला. जेव्हा मी प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गात गेलो तेव्हा मी ऐकलेले एक गीत असे होते, ‘विश्वमखिलमूद्धर्तु निर्मिता वयं, हरिणा प्रेषिता वयम्’- अर्थात आम्ही संपूर्ण जगाच्या उद्धारासाठी प्रभू द्वारे निर्मित व प्रेषित आहोत. त्याचा परिणाम असा झाला की संघ कार्यकर्त्यांच्या अंत:करणातून जुनी विवेकानंद वाणी अधिक अर्थपूर्ण रीतीने प्रकट होऊ लागली.
 
 
हिंदू कोण?
भारताला स्वातंत्र्य मिळाले. जवळजवळ त्याच वेळी जगातील अनेक लोकसमूहांना स्वातंत्र्य मिळाले. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या वातावरणात वसाहतवाद संपुष्टात आला होता आणि जगभर नवीन स्वतंत्र राष्ट्रेही उदयास आली होती. त्यात ब्रह्मदेश, त्रिनिदाद, थायलंड, मलेशिया सारखे देश देखील होते, जिथे हिंदू लोकसंख्या नगण्य नव्हती. त्या स्वतंत्र राष्ट्रांचे नेतेही त्यांचे पांथिक-सांस्कृतिक जीवन सुरक्षित ठेवण्यात तत्पर होते. ते देखील आपली परंपरागत मुळे मजबूत करण्याबाबत चिंतित होते. या सर्वांना संपूर्ण भारतातून मार्गदर्शन आणि आधार हवा होता. संघ कार्य तर भारतात वाढत होतेच. त्यावेळी ब्रह्मदेशचे सर्वोच्च न्यायपाल उ चान ठून, त्रिनिदादचे खासदार शंभुनाथ कपिलदेव, अमेरिकेचे के. पंडित उषरबुद्ध यांच्यासारख्या मान्यवरांनी परमपूजनीय गुरुजींची भेट घेतली. ते दोन-तीन दिवस त्यांच्यासमवेत राहिले आणि आपल्या मनातील व्यथा त्या महान हिंदू संघटकासमोर मांडली. जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या व्यवसायी स्वयंसेवकांकडूनही पुरेशी माहिती परमपूजनीय गुरुजींपर्यंत वैयक्तिक रीत्या किंवा पत्राद्वारे पोहोचत होती. या सगळ्याचे वैचारिक मंथन संघात झाले आणि पुरेशी तयारी व सजगता बाळगून विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाली.
 
 
Hinduism आता एक नवीन समस्या निर्माण झाली. नवीन संघटनेच्या दृष्टिकोनातून हिंदू कोण? आधुनिक व्यवस्थेनुसार ते जाहीर करणे आणि शब्दबद्ध करणे अनिवार्य होते. त्यामुळे स्वतंत्र भारतात प्रथमच विश्व हिंदू परिषदेच्या विश्वस्तांना ‘हिंदू’ या शब्दाची व्याख्या करावी लागली. त्यांच्यात या विषयावर व्यापक विचारमंथन झाले. त्यातून व्याख्येचे जे नवनीत निघाले ते पुढीलप्रमाणे आहे: ‘जो भारतीय ऋषीमुनींच्या ऐहिक प्रवर्तित अर्थांना सिद्ध करणार्‍या सनातन, शाश्वत सत्यनिष्ठ तत्त्वांवर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवतो, जो महात्मा, दिव्य विभूतींद्वारा अनादि काळापासून प्रवर्तित पंथांचा आदर करतो, ज्याचा जन्म जगात कुठेही झालेला असो, तो कुठेही निवास करीत असला तरी त्या शीलवान, सुसंस्कृत मानवास हिंदू म्हणतात.’ तो भारतात निर्मित आध्यात्मिक संपदेला मानणारा आहे. राष्ट्र, वंश, सभ्यता यासारख्या वस्तुस्थितींनी तो मर्यादित नाही.
 
 
भारत सरकारने 1958 मध्ये हिंदू विवाह कायदा लागू केला. त्या कायद्याच्या संदर्भात हिंदू शब्दाची व्याख्या देणे आवश्यक होते. त्यामुळे यात सुरुवातीलाच म्हटले गेले की, ‘उपासना पंथानुसार हिंदू जसे वीरशैव, लिंगायत, ब्राह्मो समाज, आर्य समाज, इतर पंथाचे अनुयायी, जसे बौद्ध, जैन, शीख, जनजाती आणि जे ख्रिस्ती किंवा इस्लामी नाहीत, त्या सर्वांना येथे हिंदू मानले जाईल.’
 
 
राष्ट्रधर्मच सर्वश्रेष्ठ
शतकानुशतकांपासून ‘धर्मांतरित स्वजन’ अर्थात तथाकथित अल्पसंख्यकांमधील ‘मतांतरातून राष्ट्रांतर’ चा गैरसमज कसा दूर करायचा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चिंतेचा विषय होता. संघाच्या व्यासपीठांवरूनही प्रबोधनाचा प्रभाव पडू लागला. विशेषत: परमपूजनीय गुरुजींच्या 51 व्या जन्मदिना निमित्त होणार्‍या सत्कार सभांमध्ये ते हा विषय व्यापक स्वरूपात मांडत असत. राष्ट्रधर्म, कुलधर्म आणि व्यक्तिधर्म या तिघांचा उल्लेख करून ते म्हणतात की, समस्त जनता अर्थात संपूर्ण राष्ट्राच्या प्रगती आणि समृद्धीसाठी राष्ट्रधर्म हा सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीचा उपासना पंथ मात्र वैयक्तिक आहे. मतान्तराने राष्ट्रांतर होत नाही. त्यामुळे आपले पूर्वज बदलत नाहीत. डॉ. सैफुद्दीन जिलानी यांच्यासारखे प्रख्यात विद्वान श्रीगुरुजींना भेटले आणि त्यांच्या मधुर व ज्ञानप्रद संभाषणाने ते मंत्रमुग्ध झाले. श्रीगुरुजींशी झालेल्या संवादानंतर त्यांनी लिहिले, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला असे वाटते की हिंदू-मुस्लिम समस्या सोडवण्याबाबत एकमेव श्रीगुरुजी असे आहेत जे योग्य मार्गदर्शन करू शकतात.’
 
 
बदलत्या वातावरणात भलेही अपवादात्मक असले तरी ‘मी वंशाने हिंदू आहे तर आस्थेने मुसलमान’ असे म्हणणार्‍या न्यायाधीश एम. के. छागला यांचे उदाहरण देता येईल. तर ‘माझी संस्कृती हिंदू आहे, परंतु माझा पंथ ख्रिश्चन आहे’, असे सार्वजनिक विधान करणारे उच्चपदस्थ धर्मगुरू जोसेफ यांचेही उदाहरण निश्चितच उद्बोधक ठरेल. भगवान राम आणि कृष्णाच्या भक्तिगीतांचे कवी/लेखक युसूफ अली केचेरी यांना ‘केरळचे आधुनिक रसखान’ म्हणता येईल.
 
 
हिंदुत्वाला बदनाम करण्याचा भयंकर प्रयत्न
Hinduism : 1983 मध्ये तळजाई येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत शिबिराच्या समारोपाच्या सभेत तत्कालीन परमपूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले होते की, ‘येथील मुसलमान वंशाने हिंदू आहेत. केवळ उपासना मार्ग बदलल्याने त्यांचे राष्ट्रीयत्व बदलत नाही. वेगळेपणाची आणि पृथकपणाची भावना बाजूला ठेवून त्या सर्वांनी राष्ट्रीय प्रवाहात एकरूप व्हावे.’ हिंदुस्थानात राहणारे हिंदू आहेत या गोष्टीत आश्चर्य ते कोणते? जगाची रीत पाहा. जर अफगाणिस्तानत राहणारा तो अफगाण, उझबेकिस्तानचा रहिवासी उझबेक, किर्गिस्तानचा निवासी किर्गिझ आणि तुर्कस्तानचा रहिवासी जर तुर्क असेल तर हिंदुस्थानचा रहिवासी हिंदू आहे.
 
 
खरे तर संघाचे आचरण सुरुवातीपासूनच समन्वयाचे राहिले आहे. कालचक्र उलटे फिरल्याने भारतातील हिंदू आत्मविस्मरणात बुडून गुलामगिरीचा बळी ठरला. अशा वेळी अमृतवाहक गरुडाप्रमाणे परमपूजनीय डॉ. हेडगेवार आले आणि त्यांनी अफाट धैर्य, साहस आणि कृतीने हिंदूंना संघटित करण्यास सुरुवात केली. जवळपास एक शतकानंतर हिंदू संघटनीय अर्थात संघटित होण्यास सक्षम आहेत हे आता सिद्ध झाले आहे. वर्तमानात संपूर्ण भारतात सर्वात विशाल संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांच्या प्रत्येक सक्रिय स्वयंसेवकामध्ये स्वाभिमानाची भावना जागृत झाली आहे.
 
 
Hinduism यालाच भगिनी निवेदितांनी ‘विक्रांत हिंदुत्व’ असे म्हटले होते. सध्याचे हिंदुत्व तसेच आहे. ते ‘विजेत्री, संहताकार्यशक्ति’चे प्रतीक आहेत. अद्भुत दूरदृष्टीचे महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या मौल्यवान पुस्तकात या दिवसाचे चित्र कल्पनाचक्षूने पाहिले होते. त्यात (पृष्ठ 86) ते म्हणतात की ‘कदाचित भविष्यात हिंदू या शब्दाचा अर्थ फक्त भारतातील सामान्य माणूस असा होईल. पण तो दिवस तेव्हाच उगवेल जेव्हा आक्रमक धार्मिक अहंकार नाहीसा होईल, सांप्रदायिक कट्टरतावादी तंबू नष्ट होतील आणि धर्म एक ‘इझम’ होण्याचे थांबवले जाईल.
 
(रा. स्व. संघाचे माजी अ. भा. बौद्धिक प्रमुख रंगाहरी यांनी भोपाळमधील प्रज्ञा प्रवाहच्या चिंतन बैठकीत (16-17 एप्रिल, 2022) केलेल्या भाषणातील संपादित अंश. रंगाहरीजींचे ऑक्टोबर 2023 मध्ये निधन झाले.)