शौर्य आणि समर्पणाची कारगिल विजयगाथा

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
प्रेरणा 
 
मुझे तोड लेना बनमाली
उस पथ पर देना तुम फेंक
मातृ-भूमि पर शीश चढाने
जिस पथ पर जावें वीर अनेक
 
- माखनलाल चतुर्वेदी
Kargil War : 26 जुलै 1999 म्हणजेच ‘कारगिल विजय दिवस.’ हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय सैन्याच्या अद्वितीय शौर्य, बलिदान आणि विजय गाथे प्रती कृतज्ञता, आदर आणि सशक्त राष्ट्राचे नागरिक असल्याचा अभिमान बाळण्याचा हा दिवस आहे. भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी पाकिस्तानच्या कुटिल महत्त्वाकांक्षा, पोकळ धाडस आणि भारताचे तुकडे करण्याचे दिवास्वप्न पायदळी तुडवून याच दिवशी कारगिलच्या शिखरावर भारताचा विजय झेंडा फडकवला. याच दिवशी भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळील कारगिलच्या पहाडांवर कब्जा करणार्‍या जिहादी दहशतवाद्यांना आणि त्यांच्या वेशात घुसखोरी करणार्‍या पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी ठार केले होते. अणुहल्ल्यासारख्या गंभीर संकटाची भीती दाखवूनही भारताला घाबरवता येणार नाही, याची जाणीव सार्‍या जागतिक समुदायाला करायला लावणारा हाच तो दिवस. आपली एकता आणि अखंडता जपण्यासाठी जगातील कोणत्याही महासत्तेच्या दबावाला किंवा प्रभावाला भारत बळी पडणार नाही, हे निर्धारपूर्वक बजावणारा हाच तो दिवस.
 
 
Vijay-3


 
पाकिस्तानी हल्ल्याचा उद्देश
Kargil War : राष्ट्रीय महामार्ग एकवरून होणारा पुरवठा ठप्प पाडणे. हा महामार्ग श्रीनगरला लेहशी जोडतो. पाकिस्तान्यांना वाटले की पुरवठा बंद झाल्यास भारतीय लष्कर तातडीने कोणताही प्रतिहल्ला करू शकणार नाही. पाकिस्तानी सैन्याला तिथून हटवण्याची क्षमता भारताकडे नाही, असे पाकिस्तानी लोकांना वाटत होते. याशिवाय कारगिल हल्ल्याचा एक मोठा पैलू होता जो आजपर्यंत कधीही समोर आलेला नाही, असेही सांगण्यात येते. जम्मू-काश्मीर राज्याचा सर्वात लहान भाग असलेल्या काश्मीरवर जिहादी हल्ला करून काबीज करण्याची ही योजना होती. कारगिल हल्ल्यानंतर भारतीय लष्कर एवढे चोख प्रत्युत्तर देईल याची कल्पनाही पाकिस्तानी लष्कराच्या अधिकार्‍यांनी केली नव्हती आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणीही होऊ शकली नाही आणि नीट खुलासाही होऊ शकला नाही.
 
 
या बृहद् दृष्टिकोनानुसार, काश्मीरमध्ये जिहाद लढण्यासाठी अफगाणिस्तानातील तालिबान प्रमुख मुल्ला महसूद रब्बानी याच्याकडे पाकिस्तानने 20 ते 30 हजार लढवय्यांची (सैनिक) मागणी केली होती. रब्बानी याने 50 हजार लढवय्ये देण्याचे आश्वासन दिले होते. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी या प्रस्तावाने खूपच खूश झाले. कारगिलबाबत जनरल परवेज मुशर्रफ अस्वस्थ होते. 1965 च्या युद्धापूर्वी, पाकिस्तानी सैन्य कारगिलच्या शिखरावर होते. सुरक्षा आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असे हे स्थान तेव्हा पाकिस्तानच्या ताब्यात होते. पण 1965 आणि 1971 च्या युद्धात भारताने ही महत्त्वाची शिखरे काबीज केली होती. जनरल मुशर्रफ ही महत्त्वाची शिखरे परत आपल्या ताब्यात घेऊ इच्छित होते. काश्मीर हा असा आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवायचा की त्यावरून अणुयुद्ध होण्याची शक्यता आहे आणि तिसर्‍या पक्षाच्या हस्तक्षेपाची तात्काळ गरज आहे असा संदेश जागतिक समुदायाला जाईल, अशाप्रकारे वातावरणनिर्मिती करण्याचा पाकिस्तानचा उद्देश होता. तसेच नियंत्रण रेषेचे पावित्र्य भंग करून कारगिलच्या अनियंत्रित भागांवर कब्जा करणे हा देखील पाकिस्तान्यांचा उद्देश होता.
 
 
कारगिल घटनाक्रम
कारगिल युद्धाची सुरुवात पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान समर्थित घुसखोरांनी जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून भारतीय हद्दीत घुसून केली. या घुसखोरीचा उद्देश कारगिल प्रदेशातील मोक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या शिखरांवर कब्जा करणे तसेच श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग ठप्प पाडून भारताच्या पुरवठा वाहिनीत व्यत्यय आणणे हा होता.
 
 
Kargil War : युद्धाचा प्रारंभ : मे 1999 मध्ये भारतीय लष्कराला स्थानिक मेंढपाळांकडून शत्रूच्या घुसखोरीची माहिती मिळाली. प्राथमिक तपासानंतर शत्रूने अनेक उंच शिखरे काबीज केल्याचे भारतीय लष्कराला आढळून आले. हे समजल्यानंतर, भारतीय लष्कराने हा भाग पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी ‘ऑपरेशन विजय’ सुरू केले.
ऑपरेशन विजय: भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ नावाने एक मोठी लष्करी मोहीम सुरू केली, ज्यामध्ये लष्कर, हवाई दल आणि तोफखान्याची मदत घेण्यात आली. पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावून भारतीय भूभाग परत मिळवणे हा ‘ऑपरेशन विजय’चा उद्देश होता.
भारतीय हवाई दलाची भूमिका : भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सफेद सागर’ अंतर्गत शत्रूच्या लक्ष्यांवर हवाई हल्ले केले. मिग-21, मिग-27 आणि मिराज-2000 विमानांचा वापर करून शत्रूचे बंकर्स आणि सप्लाय लाईन्सला लक्ष्य करण्यात आले.
महत्त्वाच्या शिखरांवर कब्जा: भारतीय लष्कराने अनुक्रमे टोलोलिंग, टायगर हिल, पॉईंट 4875 आणि इतर महत्त्वाच्या शिखरांवर पुन्हा कब्जा केला. या लढायांमध्ये भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखविले.
युद्धाचा शेवट : भारतीय लष्कराच्या सततच्या हल्ल्यांमुळे आणि अतिशय धाडसी अभियानांमुळे पाकिस्तानी लष्कर आणि घुसखोरांना प्रचंड नुकसान सहन करावे लागले. भारतीय लष्कराने एकामागोमाग एक जबरदस्त हल्ले चढविले, आकाशातून भारतीय हवाई दलाची विमाने अक्षरश: आग ओकत होती तर दुसरीकडे भारतीय लष्कराचा तोफखानाही धडाडत होता. भारतीय सेनादलांच्या या भीषण हल्ल्यांमुळे अखेरीस पाकिस्तानी लष्कर व घुसखोरांना सपशेल माघार घेण्यास भाग पडले. जुलै 1999 च्या अखेरीस, भारतीय सैन्याने जवळजवळ सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर नियंत्रण मिळवले होते.
26 जुलै 1999 रोजी भारत सरकारने ‘कारगिल विजयाची’ घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी 26 जुलै हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. सुमारे अडीच महिने चाललेले कारगिल युद्ध हे भारतीय लष्कराच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे असे उदाहरण आहे ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. सुमारे 18 हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये लढलेल्या या युद्धात भारताच्या 527 हून अधिक शूर सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि 1300 हून अधिक सैनिक जखमी झाले. या युद्धात 2700 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आणि 750 पाकिस्तानी सैनिकांनी युद्धातून पळ काढला.
कारगिल युद्ध स्मारक : भारतीय सैन्याने उभारलेले कारगिल युद्ध स्मारक (कारगिल वॉर मेमोरियल) टोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी द्रास येथे आहे. टायगर हिल ओलांडून शहराच्या मध्यभागापासून जवळपास 5 किमी अंतरावर असलेले हे स्मारक कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आले आहे. युद्धात प्राण अर्पण केलेल्या सैनिकांची नावे स्मारकाच्या भिंतीवर कोरलेली आहेत आणि अभ्यागत ती वाचू शकतात. कारगिल युद्ध स्मारकाशी संलग्न असलेले एक संग्रहालय देखील येथे आहे. ‘ऑपरेशन विजय’ स्मृतिप्रीत्यर्थ याची स्थापना करण्यात आली होती. या संग्रहालयात भारतीय सैनिकांची छायाचित्रे, महत्त्वाच्या युद्ध दस्तऐवजांचा संग्रह आणि रेकॉर्डिंग, पाकिस्तानी युद्ध उपकरणे आणि गियर आणि कारगिल युद्धातील लष्कराचे अधिकृत प्रतीक आहेत.
 
 
कारगिल युद्ध - प्रत्येक आघाडीवर
पाकिस्तानची नामुष्की
Kargil War कारगिल युद्धाने पाकिस्तानला एक दुष्ट, कुटील देश म्हणून पूर्णपणे उघडे पाडले होते. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान आणि लष्करप्रमुख दोघेही एकमेकांवर आरोप करीत राहिले. आपल्याला कारगिल हल्ल्याबाबत काहीही माहिती नव्हती, असे नवाझ शरीफ यांचे म्हणणे होते. तर नवाझ शरीफ यांना सर्व काही माहीत होते, असा जनरल मुशर्रफ यांचा दावा होता. आता नवाझ शरीफ यांना माहीत असो वा नसो, दोन्ही बाबतीत पाकिस्तानचीच नामुष्की झाली. जर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना या हल्ल्याची माहिती नव्हती याचा अर्थ पाकिस्तानवर तेथील मुलकी सरकारचे नव्हे तर लष्कराचे नियंत्रण आहे, ही बाब फारच ठळकपणे स्पष्ट होते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास पाकिस्तानकडे लष्कर नाही तर लष्कराकडे पाकिस्तान आहे हे स्पष्टपणे अधोरेखित होते.
 
 
‘देशाचा परराष्ट्र मंत्री असूनही मला 17 मेच्या सकाळी कारगिल हल्ल्यासंदर्भात माहिती मिळाली आणि या परिस्थितीचे राजनयिक पातळीवर काय परिणाम होतील, याबाबत मला कधीच विचारण्यात आले नाही’, असे तत्कालीन पाकिस्तानी विदेश मंत्र्यांचे देखील म्हणणे होते. पाकिस्तानी सेनादलात एवढी अनागोंदी माजली होती की पाकिस्तानचे तत्कालीन अ‍ॅडमिरल फैसुद्दीन बुखारी यांनी थेट मुशर्रफ यांनाच विचारले होते की, ‘मला या मोहिमेची कोणतीही माहिती नाही. पण मी विचारतो की, एवढ्या मोठ्या मोबिलायझेशनचा उद्देश काय? आम्हाला अशा एका निर्जन जागेसाठी लढायचे आहे जी तशीही आम्हाला हिवाळ्यात सोडावीच लागेल’. यावर मुशर्रफ यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. संपूर्ण जगासोबतच पाकिस्तानचा मित्र देश असलेल्या चीननेही पाकिस्तानला कारगिल शिखरांवरून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले होते. कारगिलच्या पहाडांवर ‘मुजाहिदीन’ लढत असल्याचे पाकिस्तान सुरुवातीला सतत सांगत होता. पण जागतिक दबावामुळे जेव्हा पाकिस्तानला आपले सैनिक माघारी बोलवावे लागले तेव्हा पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला. पाकिस्तान मुजाहिदीनवर नियंत्रण ठेवू शकतो हे जगासमोर उघड झाले. यातून काश्मीरमध्ये मुजाहिदीनांच्या नावाखाली पाकिस्तानच दहशत पसरवत आहे, ही गोष्ट जगाला स्पष्टपणे कळली.
 
 
Kargil War : परवेज मुशर्रफ हे कारगिलला आपला लष्करी विजय मानतात. पण सत्य हे आहे की पाकिस्तानने आपल्या सैनिकांना कारगिलच्या उंच पहाडांवर केवळ मरायला सोडले होते. अनेक सैनिकांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या पोटात गवत असल्याचे उघड झाले, म्हणजे त्यांच्याकडे खायला काहीच नव्हते. जनरल परवेज मुशर्रफ यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, ‘लष्कराने जे कमावले होते ते आम्ही मुत्सद्देगिरीत गमावले.’ पण दुसरीकडे नवाज शरीफ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मी अमेरिकेत जाऊन मदत मागितली होती आणि अमेरिकाही मदत करण्यास तयार होती. मात्र, तोपर्यंत भारतीय सैन्याने कारगिलमधील जवळपास सर्वच पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावले होते आणि भारतीय सैनिक अतिशय वेगाने आगेकूच करीत होते. अशा स्थितीत मी पाकिस्तानी सेनेची प्रतिष्ठा वाचविली.’
 
 
आपण नवाज शरीफ यांना अमेरिकेशी बोलणी करण्यास सांगितले नव्हते, असे जनरल मुशर्रफ यांचे÷म्हणणे आहे. तर दुसरीकडे नवाज शरीफ म्हणतात की, जेव्हा मी अमेरिकेत जाण्यास निघालो होतो, तेव्हा मुशर्रफ मला विमानतळावर सोडायला आले होते आणि त्यांनी अमेरिकेशी बोलणी करण्यास सांगितले जेणेकरून पाकिस्तानी सैनिक सुरक्षितपणे कारगिलच्या शिखरांवरून सुरक्षितपणे निघून जाऊ शकतील. कारण तिथे भारतीय सैन्याने जबरदस्त आघाडी घेतली आहे, हे मुशर्रफ यांना पूर्णपणे कळून चुकले होते.
 
 
Kargil War : पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून तेथे कोणत्याही प्रकारची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नाही. ज्या लष्करप्रमुखाने एवढी मोठी चूक केली तोच पुढे पाकिस्तानचा राष्ट्रपती झाला आणि ज्या लष्करी अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली ही लढाई लढली गेली त्या अधिकार्‍याला बढती मिळाली. एकंदरित असे म्हणता येईल की चार कट्टरवादी ‘फॅनॅटिक फोर’ (पाकिस्तानी लष्कराचे ते चार अधिकारी ज्यांनी कारगिल युद्धाची योजना आखली होती) च्या कोर्‍या कल्पनेचा (फॅन्टसी) पाकिस्तान बळी ठरला आणि अशाप्रकारे एका अयशस्वी देशाचे कुटील प्रयत्नही अयशस्वी झाले.
(विचार 1925 वरून साभार)