गिरनार

महाभारतकालीन रैवतक पर्वत

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
संस्कृती
महाभारतात ज्या Raivatak mountains रैवतक पर्वताचा उल्लेख आहे, त्यालाच आता गिरनार संबोधले जाते. रैवतक अर्थात गिरनार हा भारतातील एक प्राचीन पर्वत आहे. रैवतकप्रमाणेच उर्ज्जयंत, प्रभास, वस्त्रापथ ही देखील या पर्वताची नावे आहेत. सुभद्राहरण येथेच झाले. श्रीकृष्णकालीन रैवतक महायात्रा येथे कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत भरते. या पर्वताच्या स्थाननिश्चितीविषयी अद्याप तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. पुराणांतील वर्णनांवरून हा पर्वत सांप्रतच्या गुजरात राज्यात आहे, हे स्पष्ट दिसते. वसुदेवपुत्र कृष्णाने द्वारकानगरी याच्या पायथ्याशी वसविली, असा महाभारतात स्पष्ट उल्लेख आहे.
 
 
girnar १
 
Raivatak mountains : पार्जिटरच्या मते जामनगर जिल्ह्यातील सांप्रतच्या द्वारका शहराजवळील हालार टेकडी म्हणजे पूर्वीचा रैवतक पर्वत होय; तर काही तज्ज्ञांच्या मते जुनागड जिल्ह्यातील गिरनार पर्वत म्हणजे रैवत अथवा रैवतक होय. परंतु महाभारताच्या मौसल पर्वातील द्वारकेच्या वर्णनाप्रमाणे गिरनारला समुद्रसान्निध्य नाही. हा पर्वत आनर्त देशात असल्याचा महाभारतात उल्लेख सापडतो. वैवस्वत मनूचा पौत्र आनर्त याच्या रेवत नावाच्या मुलाने या पर्वताच्या पायथ्याशी कुशस्थली नावाची नगरी वसविली व त्याच्या नावावरून या पर्वताला रैवतक हे नाव मिळाले असावे, असे मानतात. भगवान कृष्णाने मथुरेहून स्थलांतर केले व कुशस्थली या त्यावेळी ओसाड बनलेल्या नगरीच्या जागी द्वारका नगरी वसवून जवळच्या रैवतक पर्वतावर एक किल्ला बांधला, असा पुराणांत उल्लेख आहे. आजही गिरनारच्या शिखरावर एक जुना कोट दिसतो, त्याला उग्रसेनगड म्हणतात. त्यामुळे गिरनारचा प्राचीन रैवतकशी संबंध असावा असे स्पष्ट होते. रैवतक पर्वत द्वारकेतील लोकांचे क्रीडास्थळ होते आणि द्वारकावासी त्या पर्वतावर जाऊन गिरिमह व रैवतकमह हे उत्सव नृत्यगायनादी कार्यक्रम करून साजरे करीत, अशी वर्णने महाभारतात व पुराणांत आढळतात. दोहद येथील एका शिलालेखात रैवतक पर्वतावर मंदिरे असल्याचा उल्लेख मिळतो. बृहत्संहितेतील उल्लेखावरून रैवतक व ऊर्जयता ही गिरनार पर्वतातील दोन टेकड्यांची नावे आहेत. गिरनार हा सौराष्ट्र विभागातील सर्वांत उंच पर्वत (1,117 मी.) होय. हा सौराष्ट्राच्या ट्रॅप खडकाच्या मध्यवर्ती पठाराच्या नैर्ऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजतमुळे तो दक्षिणेकडील गीर डोंगररांगेपासून वेगळा झाला आहे. त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व माँझोनाइट यांचा बनलेला आहे. रैवतक अथवा गिरनारच्या अनेक शिखरांपैकी अंबामाता, गोरखनाथ, नेमिनाथ, गुरुदत्तात्रेय व कालिका ही विशेष प्रसिद्ध आहेत. गोरखनाथ सर्वांत उंच आहे. गिरनारवर गोमुखी, हनुमानधारा व कमंडलू ही पवित्र कुंडे असून पायथ्याजवळच्या दामोदर कुंडात हाडे विरघळतात, या समजुतीने काही लोक त्यात मृतास्थी विसर्जन करतात. गिरनार अथवा रैवतक हे शाक्त, दत्त व जैन पंथीयांचे फार पवित्र क्षेत्र आहे. अंबामाता शिखरावरील अंबेचे देवालय एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. नवपरिणीत दाम्पत्यास देवीच्या पायांवर घालण्यासाठी येथे आणण्याची प्रथा आहे. गोरखशिखर ही गोरखनाथांची आणि गुरुशिखऱ ही दत्तात्रेयांची तपोभूमी म्हणून दाखविली जाते. जैनांचे बाविसावे तीर्थंकर नेमिनाथ यांचे निर्वाण गिरनारवर झाले. नेमिनाथ शिखरावर त्यांचे भव्य व संपन्न देवालय आहे. पालिताण्याजवळील शत्रुंजयाची यात्रा गिरनार चढून गेल्याशिवाय पूर्ण होत नाही, या समजामुळे गिरनारच्या यात्रेकरूत जैन बांधव बहुसंख्येने असतात. कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे. भैरवजप खडक हे गिरनारवरील एक नजरेत भरणारे वैशिष्ट्य आहे.
 
 
Raivatak mountains : सम्राट अशोकाच्या पूर्वीचेही गिरनारचे उल्लेख सापडतात. जैनांचे पहिला तीर्थंकर ऋषभदेव यांनीही त्याचा उल्लेख केला आहे. येथे इसवीसन पूर्व सुमारे 250 मधील अशोककालीन शिलालेख आहे. इसवीसन 150 च्या शिलालेखात रुद्रदामन राजाने दख्खनच्या राजाचा पराभव केल्याचा आणि सुदर्शन तळे दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे. चंद्रगुप्त मौर्याने बांधलेल्या तळ्याची पुन्हा दुरुस्ती स्कंदगुप्तकालात झाल्याचा उल्लेख 455 च्या शिलालेखात आहे. ‘रा’ खेंगार व चुडासमा राजपुतांच्या प्रासादांचे भग्नावशेष गिरनारवर आहेत.