माजी आमदार कुथेंची घर वापसी

    दिनांक :26-Jul-2024
Total Views |
- उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

गोंदिया, 
शिवसेनेकडून दोनदा गोंदियाचे आमदार राहिलेले रमेश कुथे यांनी 7 वर्षांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये असहज वाटू लागल्याने आणि समर्थक भाजप सोडण्याचा आग्रह करीत असल्याचे कारण राजीनामात नमूद करून त्यांनी महिन्याभरापूर्वी भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भेटीनंतर ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यातच त्यांनी आज 26 जुलै रोजी मुंबई गाठून Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यांच्या शिवसेनेत प्रवेशाने गोंदिया विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
 
 
thakary
 
शिवसेनेचे आमदार राहिलेले रमेश कुथेंनी सडक अर्जुनी येथील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत जून 2018 मध्ये शिवसेना सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. मात्र असहज वाटू लागल्याने आणि समर्थक भाजप सोडण्याचा आग्रहामुळे 18 जून 2024 रोजी त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. राजकारणात कुथे यांची नेहमी स्पष्टवादी भूमिका राहिली आहे. 1995 आणि 1999 असे दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर रमेश कुथे यांनी गोंदिया विधानसभेचे प्रतिनिधित्व केले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी पराभूत केले. गोंदिया विधानसभा सुरुवातीपासूनच हिंदी भाषी राजकारणांचा गड राहिला आहे. या गडाला सुरूंग लावून यशस्वी होणारा एकमेव ओबीसी चेहरा रमेश कुथे ठरले आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र रुपेश कुथे यांना भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली. ते विजयी झाले. सध्या ते जिल्हा परिषदेत कृषी व पशुसंवर्धन सभापती आहेत. रमेश कुथे यांनी भाजपा सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षाचा झेंडा हाती घेणार याकडे जिल्हावासियांचे लक्ष होते. अखेर त्यांनी आज शिवसेनेत घर वापसी केली. शुक्रवारी ते सहकुटुंब येथून मुंबईसाठी रवाना झाले होते. आज त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला.