स्वागत विश्वविजेत्या संघाचे...

06 Jul 2024 06:00:00
अग्रलेख...
T-20 World Cup Cricket टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाचे गुरुवारी आधी देशाची राजधानी दिल्ली आणि नंतर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत ‘न भूतो न भविष्यती’ असे स्वागत करण्यात आले. रोहित शर्माच्या नेतृत्वातील क्रिकेट संघाचे ‘विराट’ स्वागत करण्यात आले. देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करणार्‍यांना देशातील कोट्यवधी जनता कसे डोक्यावर घेते, याचे अतिशय सुरेख दर्शन यातून झाले. विशेष म्हणजे देशवासीयांच्या स्वप्नांची पूर्तता करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने एक-दोनदा नाही तर सलग तीनदा डोक्यावर घेतले, पंतप्रधानपदी विराजमान केले. त्याच मोदी यांनी विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाला 7, लोककल्याण मार्ग या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी बोलावून सन्मानित केले, हा दैवदुर्लभ योग म्हटला पाहिजे. देशातील सर्वोच्च लोकप्रिय नेत्याने तेवढ्याच लोकप्रिय असलेल्या भारतीय क्रिकेट चमूचे स्वागत केले, अभिनंदन केले, ही गोष्ट दुर्मिळातील दुर्मिळ म्हणायला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानाने आपल्या हाताने पाठ थोपटल्यामुळे, शाबासकी दिल्यामुळे झालेला आनंद पद्म पुरस्कार सोडा; पण भारतरत्न मिळाल्यासारखा आहे, यात शंका नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषक विजेत्या संघाला थोडेथोडके नाही तर 125 कोटी रुपयांचे बम्पर बक्षीस जाहीर केले व ते सन्मानपूर्वक बहालही केले. ‘द वॉल’ म्हणून कधीकाळी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात रोहित सेनेने कामच तसे केले आहे. विश्वचषकाच्या साखळी फेरीतील सामन्यांत बहुतांश अपयशी ठरलेल्या कोहलीने विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून देण्यात दिलेले ‘विराट’ योगदान नाकारता येणार नाही. त्यामुळेच देशभर भारतीय संघाचे विराट स्वागत होत आहे. विश्वविजयी संघाला वेस्ट इंडीजहून परत घेऊन येणार्‍या विमानाला विमानतळावर जलसलामी देण्यात आली, हे भाग्य दुर्मिळातील दुर्मिळ म्हणायला हरकत नाही.
 
 
T-20 World Cup Cricket
 
T-20 World Cup Cricket एखादा संघ सांघिक भावनेने खेळत असेल तर विजयाचे सर्वोच्च शिखर गाठू शकतो, देशवासीयांना बहुमोल आनंद देऊ शकतो, हे टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्याने दाखवून दिले. अशा या विश्वविजेत्या क्रिकेट संघाचे मुंबईत ज्या पद्धतीने स्वागत करण्यात आले, त्याचा हेवा जगात क्रिकेट खेळणार्‍या सर्वच देशातील क्रिकेटपटूंना वाटत असेल आणि त्यात गैर असे काही नाही. लंकेत रावणाचा पराभव करून मर्यादापुरुषोत्तम भगवान श्रीराम आपल्या पत्नीसह अयोध्येत परतल्यावर तेथे त्यांचे जसे स्वागत झाले असेल, त्याची आठवण मुंबईतील या स्वागत समारंभाने सगळ्यांनाच आली असेल. काही जणांना ही तुलना अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता नाकारता येणार नसली, तरी मुंबईतील स्वागतामागची देशवासीयांची भावना यापेक्षा वेगळी असू शकत नाही, यात शंका नाही. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदाकडे देशवासीयांचे डोळे लागले होते. देशातील जनतेच्या मनातील स्थिती ‘सागरा प्राण तळमळला’सारखी झाली होती. त्याच सागराच्या किनार्‍यावर जनसागर उसळला होता. विश्वविजयी क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जशा जनसागराच्या लाटांवर लाटा उसळत होत्या, तशाच लाटा खर्‍या सागरातूनही उसळत होत्या. सागराच्या आणि जनसागराच्या लाटांचा संगम गुरुवारी सायंकाळी मुंबईतील मरिन ड्राईव्हवर झाला होता. हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येत क्रिकेटवेडे आपल्या नायकांचे स्वागत करण्यासाठी त्याठिकाणी गोळा झाले होते. अपेक्षांची पूर्तता केली नाही, तर भारतीय चाहते असे एखाद्या खेळाडूला पायदळी तुडवायलाही जसे मागेपुढे पाहात नाही, तसेच अपेक्षांची पूर्तता केली तर डोक्यावर घ्यायलाही कमी करत नाही, याचा अनुभव देशाने घेतला. मरिन ड्राईव्हला लागून असलेल्या बॅरिस्टर शेषराव वानखेडे स्टेडियमवर तर पाय ठेवायला जागा नव्हती. याठिकाणी विश्वचषक विजेत्या संघाचा अभिनंदनाचा सोहळा झाला. देशातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी डोळ्यात प्राण आणून हा क्षण अनुभवत होता.
 
 
काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ज्या प्रेक्षकांनी हार्दिक पांड्याची टिंगलटवाळी केली, हुर्ये उडवली, त्याच हार्दिक पांड्याचे तेवढ्याच खुल्या अंत:करणाने जयजयकार करत स्वागत केले आणि मनाच्या मोठेपणाचे उमदे दर्शन घडवले. हार्दिक पांड्याच्या मनातही हेच ते क्रिकेटवेडे होते का, अशी शंका क्षणभर तरळून गेली असेल.
 
 
T-20 World Cup Cricket मुळात क्रिकेट हा साहेबांचा खेळ मानला जात होता. आपल्या देशावर जवळपास दीडशे वर्षे राज्य केलेल्या गोर्‍या साहेबांनी जाता जाता क्रिकेटची भेट आपल्याला दिली आणि आज क्रिकेट हा इंग्लंडचा मूळ खेळ नाही तर भारताचा मूळ खेळ वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. देशाच्या कोणत्याही भागात आपण गेलो तर गल्लीत, रस्त्यावर, शेतात, मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळताना लहानच नाही तर मोठी मुलंही आपल्याला दिसतील. विशेष म्हणजे गल्ली क्रिकेट असो की दिल्ली क्रिकेट येणारे-जाणारे आपले कितीही महत्त्वाचे असलेले काम सोडून रस्त्यावर थांबून लहान मुलांचा क्रिकेटचा खेळ पाहत असतात. जगाच्या कोणत्याही भागात असे दृश्य दिसत असेल, असे वाटत नाही. काही हजारांच्या नाही तर लाखोंच्या संख्येत असलेल्या क्रिकेटवेड्यांनी याठिकाणी आपल्या वेडेपणाचे कोणतेही प्रदर्शन केले नाही तर शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरिकाचे दर्शन घडवले. दोन-तीन दिवसांपूर्वीच उत्तरप्रदेशातील हाथरस येथे एका सत्संगातील काही लाखांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्यामुळे जवळपास सव्वाशेवर लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे विश्वचषक विजेत्या संघाच्या स्वागतासाठी काही लाखांची गर्दी जमल्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र, मुंबईतील क्रिकेटवेड्यांनी या शब्दात वेडेपणा असला तरी तो भावनेचा आहे; कृतीचा नाही, असे दर्शवत आपल्या वेडेपणाचे दर्शन न घडवता शहाणपणाचे दर्शन जगाला घडवले, याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. त्याचबरोबर अशी कोणतीही दुर्दैवी घटना यानिमित्ताने होणार नाही, यासाठी आवश्यक ते निर्देश मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांना देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही करावे तेवढे कौतुक कमी आहे. एखादी दुर्घटना घडून गेल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा ती दुर्घटना घडूच नये, यासाठी प्रयत्न करणारा, त्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणारा खरा आणि उत्तम प्रशासक असतो, याचे दर्शनही आपल्या छोट्या पण लाखमोलाच्या कृतीतून शिंदे यांनी घडवले, याबद्दल त्यांना धन्यवाद दिले पाहिजे.
 
 
T-20 World Cup Cricket मुख्यमंत्री शिंदे तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना विधिमंडळात बोलावून त्यांचे स्वागत केले, त्यांच्यावर रोख पुरस्कारांचा पाऊस पाडला, याबद्दलही ते नुसते धन्यवादास नाही तर अभिनंदनासही पात्र आहेत. एखादा नेता कसा असावा, याचा आदर्श आपल्या कृतीतून शिंदे यांनी घालून दिला. आपल्या नावातच एकनाथ नाही तर आपण खर्‍या अर्थाने राज्यातील जनतेचे नाथ असल्याचे दाखवून दिले. विश्वचषकातील या विजयाने भारतीय संघाने हुरळून जाऊ नये, यशाची नशा आपल्या डोक्यात शिरू देऊ नये. कारण हा वर्षभर सुरू असलेल्या स्पर्धेतील शेवटचा सामना नाही, तर एका नव्या युगाची सुरुवात आहे. आत्मविश्वास नक्कीच असला पाहिजे, पण अतिआत्मविश्वास हा नेहमी अडचणीत आणत असतो. आत्मविश्वास आणि अहंकारातील सीमारेषा अतिशय पुसट आहे, आत्मविश्वास कुठे संपतो आणि अहंकाराची लागण केव्हा आणि कशी होते, हे कळतही नाही. भारतीय संघ असे करणार नाही, असा पूर्ण विश्वास आहे. टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मायदेशी परतल्याबद्दल खूप खूप स्वागत आणि अभिनंदन... 
Powered By Sangraha 9.0