- देशाला नेतृत्व देणारे नेते दिले अभाविपने
- श्रीधर गाडगे यांचे प्रतिपादन
- जिल्हा संमेलनात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
नागपूर,
देशाच्या अनेक ज्वलंत आंदोलनात आतापर्यंत अ.भा.विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचे सर्वात मोठे योगदान राहिले आहे. आणीबाणीच्या कार्यकाळात नेत्यांना अटक झाली तेव्हा विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनीच आंदोलनाची मुख्य धुरा सांभाळली होती. देशाला नेतृत्व देणारे नेते अभाविपने दिले असल्याने माणूस नावाचे अभाविप हे एक गाव आहे. गेल्या 75 वर्षांत या संघटनेने माणूस घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे स्पष्ट प्रतिपादन रा. स्व. संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक Shridhar Gadge श्रीधर गाडगे यांनी केले.
Shridhar Gadge : दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या अनुषंगाने दक्षिण अंबाझरी मार्गावरील बी. आर. एस. मुंडले सभागृहात मंगळवारी राष्ट्रीय विद्यार्थी दिनाचे औचित्य साधून अभाविपच्या जुन्या तसेच विद्यमान कार्यकर्त्यांचे जिल्हा संमेलन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर दत्ताजी डिडोळकर जन्मशताब्दी समितीचे विदर्भ प्रांत संयोजक भूपेंद्र शहाणे, अभाविप राष्ट्रीय कला मंचचे अ. भा. प्रमुख प्रदीप मेहता, नागपूर महानगर अध्यक्ष प्रा. रविकिशन मोर, महानगर मंत्री कार्तिक सीरिया यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते अभाविपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक, बापू भागवत, प्रकाश एदलाबादकर, प्रभू देशपांडे, रवि कासखेडीकर,निलेश साठे,किशोर धाराशिवकर,श्रीपाद रिसालदार, निलीमा पाठक, रंजना भागवत,जगदीश सुकळीकर, विश्वास इंदूरकर आदींचा समावेश होता.
क्रमांक एकची विद्यार्थी संघटना
Shridhar Gadge : श्रीधर गाडगे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, अभाविपने देशाला चांगल्या गुणांचे युवा नेतृत्व दिले आहे. अभाविपचा मुळ आधार आत्मियता असल्याने जगातील क्रमांक एकची विद्यार्थी संघटना म्हणून अभाविपचा उल्लेख होतो. पुढच्या पिढीला अशा संघटनेतून प्रेरणा मिळते.
देशहितार्थ काम करणारा कार्यकर्ता
आपल्या मार्गदर्शनात प्रदीप मेहता म्हणाले, कोणतेही अपेक्षा न ठेवता अभाविपचा प्रत्येक कार्यकर्ता देशहितार्थ काम करीत असतो. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात सुध्दा विद्यार्थ्यांचा सहभाग विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर आवाज उचलणार एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजेच अभाविप होय.
ज्ञान, शील, एकता ही त्रिसूत्री
भूपेंद्र शहाणे म्हणाले, विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक आंदोलन झाले आहे. ज्ञान, शील, एकता या त्रिसूत्रीला अनुसरून विद्यार्थी परिषदेची वाटचाल सुरू आहे. दत्ताजी डिडोळकर यांनी अभाविपला दिलेली शिकवण कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात उपयोगी ठरत आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रियंका वैद्य यांनी केले. संमेलनाच्या प्रारंभी दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक डॉ. रविशंकर मोर यांनी केले. संयोजक भागवत भांगे यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सत्कार सोहळ्याचे संचालन केले. सत्कारमूर्तींचे प्रतिनिधी निलेश साठे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अभाविपचे गीत सीमा सालोडकर यांनी सादर केले. याप्रसंगी प्रामुख्याने मीरा कडबे, भागवत भांगे, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती. आभार कार्तिक सिरीया यांनी मानले. अभाविपच्या संमेलनात जिल्ह्यतील मोठया संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.