वेध
- विजय कुळकर्णी
Farmers Association : शेतकर्यांच्या विविध समस्यांबाबत सरकारविरुद्ध चळवळ उभारून आंदोलने करणारी संघटना म्हणून ओळख असलेल्या राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बुलढाणा जिल्ह्यात शकले पडली आहेत. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच शेतकर्यांच्या या संघटनेत फूट पडणार, हे स्पष्ट होते. त्याहीपूर्वी सदाभाऊ खोत यांनी आपली वेगळी चूल मांडली होती. आता बुलढाणा जिल्ह्यात रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानीचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे होऊन महाराष्ट्र क्रांती नावाचा पक्ष स्थापन केला आहे. तसेच, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जिल्हाध्यक्षपद भूषवलेले कैलास फाटे यांनीही स्वाभिमानीला राम राम ठोकून स्वत:ची सत्याग्रह शेतकरी संघटना केली. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बुलढाणा जिल्ह्यात प्रखर नेतृत्वच शिल्लक राहिलेले नाही. संघटनेची शकले होण्यामागे राजू शेट्टी यांचा एककल्ली स्वभाव हे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. रविकांत तुपकर यांना दोन-तीन निवडणुकीत उमेदवारी मागे घ्यायला लावली. आम्ही निवडणुकीची तयारी करतो आणि ऐनवेळेवर शेट्टी साहेब आम्हाला थांबा, असे म्हणतात. आता कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच, असा निश्चय करून रविकांत तुपकर यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविलीच.
Farmers Association : या निवडणुकीत त्यांना मतदारांचा अपेक्षेपेक्षा जास्त पाठिंबा मिळाला. विशेषत: घाटावरील बुलढाणा जिल्ह्यात त्यांना भरघोस मते मिळाली. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला, तरीही भविष्यात आपण नक्कीच निवडून येऊ शकतो, अशी खात्री त्यांना पटावी एवढी त्यांना या निवडणुकीत मिळाली. त्यानंतर राजू शेट्टींनी त्यांना संघटनेतून काढल्यानंतर त्यांनी स्वत:ची संघटना स्थापन केली. आगामी विधानसभा निवडणुकीचीदेखील त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शेट्टी साहेब संघटना कशी चालवितात. कैलास फाटे हे देखील निवेदन, निदर्शनांच्या माध्यमातून सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. प्रसार माध्यम, समाज माध्यमातून प्रकाशझोतात कसे राहावे, हे त्यांना ठाऊक आहे. त्याचाच परिणाम म्हणून काल खामगावला आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी त्यांच्या घरी गेले. त्यांनी तिसर्या आघाडीत सहभागी होण्याचे आमंत्रणच कैलास फाटे यांना दिले. महायुती किंवा महाविकास आघाडी हे दोघेही शेतकरी हितासाठी योग्य नसल्याचा साक्षात्कार त्यांना काल झाला. त्यामुळे छोट्या छोट्या पक्षांना एकत्र करून त्यांची तिसरी करून महायुती व महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यासाठी त्यांनी कैलास फाटे यांना त्यांची सत्याग्रही संघटना सोबत हवी आहे. या संघटनेत डोकी किती आहेत हे त्यांना माहीत नाही. पण, त्यांच्या व्हॉटस्अप, इतर समाज माध्यम, वर्तमानपत्रातून सत्याग्रही संघटनेच्या बातम्या त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतील. त्यावरून त्यांनी या संघटनेला घेण्याचे ठरविले असावे. राजू शेट्टींच्या नेतृत्वात काम करणारा प्रशांत डिक्कर हा एकमेव नेता बुलढाणा जिल्ह्याच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता दिसत आहे.
राजू शेट्टी यांनी Farmers Association स्वाभिमानी शेतकरी संघटना काढून ऊस उत्पादकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. हळूहळू ही संघटना राज्यभर फोफावली. बुलढाणा जिल्ह्यात या संघटनेचे काम अतिशय चांगले होते. शेतकर्यांच्या प्रश्नावर आंदोलने शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यात ही संघटना अग्रेसर होती. पण, ही संघटनादेखील आता किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही. सत्ता आणि पैसा दिसला की, नेते आपल्या मूळ उद्देशाकडे दुर्लक्ष करतात. त्यातून अंतर्गत लाथाळी सुरू होते आणि ती संघटना कोलमडते. परिणामी शेतकर्यांचे प्रश्न कायमच राहतात. शेतकर्यांच्या कापूस, सोयाबीन, ऊस इत्यादी व दूध उत्पादकांच्या दुधाला दरवाढ या मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून केल्या जात आहेत. अनेक सरकारं आली आणि गेली. मात्र, शेतकर्यांचा हा प्रश्न कायमच आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी शेतकरी संघटना सरकारला तोडगा का सुचवित नाहीत, असा सवाल यानिमित्ताने निर्माण होतो. शेतकरी संघटित नसल्याचा गैरफायदा सत्ताधारी आणि विरोधक दोघेही घेतात. मात्र, नैसर्गिक आपत्तीची मदत मिळेल, हमी वाढतील, यावर्षी आपल्या मालाला चांगला भाव मिळेल, या अपेक्षेवर जगत असतो. त्यांचा विश्वास असलेल्या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी पदाच्या लालसेपोटी हेवेदावे करतात. त्यामुळे शेतकरी संघटनांचा मूळ उद्देश बाजूला राहतो व राजकारण सुरू होते. विशेष म्हणजे स्वाभिमानीतून बाहेर पडलेला किंवा काढलेला प्रत्येक नेता आपली स्वत:चीच संघटना काढत असल्याचे चित्र सध्या बुलढाणा जिल्ह्यात तरी दिसत आहे. शेतकर्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शेतकर्यांची एकतरी दमदार संघटना आवश्यक आहे.
- ८८०६००६१४९