- विवेक घळसासी
ज्येष्ठ निरुपणकार
१५ ऑगस्ट २०२४ रोजी आपण ७८ वा 'Swa'Tantra स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. हिंदुस्तानच्या आत्तापर्यंतच्या स्वतंत्र वाटचालीमध्ये अभिमान वाटावा, आनंद व्हावा, आपण भारतीय असण्याचा गर्व वाटावा अशा अनेक गोष्टी घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अर्थ, उद्योग, कृषी आदी क्षेत्रांमध्ये अनन्यसाधारण यश मिळविले आहे. उल्लेख करायचा झाला तर क्रीडा क्षेत्रामध्ये आणि त्यातही सुविधा नसणार्या सामाजिक घटकांमधून मोलाची कामगिरी बजावणार्या खेळाडूंचे प्रमाण वाढत आहे. म्हणजेच प्रशिक्षण नाही, खेळाचे मैदान नाही, साहित्य नाही... इतकेच नव्हे, तर घरात पुरेसे सकस अन्नही मिळण्याची खात्री नसताना, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असण्याच्या वर्गातून मुले-मुली पुढे येऊन जागतिक स्तरावर विविध पारितोषिके मिळवत आहेत. निश्चितच हीदेखील अभिमानाची बाब आहे.
आपण अवकाश क्षेत्रात केलेले अतुलनीय कार्य जगासमोर आहेच. आता आपण अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झालो आहोतच. पण, एवढ्यावरच थांबलो नसून आता आपण अन्य देशांना आवश्यकतेनुसार अन्नधान्य पाठवू शकतो. या बरोबरीने आपण सैनिकी सामर्थ्यामध्येही जगाच्या नजरेत भरेल अशी वाढ केली असून केवळ आयात केलेली विमाने वा तोफा-रणगाडी इथपर्यंत ती सीमित नाही तर त्यातही भारत स्वावलंबी होत आहे. स्वदेशात निर्माण होणार्या शस्त्रास्त्रांच्या साह्याने आपला देश, सैनिक सीमाही सुरक्षित होत आहेत. या सगळ्याबाबत आनंद वाटावा आणि यासाठी वेळ, श्रम, कल्पकता देणार्या सर्वांचे आपण मनापासून अभिनंदन केले पाहिजे आणि इतका मोठा टप्पा गाठल्याबद्दल या कामी प्रयत्नरत प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो, देशकामाला आयुष्य समर्पित करणार्या प्रत्येकाप्रती आपण आदरभाव प्रकट केला पाहिजे.
'Swa'Tantra एका बाजूने या सगळ्या वाटचालीचे समाधान, आनंद, गर्व वाटत असताना आता सगळेच काही ठीकठाक आहे, असे समजून आपण वागू लागलो तर मात्र येत्या काळात आपल्याला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल हेदेखील चालणार नाही. याचा अर्थ उद्या शत्रुराष्ट्राकडून भारताच्या सीमेवर आक्रमण होईल, घनघोर युद्ध होईल असे नाही. येत असणार्या नैसर्गिक आपत्ती पुढेही उभ्या ठाकणार आहेत. सध्या पुराने, भूस्खलनाने अनेक भागांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. मात्र, त्यामुळे आपण संकटात येण्यापुरताही हा धोका मर्यादित नाही. तर यानिमित्ताने मी वाचकांचे एका महत्त्वपूर्ण लक्ष वेधू इच्छितो. ते असे की, कोणताही देश विकासाच्या वाटेवर पुढे जात असताना किंवा नवनवीन उच्चांक स्थापित करीत असताना अनेक संभाव्य धोक्यांचा विचार करावा लागतो. प्रामुख्याने जगासमोर येत असल्यामुळे आर्थिक आव्हानांचा विचार केला तर दिसते की, युरोप-अमेरिकेसारख्या कालपर्यंत जगात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणार्या देशांच्या आर्थिक स्थितीच्या पृष्ठभूमीवर आज भारताची आर्थिक विलक्षण चांगली आहे. त्यात उद्या काही संकट येऊन गडबड माजणार आहे, अशातलाही भाग नाही. अर्थात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी स्वातंत्र्याचाही विचार करायला हवा.
इथे मला एक प्रसंग आठवतो, त्याचा उल्लेख करतो. कारण त्यातून संकटाची दिशा केवळ सीमा, नैसर्गिक आपत्ती वा आर्थिक आपत्ती अशी नसून मानसिक आणि बौद्धिक स्तरावरूनही हे संकट हे सांगायचे आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सविनय कायदेभंगाची चळवळ, सशस्त्र क्रांती, साहित्यिकांचे योगदान असे सगळे कामी आले. अनेकांनी जिवाची आहुती दिली. इथे राम-रावण युद्धाच्या वेळचा प्रसंग सांगायला हवा. हे युद्ध टाळण्यासाठी वालीपुत्र अंगदास शिष्टाईला पाठवले होते. अंगद दरबारात गेले असताना रावणाने परिचय विचारला आणि वालीचा पुत्र असल्याचे त्याच्या ऐकल्यानंतर, तुझ्या पित्याला रामाने मारले. मग आता त्यांचीच गुलामी करण्यात, त्यांचा प्रतिनिधी होऊन वकिली करण्यात तुला लाज वाटत नाही का, असे विचारायचे ठरवले. यासाठी वालीचा वध झाला असल्याचे माहिती असूनही चतुराईने प्रश्न विचारला, ‘तुझे पिताश्री कसे आहेत?’ साहजिकच अंगदाने प्रश्नाचा तार्किक शेवट ओळखला आणि तितक्याच चतुराईने उत्तर दिले, ‘थोड्याच तुमची आणि त्यांची भेट होईल. तेव्हा तुम्ही एकमेकांचे क्षेम-कुशल विचारा.’ या एका उत्तरावरून आपण याचा बुद्धिभेद करू शकत नाही, हे रावणाच्या लक्षात आले. सारांश हा की, स्वत:चा बुद्धिभेद न होऊ देणे हे स्वातंत्र्य टिकवण्यातले पहिले प्राणतत्त्व आहे.
'Swa'Tantra आज आपण स्वतंत्र आहोत असे म्हणतो तेव्हा बुद्धिभेदाच्या चक्रव्यूहातून खरेच सुखरूप बाहेर आहोत का, पडू शकतो का वा पडण्याइतकी तरी स्वतंत्रता आपल्याकडे आहे का, याचा विचार करायला हवा. पण याचे उत्तर नकारात्मक येते, तेव्हा काळजी वाढते. आज आपण तरुणांची सर्वाधिक संख्या असणारा देश असे छातीवर हात ठेवून सांगतो. पण भविष्य हातात असणार्या युवा पिढीलाच जगभरातील दृश्य आणि अदृश्य रावण एका भेदाच्या जेरबंद करू इच्छित आहेत. त्यांचा बुद्धिभ्रम करत आहेत. हा भेद तरुणाईच्या लक्षात आला नाही तर आपण जगातील स्वतंत्र देशांमधील एक देश असूही; पण यात ‘स्व’तंत्र असणार नाही. ज्या देशातील तरुण पिढी स्वत:च्या तंत्राने, मंत्राने, धारणांनी उभी राहू शकत नाही ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने भेदाच्या जाळ्यात अडकण्याचा मोठा धोका येत नाही. म्हणूनच यापासून आपल्याला सावध राहणे गरजेचे आहे. युवकांबरोबरच समाजधुरिणांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच अन्य हजार गोष्टींना काही काळ बाजूला ठेवून नव्या पिढीला भ्रमाच्या जाळ्यात सापडणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे. भ्रम अनेक प्रकारचे आहेत. जीवनशैलीविषयक, आवडी-निवडीविषयक भ्रम आहेतच आणि भेद त्याहूनही भयंकर आहेत.
आपल्याला स्वातंत्र्य मिळत असताना चर्चिलने म्हटले होते की, आम्ही भारताला रक्तपात आणि अंदाधुंदीमध्ये सोडून चाललो आहोत. दुसरीकडे काही ब्रिटिश समाजशास्त्रज्ञांनी लिहिले होते की, हा देश स्वतंत्र होईल; पण ५०-७५ वर्षांमध्ये या देशाच्या राज्या-राज्यामध्ये गृहयुद्धासारखी स्थिती निर्माण होईल. ही स्थिती निर्माण होण्यास जाती-जातींमधील भेद कारणीभूत ठरतील, प्रभावी वा ते जाणीवपूर्वक, प्रभावीपणे पुढे आणले जातील अथवा ते भेद कसे निर्माण होतील, याचाच विचार केला जाईल आणि बघता बघता परिस्थिती हाताबाहेर जाईल. या पृष्ठभूमीवर अशा जातीय विद्वेषाच्या रावणडावामध्ये आपण सहभागी न होण्याचे नव्या पिढीच्या अंगदाने लक्षात घेतले पाहिजे. कोणत्याही पातळीवर समाजात जातीय प्रवृत्ती, जातीय उन्माद निर्माण होता कामा दुर्दैवाने आज विविध नावांच्या आडून हाच प्रयत्न होताना दिसतो आहे. शेवटी असा विचार पसरवणारेही रावणच आहेत. त्यांच्यामध्ये जादूई जग निर्माण करण्याची क्षमता आहे. नव्या पिढीने सतत याची जाण ठेवायला हवी. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंग्याला साक्षी ठेवून तरुणाईने कोणत्याही भ्रमात न अडकण्याची प्रतिज्ञा करणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे, तर जीवनात जात आणि त्यातही भेद वाढविण्यासाठी जात हा विषय कधीच येऊ देणार नाही, हे ठरवणे गरजेचे आहे. कारण आपण जाती-पातीत विभागलो गेलो तर देशाचे स्वातंत्र्य टिकणे शक्य नाही. या देशाचा अमृतकाल हे केवळ स्वप्नच राहील आणि तो विषकालही होऊ शकेल. म्हणूनच भेद आणि भ्रम दूर करण्यासाठी आपण हा उपाय हवा.
'Swa'Tantra याची सुरुवात घरापासूनच व्हायला हवी. चर्चा करत असताना पालक अगदी सहज, ते आपल्यापैकी नाहीत किंवा ते आपल्यातलेच आहेत, असे बोलून जातात. अमके-तमके आपल्या समाजाचे आहेत, असेही शब्दप्रयोग बरेचदा होतात. पण हे प्रकर्षाने टाळले पाहिजे. आपल्या समोर असणारा प्रत्येक जण आपला आहे, हे नव्या पिढीच्या मनावर बिंबवले पाहिजे. धर्म, भाषा, आहार अशा कशाचाही विचार न करता मुले एकमेकांमध्ये मिसळतील, वाढतील तेव्हाच भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहील. हे समजून घेण्याची हीच उचित वेळ आहे.
(शब्दांकन : स्वाती पेशवे)