Anarchy in Bangladesh : बांगलादेश, भारत आणि पाकिस्तान हे ऐतिहासिकदृष्ट्या एकाच भूराजकीय प्रदेशाचे सदस्य आहेत. त्यामुळे एका राष्ट्रात घडणार्या घटनांचे पडसाद दुसर्या राष्ट्रामध्ये उमटतात. १९४७ मध्ये धर्मनिरपेक्ष भारत इस्लामी पाकिस्तान अशी फाळणी झाली. परंतु, भाषा आणि वंशाच्या मुद्यावर तत्कालिन पूर्व पाकिस्तान लयास जाऊन बांगलादेश हे नवीन राष्ट्र निर्माण झाले. १९७१ मधील या संग्रामात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Anarchy in Bangladesh : तसे पाहता लष्करी उठाव आणि राज्यक्रांती बांगलादेशला नवी नाही. १९७५ मध्ये बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान आणि त्यांच्या जवळपास परिवाराची हत्या केली गेली. तद्नंतर झिया उर रहमान आणि इर्शाद या दोघा जनरल्सनी बांगलादेशवर राज्य केले. या संपूर्ण काळात जोरदार शीतयुद्ध सुरू असल्यामुळे पाश्चिमात्य देशांनी भारतविरोधी शक्तींना आणि कट्टर इस्लामिक पक्षांना मदत आणि संरक्षण दिले. परंतु, गेली २० ते २५ वर्षे बांगलादेशमध्ये लोकशाही राजवट आहे. अर्थात, असे असले तरी रहमान यांची कन्या शेख हसीना गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असून त्यांनी विरोधकांना पूर्णपणे चिरडून टाकले. शेख हसीना यांच्या कारकीर्दीत बांगलादेश आणि भारतात अत्यंत घनिष्ट संबंध निर्माण झाल्यामुळे अशांत उत्तरपूर्व सीमा प्रांतांमध्ये आर्थिक प्रगती आणि शांतता निर्माण झाली. मात्र, ताज्या राज्यक्रांतीमुळे या वास्तवाला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला बांगलादेशमध्ये आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांचा प्रमुख सहभाग होता. सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाच्या मुद्यावरून हे आंदोलन सुरू झाले. पण लवकरच त्यात अतिरेकी इस्लामी संघटनांनी शिरकाव केला आणि या आंदोलनाच्या बुरख्याआड तेथील हिंदूंना लक्ष्य बनवण्यात आले. बांगलादेशच्या लोकसंख्येच्या १० टक्के म्हणजेच जवळपास एक कोटी लोकसंख्या हिंदूंची आहे. तेव्हा कट्टर पाकिस्तानप्रमाणे कट्टर इस्लामिक पक्षांच्या हाती बांगलादेशची गेली तर हे एक कोटी लोक १९४७ प्रमाणेच निर्वासित म्हणून भारतात येण्याची दाट शक्यता आहे. १९७१ मध्ये असाच निर्वासितांचा लोंढा आल्यामुळे भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप केला होता, हे विसरता कामा नये.
Anarchy in Bangladesh : एकूणच भारतीय उपखंडाचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये फाळणीपूर्वी १० टक्के हिंदू होते. आता तिथे जवळपास एक टक्का उरले आहेत. बांगलादेशमध्ये हिंदूंची संख्या ३० टक्क्यांहून १० टक्क्यांवर आली आहे. पण हे १० टक्के हिंदूही बांगलादेशातून भारतात ढकलले गेले तर भारताचे एकतर्फी धर्मनिरपेक्ष धोरण टिकेल की नाही, याबद्दल संशय आहे. शेख हसीनांच्या काहीशा एकाधिकारशाहीत बांगलादेशने आर्थिक प्रगती केली. आज बांगलादेशमधील लोकांचे राहणीमान पाकिस्तान आणि भारताच्या तुलनेत चांगले आहे. सध्याची अराजकाची स्थिती कायम राहिली तर पाकिस्तानप्रमाणेच हा देशही आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीत जाण्याची शक्यता आहे. इस्लामी कट्टरवादामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसारखे देश भिकेला लागले आहेत. बांगलादेशदेखील त्यांचाच कित्ता गिरवणार का, हाच प्रश्न आहे. या आधीच्या बांगलादेशातील सत्ताबदल बाह्यशक्तींमुळे झाले होते. त्या मानाने सध्याचा बदल आंतरिक कारणांमुळे झाला, असे मानावे लागेल. शेख यांनी केवळ निवडणूक जिंकल्यामुळे बांगलादेशवर वरचष्मा प्रस्थापित केला होता आणि विरोधी पक्षाला पूर्णपणे नेस्तनाबूत केले होते. अर्थातच ही घोडचूक होती. त्यापासून भारतालाही बरेच शिकण्यासारखे आहे.
Anarchy in Bangladesh : बांगलादेशमध्ये अराजक का घडले, हे येथे समजून घेणे गरजेचे आहे. या देशात आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरू झाले. मात्र, या विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण लागले, आरक्षण हा विषय तात्कालिक असून आंदोलनामागे अन्य कारणे आहेत, हे लक्षात आले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचे आरक्षण रद्द केल्याने ९३ टक्के जागा नोकरभरतीसाठी खुल्या झाल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांची प्रमुख मागणी मान्य झाल्याने आता आंदोलनाची आवश्यकता राहिली नव्हती; परंतु आरक्षणाच्या आंदोलनात विद्यार्थी कमी आणि दहशतवादी, विरोधी पक्ष तसेच नाराज घटकांचा समावेश असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती ही पुढच्या हिंसक घटनांची तयारी करण्यासाठी मिळालेली संधी असल्याचे म्हटले होते. दुर्दैवाने ते अवघ्या दोन आठवड्यांमध्ये खरे ठरले. बांगलादेशमध्ये आंदोलनामध्ये तीनशेहून अधिक लोकांचा बळी जातो, त्यात १४ पोलिस आणि सहा पत्रकारांचा समावेश असतो, यावरून हिंसाचार किती खोलवर गेला आहे, लक्षात यायला हरकत नाही. शेख हसीना सरकारने शांततेचे आवाहन करूनही संपूर्ण बांगलादेशमध्ये रक्तरंजित खेळ आणि हिंसाचार सुरू होता. आरक्षणासाठी सुरू झालेले आंदोलन पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्यापर्यंत गेले.
असहकार आंदोलनाच्या पहिल्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यात अवामी लीग आणि आंदोलकांमध्ये हाणामारी झाली. संपूर्ण बांगलादेशमध्ये मृत्यूचा नंगा नाच सुरू झाला. सरकारी निवासस्थाने सरकारी कर्मचार्यांना लक्ष्य केले गेले. त्यामुळे सरकारने तीन दिवस सरकारी कार्यालयांना सुटी जाहीर केली; तरी हिंसाचार थांबला नाही. यथावकाश आंदोलकांनी ‘ढाका चलो’ची हाक दिली. अशा परिस्थितीत हिंसाचार आणखी भडकण्याची शक्यता वाढली. बांगलादेशमध्ये हिंसाचार, निदर्शने आणि जाळपोळ आंदोलनादरम्यान ढाकामधील बहुतांश दुकाने आणि मॉल बंद होते. येथील शाहबागमध्ये शेकडो विद्यार्थी, आंदोलक आणि त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटी (बीएसएमएमयू) येथे अनेक वाहने जाळण्यात आली. रुग्णालयाच्या आवारात खाजगी कार, रुग्णवाहिका, मोटारसायकल, बसेसची तोडफोड करण्यात आली. वाढता हिंसाचार थांबवण्याच्या उद्देशाने शेख हसीना यांचे चर्चेचे निमंत्रण आंदोलकांनी नाकारले आणि शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांनी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, खाजगी आणि मदरशांचे विद्यार्थी तसेच कामगार, राजकीय कार्यकर्ते आणि इतर सार्वजनिक सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.
Anarchy in Bangladesh : या हिंसाचाराचा भारताच्या व्यापारावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आशियातील सर्वात मोठे बंदर असलेल्या पेट्रापोलमध्येही बराच काळ उलाढाल ठप्प राहिली. व्यापारावर परिणाम झाल्यामुळे सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. पेट्रापोल बेनापोल सीमेवरील वार्षिक व्यापार सुमारे तीस हजार कोटी रुपयांचा आहे. बांगलादेशमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे तेथील लोक आश्रय घेण्यासाठी भारताकडे वळू शकतात. ही आणि अशी अनेक आव्हाने दोन्ही देश कशी मोडून काढतात, ते आता पहायचे.