विज्ञान युगात संतांचा जीवनमूल्य विचार

    दिनांक :11-Aug-2024
Total Views |
संत प्रबोधन
प्रा. डॉ. हरिदास आखरे
Saint Tukaram : आज मनुष्याने विज्ञानाच्या जोरावर देदीप्यमान प्रगती केली आहे. त्यामुळे प्रत्येकाचे डोळे दिपून जावे इतके तंत्रज्ञान पुढे गेले आहे. आज आपण जगाच्या कोणत्याही कोपर्‍यामध्ये युगांडा, झेकोस्लोव्हाकिया, पॅलेस्टाईन, रशिया, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांमध्ये संगणकाच्या मदतीने पेजर, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल या सर्व संसाधनाच्या बळावर क्लिकवर कुठेही संपर्क करू शकतो. आज आपण घरात बसून कोणत्याही विद्यापीठातील कोणतेही पुस्तक वाचू शकतो. इतकेच काय त्याची कॉपी पण मिळवू शकतो. जगातील कोणत्याही व्यक्तीशी केव्हाही सहज बोलू शकतो. त्यामुळेच जगाचे रूपांतर एका वैश्विक खेड्यामध्ये झाले आहे. आज जगाच्या जरी आपण संपर्कात असलो, तरी आपण आपल्याच माणसांच्या मनापासून कोसोदूर आहोत, ही वास्तविकता नाकारता येत नाही. आपला जगाशी संपर्क वाढला असला, तरी आपला आपल्याशीच असणारा स्वसंवाद हरविला आहे. आपल्याच माणसांपासून आपण लांब गेलो आहोत. घराघरांतील संवाद बंद झाले आहेत. प्रत्येक जण मोबाईलवर बिझी आहे. ही अतिशय टोकाची वास्तविकता विसरून चालणार नाही.
 
 
lotus

 
Saint Tukaram संत तुकाराम म्हणतात, ‘आपुला आपणाशी संवाद!’ तेव्हाच आपण स्वतःच समजून घेऊ शकू. जीवनात तो ‘सेल्फ टॉक’ होणे गरजेचे आहे. प्रत्येक जण जगण्याच्या शर्यतीमध्ये आत्मभान विसरून गेला आहे. जो तो जगण्याच्या शर्यतीत फक्त धावत आहे. त्याला कुठे थांबावे हे माहीत नाही. म्हणून प्रत्येकाचा चेहरा हा चिंताग्रस्त, व्याधिग्रस्त पाहायला मिळतो. समाधानाचा भाव लोकजीवनातून लोप पावत चालला आहे.
 
 
संतांचा जीवनमूल्य
या सर्व परिस्थितीवर संतांनी सांगितलेला जीवन जगण्याचा, समाधानाचा, जीवनमूल्य विचार महत्त्वाचा ठरतो. ‘संत साहित्य’ हा भारतीय संस्कृती आणि अद्वैत विचारसरणीचा बहुमोल ठेवा आहे. त्यात मराठीतील संतसाहित्य म्हणजे महाराष्ट्र शारदेच्या मुकुटातील सर्वश्रेष्ठ असा देदीप्यमान हिरा आहे. गेल्या ७०० वर्षांपासून मराठी जनतेच्या अंतःकरणात येथील संतांची अभंगवाणी घर करून आहे. शिवाय श्रद्धापूर्वक जनतेने तिचे जतन केले आहे. संत साहित्याचा हा अनमोल वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे सहजच हस्तांतरित होत आला आहे. कारण त्यात मराठी माणसाला मायेचा ओलावा आढळला आहे. संत साहित्यात जशी परमेश्वरप्राप्तीची उत्कटता आहे; तशीच लोकोद्धाराची तळमळ आहे. त्यात अंतःकरणातून स्वाभाविक आवेशाने बाहेर पडलेल्या भावनांचे उमाळे आहेत. ऋषींचा द्रष्टेपणा आहे. सुमधूर गोडवा आहे. सर्व विश्वाला कृपामृताने चिंब करणारा प्रेमळपणा आहे. पंचेन्द्रियांनी जिच्या सेवनाने तृप्त व्हावे, अशी शब्दकळा आहे आणि या सर्वांहून विशेष बाब म्हणजे शब्दशस्त्रांनी नाठाळांना वठणीवर आणणारी प्रखरता आहे. पण, प्रखरतेतही मायेचा ओलावा दडलेला आहे. एकूणच सर्व मांगल्याचे अधिष्ठान असलेली, सर्व भूतमात्रांविषयी कणव अंतःकरणात सामावून घेणारी तेजस्वी आणि अशी ‘संतवाणी’ ही मराठी भाषेचे चिरंतन झळाळणारे अपूर्व असे भूषण आहे.
 
 
मध्ययुगीन कालखंडातील संत विचार
मध्ययुगीन काळात संत ज्ञानेश्वरांपासून तर Saint Tukaram तुकारामांपर्यंत सर्वच वारकरी संतांनी भक्तिमार्गाची चळवळ उभारून समाजाच्या नानाविध स्तरातील लोकांना एकसंध करण्याचे कार्य केले. संत अठरापगड जातीतून उदयाला आले व त्यांनी आपापल्या जातीचे नेतृत्व करून ‘जातिभेद सारे हे गा अकारण’ याची खात्री पटवून दिली. समाजात जातीयतेचे प्रस्थ असले, तरी भक्तिमार्गात या जातीयतेची बंधने शिथिल झाली व पंढरीच्या वाळवंटात ही सर्वच संतमंडळी परस्परांना प्रेमालिंगन देऊ शकली. संत बहिणाबाईने म्हटल्याप्रमाणे ज्या ज्ञानदेवांनी पाया रचला कळस होण्याचे सौभाग्य तुकोबांना लाभले. ज्याप्रमाणे संत तुकाराम हे भागवत मंदिराचे कळस झाले. त्याचप्रमाणे त्यांची वारकर्‍यांच्या अंतःकरणात विराजमान झाली. आज ४०० वर्षांनंतरही ती मराठी माणसाच्या जिव्हेवर सुभाषिताप्रमाणे घोळत आहे. त्यांच्या उपलब्ध असणार्‍या पाच हजार अभंगांची गाथा वारकर्‍यांचे श्रद्धास्थान ठरली. आजवर संत तुकारामांच्या अभंगवाणीचा विचार अनेक अंगांनी झाला आहे. लोकमानसाशी समरस झालेल्या तुकारामांच्या अभंगवाणीत त्यांचे व्यक्तित्व सहजपणे उमटले आहे. स्वतःशी संवाद साधणारे आत्मरत तुकाराम जनसामान्यांशीही साधतात. अंतर्मुख असूनही त्यांनी लोकजीवन समग्रपणे आणि आत्मीयतेने न्याहाळले. इतकेच नव्हे, तर लोकजीवनाचे बहूविध रंग आपल्या अभंगवाणीत आणले. त्यामुळे ते इतर संतांच्या तुलनेत निराळे ठरतात. एक सदाचारी भक्त, परखड भाष्यकार, सहृदय समाजनिरीक्षक आर्जवी उपदेशक अशी नानाविध रूपे त्यांच्या अभंगवाणीत प्रकट झाली आहेत. माणसाला क्षणिक आयुष्याची जाणीव करून दिल्याशिवाय तो वळणार नाही, अशी तुकारामांची धारणा होती. त्यांची अभंगवाणी कीर्तनाच्या माध्यमाद्वारे समाजात रुजली. त्यांच्या भाषेतील उपरोध-उपहासामुळे ती सर्वसामान्य माणसाला आपलेशी वाटली. माणसाच्या आयुष्यातील बालपण, तारुण्य आणि वृद्धापकाळ पाहणार्‍या तुकारामांसमोर तत्कालीन समाज होता. त्यामुळेच त्यांच्या अभंगवाणीचा पैस व्यापक आहे. या व्यापकत्वामुळे तुकारामांच्या अभंगवाणीचा बहुआयामी अभ्यास झाला व त्याचा विस्तारही होत गेला. त्यांच्या भाषेचे विश्लेषण केले, कोणी त्यांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी केली. तर, कोणी त्यांच्या अभंगात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब पाहू लागले. त्यादृष्टीने मानवी दृष्टिकोनातून संत वाङ्मयातील जीवनमूल्यांचा घेतलेला शोध निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. ‘संत साहित्यातील जीवनमूल्ये’ हा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे.
 
 
विज्ञान युग व जीवनमूल्य
आज विज्ञान युगात आपण सर्व सत्ता काबीज असल्या, तरी आपण आपली मूल्यव्यवस्था विसरत आहोत. एकीकडे संपत्ती आणि हव्यासाच्या मागे लागून नीतितत्त्वाचाच त्याला विसर पडू लागला आहे. पाश्चात्त्यांच्या अनुकरणाने मनुष्य आपल्या सामाजिक व राष्ट्रीय उत्तरदायित्वापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत त्याला उत्तम नागरिक घडविण्यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची गरज आहे. कारण त्याच्या आध्यात्मिक जडणघडणीतूनच त्याच्यात मानवी मूल्यांची रुजवण जाऊ शकते. त्या अनुषंगाने संतांनी सांगितलेली जीवनमूल्ये अधिक महत्त्वाची ठरणारी आहेत. संतांनी या जीवनमूल्ये विचारसरणीतून मानवी जीवनाला आवश्यक असणार्‍या जीवनमूल्याचा साक्षेपी वेध घेतलेला आहे. शिवाय त्याचे महत्त्वही प्रतिपादन केले आहे.
 
 
संतांनी सांगितलेली जीवनमूल्ये
Saint Tukaram : प्रार्थना, आचारधर्म, श्रमप्रतिष्ठा, भक्तिप्रेम, संवेदनशीलता, विश्वात्मकता, ज्ञानसाधना, आत्मसाक्षात्कार इ. तुकारामांनी सांगितलेल्या जीवनमूल्यांचा यथायोग्य परमर्श घेऊन शेवटी युगात जीवनमूल्यांचे स्थान निश्चित करणे गरजेचे आहे. त्याचा अंगीकार केल्याशिवाय समाज जीवनामध्ये समाधान व शांतता प्रस्थापित होऊ शकणार नाही. म्हणून निरामय समाधानी जगण्यासाठी संतांचा जीवनमूल्ये विचार विज्ञान युगातही महत्त्वाचा ठरतो. विज्ञानाच्या जोरावर आज मानवाने देवत्व प्राप्त केले आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी ईश्वर आहे, अशी आपली धारणा आहे. विज्ञानाच्या मानवानेदेखील या सर्व ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विज्ञान ही दुधारी तलवार आहे. ती चालविण्यासाठी विज्ञानाला अध्यात्माची साथ जोडणे आवश्यक आहे. तसे झाले तरच विज्ञानाच्या माध्यमातून मानव कल्याण साध्य होऊ शकते. यासाठी संतांनी सांगितलेल्या जीवनमूल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे.
 
- ७५८८५६६४००