तभा वृत्तसेवा
चिखलदरा,
Hataru Diarrhea : मेळघाटात गावागावात अतिसाराची लागण सुरूच आहे. आता तालुक्यातील हतरू या दुर्गम भागातील गावात साथ रोगाची लागण झाली आहे. या गावाची लोकसंख्या ९७८ आहे. या ठिकाणी सोमवारी रात्रीपासून अतिसाराची लागण झाली.
असून अनेक रुग्ण या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येत आहेत. काही रुग्ण ग्रामीण रुग्णालय चुरणी तसेच उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. उर्वरित रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र हतरु येथे उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.
हतरू या गावातील ३० ते ३५ लोकांना ही लागण झाली आहे. या सर्वांवर उपचार करण्यात आले असून गंभीर रुग्णांना ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे तर अति गंभीर रुग्णांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. चुरणी ग्रामीण रुग्णालयात सोनाली भुसुम१९वर्षे, सुशील बेठेकर ७ वर्षे, फुलमा भुसुम ४५ वर्षे, सुधाकर ठाकरे २५ वर्षे, तर अचलपूरच्या रुग्णालयात झानकु सेलुकर ५०वर्षे, दिव्या ठाकरे १३वर्षे आदी रुग्णांना रेफर करण्यात आले आहे.
//हातपंपातील पाण्यामुळे लागण
हातपंपातील दूषित पाण्यामुळे गावातील ३० ते ३५ लोकांना ही लागण झाली आहे. पैकी नऊ लोकांना आम्ही ग्रामीण रुग्णालय चुरणी व उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर केले आहे. ते हात पंप सील करण्यात आले आहे तसेच उर्वरित पाण्याच्या स्त्रोतांचे क्लोरीफिकेशन केले आहे. गावातील नागरिकांना पाणी उकळून व गाळून प्यावे, अशा सूचना देण्यात आल्या असल्याची हतरू केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र चव्हाण यांनी दिली.