अमरावती,
resolution of seats : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला फारसे यश आले नाही. त्याचे मुख्य कारण नेते, पदाधिकारी आणि कार्यकत्यांच्या संवादाचा अभाव होते. तो संवाद निरंतर व्हावा व विधानसभा निवडणुकीत लोकसभेची उणीव भरून काढत किमान २५ जागा जिंकण्याचा संकल्प मंगळवारी महायुती समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर सांस्कृती भवनात झालेल्या विभागीय बैठकीला केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड, संजय कुंटे खा.अनुप धोत्रे, चैनसुख संचेती, आ. रणधीर सावरकर, आ. श्वेता म्हाले, आ. अनिकेत तटकरे, प्रवीण पोटे, आ. योगेश टिळेकर, आ. अमोल मिटकरी, आ. देवेंद्र भुयार, अभिजित अडसुळ, केवलराम काळे, निवेदीता चौधरी, शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण पडोळे, सुरेखा ठाकरे, जयंत डेहनकर, तुकाराम बिडकर, प्रविण दिधाते यांच्यासह तीन्ही पक्षाचे पदाधिकारी व्यासपीठावर होते. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाची महायुती समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे.
समितीच्या वतीने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात २० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन होत आहे. त्या अनुषंगाने पश्चिम विदर्भ समन्वय समितीची बैठक पार पडली. प्रस्ताविकातून समन्वय समितीचे सदस्य संजय खोडके यांनी बैठकीच्या आयोजनाबाबत माहीती दिली. प्रमुख नेत्यांचे बैठकीत मागदर्शन झाले. विभागस्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती एका महासभेचे नियोजन देखील बैठकी दरम्यान करण्यात आले. बैठकीला पाचही जिल्ह्यातील भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते हजर होते.
अपप्रचाराला प्रतिउत्तर द्या : सामंत
लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या अपप्रचारामुळेच महायुतीला कमी जागा मिळाल्या. अलीकडे देखील लाडकी बहिण व लाडका भाऊ योजनेचा अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे त्यांना याचे उत्तर देण्याकरीताच ही संवाद सभा असून शासकीय योजनांची माहीती महायुतीचे कार्यकर्ते म्हणून स्वता: द्या आणि त्यांच्या अपप्रचाराला बळी न पडता त्यांना त्याच शब्दात उत्तर द्या, अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
यांची अनुपस्थिती चर्चेची
महायुती समन्वय समितीच्या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे, माजी खासदार नवनित राणा, आ. प्रताप अडसड यांची अनुपस्थिती दिसून आली. महायुतीचे घटक असलेले युवा स्वाभिमान पक्षाचे आ. रवि राणा बैठकीत नव्हते. विभागतील तीन्ही पक्षांचे आजी,माजी खासदार, आमदार उपस्थित असताना या चौघांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू होती.