समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा!

17 Aug 2024 06:00:00
मुंबई वार्तापत्र
- नागेश दाचेवार
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नव्हे, प्रामुख्यानं Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंच्या वैचारिक दिवाळखोरीला बघितल्यानंतर ‘नास्तिक’ या जुन्या गीताची आपसूक आठवण होते. सुमारे ६०-६५ वर्षांपूर्वी आजच्या मनुष्यविकृतीची तंतोतंत भविष्यवाणीच या गीताच्या गीतकाराने केली आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यातील काही बोल आजच्या महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीला उद्धृत करतात.
 
 
Uddhav Thackeray
 
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,
कितना बदल गया इन्सान... कितना बदल गया इन्सान,
सूरज ना चाँद ना बदला, ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इन्सान... कितना बदल गया इन्सान ॥
आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा,
कहीं पे झगड़ा, कहीं पे दंगा, नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इन्सान... कितना गया इन्सान ॥
राम के भक्त, रहीम के बन्दे, रचते आज फरेब के फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे, देख लिए इनके भी धंधे,
इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इन्सान... कितना बदल गया इन्सान ॥
 
राजकारणासाठी, आपल्या राजकीय स्वार्थासाठी, सत्तापदांच्या हव्यासापोटी, राजकीय माणुसकी सोडून जी खालची पातळी गाठली आहे, त्याचे हुबेहूब वर्णन या गीतातून करण्यात आले आहे. विश्वंभर चौधरी नामक तथाकथित समाजसेवक कम राजकारण्याने नुकतेच यांच्यासाठी देशात केवळ सत्तेच्या हव्यासापोटी किती नीच मनुष्य जमात तयार केली गेली, अशा शब्दातील ट्विट करून या प्रवृत्तींची त्यांच्या शैलीत प्रशंसा केली आहे.
 
 
 
अलिकडल्या काळातील Uddhav Thackeray उद्धव भूमिका, वक्तव्ये बघितली तर खरोखर ‘छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान, कितना बदल गया इन्सान...’ हे शब्द लागू होताना दिसत आहेत. दिल्ली समोर मुजरा करणार नाही, महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, महाराष्ट्र दिल्लीच्या इशार्‍यावर चालणार नाही, दिल्लीच्या हुकूमशाहीविरुद्ध झुकणार नाही, वाकणार नाही, अशा अनेक वल्गना उद्धव त्यांचे चेलेचपाटे करत आले आणि करत असतात. आज तर, ‘कितना बदल गया इन्सान’चे मूर्तिमंत उदाहरण उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी दिले. मुख्यमंत्रिपदाच्या हव्यासापोटी गद्दारी करत हिंदुत्वाची कास सोडत, २५ वर्षे जुनी युती तोडणारे उद्धव ठाकरे आज काँग्रेसनं आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्याला बिनशर्त पाठिंबा देईल, आश्वासन दिले. हीच समजदारी जर २०१९ ला दाखवत, हेच शब्द भाजपाला म्हटले असते तर नीलाम झालेली, चव्हाट्यावर आलेली अब्रू वाचली असती; झाकली मूठ राहिली असती! ‘घर का ना घाट का’ झाले नसते, इटलीच्या मॅडमपुढे मुजरा घालावा लागला नसता, दिल्लीपुढे झुकावे लागले नसते, मुख्यमंत्रिपदासाठी अशी घालमेल नसती, शिवसैनिकच मुख्यमंत्री करेल छातीठोक सांगण्याचे धाडस असते, जाहीर सभांमधून शिवसेनेचाच मुख्यमंत्री करू, भगवा फडकवू म्हणता आले असते, नाही का?
 
 
बरं; मातोश्रीमधील बाळासाहेबांची खोली ही आमच्यासाठी मंदिर आहे, त्या मंदिरात दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, असे वारंवार सांगितले गेले. आजवर या तुमच्या मंदिरात येऊन भाजपाचे लोकं प्रत्येक वाटाघाटी करत आले, शब्द देत आलेत. नेहमी बाळासाहेबांचा आदरच केला. मात्र, या लोकसभेवेळी तर मविआतील घटक पक्षाचा कोणताही नेता या मंदिराकडे फिरकला नाही. ढुंकून पाहिलं नाही. येत्या विधानसभेच्या निमित्ताने तरी या पवित्र मंदिरात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते नतमस्तक होतील का? म्हणतात ना आधीच ठोकर लागली असेल तर दुसर्‍यांदा माणूस ताकही फुंकून पितो. मग ठाकरेला भाजपाकडून दगाफटका मिळाल्यानंतर, पुन्हा दगाफटका होऊ नये म्हणून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वचन घेतले आहे का? नसेल तर कधी घेणार आहेत? या मंदिरात आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा करतील आणि निम्मे निम्मे वर्ष मुख्यमंत्रिपद विभागून देण्याचा शब्द सहकारी पक्षाचे नेते देतील? हा शब्द उद्धव ठाकरे आघाडीतील घटक पक्षांकडून घेणार की नाही? ‘चर्चा करायची असेल तर मातोश्रीवर या’ असे कधी खडसावतील? २५ वर्षे जुन्या मित्रावर विश्वास न ठेवता शब्द घेतला होता; मग जुम्माजुम्मा चार दिवसांच्या जवळीक करणार्‍यांवर डोळे झाकून विश्वास ठेवणार आहात का? त्यामागे काय लॉजिक आहे तुमचं? निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचं ठरवू अशी तुमची आजची भूमिका असेल तर हे मनपरिवर्तन काय झाले? हीच उच्च विचारसरणी २०१९ मध्ये कुठे गेली होती? त्यावेळी कोती मनोवृत्ती का दाखविली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आधी या महाराष्ट्राला द्यावी लागणार आहे उद्धव ठाकरेंना... नाहीतर ‘समय बड़ा बेढंगा’ असल्याने, महाराष्ट्रातील जनता ‘आदमी बना लफंगा’ म्हणाल्याशिवाय राहणार नाही.
 
 
काँग्रेसचा ढोंगीपणा : लाडकी योजना आणली, पण द्यायला पैसे आहे? असा सवाल Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. १५०० रुपयांनी विकत घ्यायला आमचं बहिणींचं तकलादू प्रेम नाही. १५०० रुपये देऊन नात्याचा अपमान केला आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणत आहेत. १९९ कोटी रुपयांचा खर्च कशासाठी असा आक्षेप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. वडेट्टीवार आज बोलले, पण काँग्रेसचा या पहिलेपासून विरोध आहे. राज्याचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आबा बागुल यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चुनावी जुमला आहे, फसवी आहे, ही योजना राबविणे राज्याच्या हिताचे नसल्याने ती तातडीने रद्द करा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला होता. प्रत्यक्षात ही योजना फसवी आणि राज्याच्या हिताची नसेल तर काँग्रेस आणि समविचारी आमदारांनी आपल्या मतदारसंघात ही योजना राबविली जाऊ नये, या फसव्या योजनेचा लाभ महिलांनी घेऊ नये, असे आवाहन महिलांना करण्याऐवजी आपल्या कार्यालयासमोर मोठमोठे लाडकी बहीण योजनेचे फलक लावून कार्यालयात फॉर्म भरून घेत आहेत. जे वडेट्टीवार आज या योजनेला विरोध करत आहेत, त्यांचे कार्यकर्तेदेखील या योजनेचे फॉर्म भरत आहेत. लोकसभेत खटाखट फॉर्मदेखील याच वडेट्टीवारांनी भरून घेतले होते. खटाखट पैसे देण्याचे आश्वासन फसवे नाही आणि जे प्रत्यक्षात दिले जात आहे, ते मात्र फसवे? वारे काँग्रेसचे पुरोगामी लॉजिक... ज्या योजनेला आपला विरोध आहे, जी योजना फसवी आहे, त्या योजनेचा लाभ आपल्या मतदार क्षेत्रातील तमाम महिलांनी किंबहुना काँग्रेसला मानणार्‍या महिलांनी तरी घेऊ नये, आवाहन का केले जात नाही आहे? कारण मतांचं राजकारण... दुसरीकडे महिलांच्या हिताच्या या योजनेला आपल्या राजकीय स्वार्थासाठी फक्त बदनाम करण्याचा धंदा चालवला आहे. बरं; झारखंड सरकारने ‘मुख्यमंत्री लाडली मंईया योजना’ सुरू केली आहे. १००० रुपये प्रत्येक महिलेला दिले जात आहे. येथील सरकार आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे आहे. महसुली, तूट असलेली झारखंडची अर्थव्यवस्था असून राज्यावर कर्जाचा डोंगर असताना चालविलेल्या या योजनेला काँग्रेसने विरोध केला आहे का? महाराष्ट्र सरकारला दिले जात असलेले ज्ञानाचे डोज काँग्रेसने आपल्या सहकारी पक्षाला पाजले नाही का? काँग्रेसचा ढोंगीपणा या निमित्ताने आता उघडा पडला आहे. 
 
- ९२७०३३३८८६
Powered By Sangraha 9.0