वेध
- विजय निचकवडे
Foreign production : विदेशी गोष्टींच्या प्रभावाची बुरशी आमच्या मनावर इतकी घट्ट बसते की, ती काही केल्या निघत नाही. स्वदेशीसाठी कधीकाळी आमच्याच लोकांनी आंदोलन उभारले होते, पण तो कदाचित इतिहास होता म्हणून आम्ही सोयीस्कर आता आम्हीच भारतीय विदेशी वस्तूंच्या खरेदीत अन्य देशांना मागे टाकण्याचा इतिहास रचण्याच्या कामाला लागलोय्. खरं तर आमच्याकडे सर्वच होतं, पण ‘पिकते तिथे विकत नाही ना’ म्हणूनच तर विदेशी वस्तू खरेदीचा मोह आम्हाला आवरता येत नाही. आज आपण विदेशी वस्तू खरेदीमध्ये अमेरिका आणि इंग्लंडलाही भारताने मागे टाकले आहे. मग हेच माझ्या देशावर माझे प्रेम आहे?
आम्हाला आमच्या देशाचा प्रचंड आदर आहे. म्हणून तर राष्ट्रगीत गाताना आमचा ऊर भरून येतो आणि आम्ही सांगतो, ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे.’ नक्कीच आहे. पण ते प्रेम सांगण्यापुरतेच का? असे म्हणावेसे वाटते. कारण आज आम्ही कुठेच कमी नाही. मेक इन इंडिया आणि मेड इन हे आमच्या अंगवळणी पडल्याचे आम्ही या ना त्या निमित्ताने सांगण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातही या ‘मेक इन इंडिया’चे लोन नक्कीच पसरले आहे. छोट्यांपासून मोठमोठाली उत्पादने आम्ही करीत आहोत. याच देशाने कोरोनासारख्या संकटाच्या काळात जगातील अन्य देशांसाठी लस आणि अन्य साहित्य जे भारतीयांना संकटसमयी धीर न सोडता तयार केले, ते विदेशी लोकांचेही जीव वाचविले. कृषी क्षेत्रापासून ते माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्वच बाबतीत आम्ही आज एक पाऊल पुढे असल्याच्या स्थितीत आहोत. असे असताना या सर्व गोष्टींचा अभिमान बाळगणारे आम्ही भारतीय विदेशी वस्तूंच्या प्रेमात का पडलो? याचा विचार करायलाच हवा?
आज अमेरिका, इंग्लंडसारखे देश विदेशी वस्तूंचा वापर आणि खरेदीच्या बाबतीत त्यांच्या प्रामाणिक आहेत. नक्कीच आवश्यक त्या गोष्टी नाईलाजाने घ्याव्याही लागत असतील, परंतु जे आमच्याकडे तयार होतं, तेही विदेशी बनावटीचे वापरणार असू तर ‘देखल्या देवा दंडवत’ या म्हणीप्रमाणे देशावर प्रेम दाखविण्यात अर्थ काय? आज इंग्लंडसारख्या सधन देशात केवळ २७ टक्के आणि अमेरिकेत ३६ टक्के नागरिक विदेशी वस्तूंची खरेदी करतात आणि आमच्या तब्बल ६७ टक्के विदेशी वस्तू खरेदी करून भारतीय असल्याचा अभिमान बाळगतो. ‘अवलाय’ या रिसर्च कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. यांच्या मते विदेशी बनावटीच्या वस्तूंचा दर्जा भारतीय वस्तूंच्या तुलनेत अधिक चांगला असतो. असा विचार करणार्यांची संख्या तब्बल ७८ टक्के आहे. फॅशन प्रॉडक्ट आणि इलेक्ट्रिक उपकरणांच्या खरेदीचे प्रमाण अधिक आहे. हा अहवाल आम्ही सांगत असलेलं देशप्रेम हे बेगडी आहे, असे सांगणारा आहे.
Foreign production : देशात १९०५ साली स्वदेशी आंदोलनाची आग पेटली होती. अरविंद घोष, रवींद्रनाथ ठाकूर, लोकमान्य टिळक, लाला लजपत रॉय यांना स्वदेशी आंदोलनाचे उद्घोषक संबोधले जाते. महात्मा गांधींच्या स्वतंत्रता आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणूनही स्वदेशीच्या आंदोलनाकडे पाहिले जायचे. आपल्या देशातील स्वीकारून दुसर्या देशातील वस्तूंचा बहिष्कार या तत्त्वावर हे आंदोलन रेटले गेले. पण या गोष्टी आज इतिहासजमा झाल्या आहेत. स्वदेशी वस्तूंच्या प्रेमात पडण्याऐवजी विदेशी वस्तूंचा पगडा आमच्या मनावर अधिक पडला, हे स्पष्ट झाले आहे. आम्ही सर्वच गोष्टींचे उत्पादन करतो. अगदी हवाई विमानेही आम्ही बनविण्याच्या स्थितीत आलो आहोत. मात्र, आमची मानसिकता विदेशीधार्जिणीच आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
आज भारतीय उत्पादनांचा डंका विदेशात वाजत आहे. मात्र, विदेशी आकर्षणाचे भूत आमच्या मानगुटीवर बसले असल्याने आज अमेरिका, इंग्लंडसारख्या देशांनाही पिछाडून टाकले आहे. आम्हाला नक्कीच गर्व असायला हवा, पण तो भारतीय असल्याचा आणि स्वदेशी वस्तूच्या वापराचा. पण आज विदेशी प्रेम पाहता हा अधिकार कदाचित गमाविण्याची वेळ आल्यास नवल वाटू नये. एकीकडे आमच्या देशाचं नेतृत्व भारतीय असल्याच्या अस्मितेने देशाला सर्वस्व समर्पित करून नि:स्वार्थ भावाने काम करीत आहे आणि आम्ही विदेशी बुरशी मनावर घेऊन देशप्रेमाचा आव आणत आहोत. जे आम्ही विदेशातून मागवितो, ते आमच्याकडेही होतं. पण विदेशी बुरशीने ते दिसत नाही एवढंच. शेवटी काय पिकतं तिथे विकत नाही, हेच खरं!
- ९७६३७१३४१७