यंगिस्तान
- जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Sharad Pawar : शरद पवारांनी, महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. त्यावर उत्तर देताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते की, महाराष्ट्राचा मणिपूर करण्यात शरद पवारांनी हातभार लावू नये. राज ठाकरे काका बाळासाहेब ठाकरे शरद पवारांचे मित्र होते. मात्र, त्यांनी राजकीय मंचावरून पवारांचा विरोधच केला आणि पवारांवर विश्वास ठेवता येत नाही, असे ते म्हणाले होते. शरद पवारांबद्दल राजकीय वर्तुळात भीती असली, तरी ती आदरयुक्त भीती नसून त्यांच्या राजकीय कारस्थानाबद्दलची भीती आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यांना स्वतःला ‘जाणता राजा’ म्हणवून आवडतं, पण त्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावेसे वाटत नाहीत. आता बदलापूरच्या प्रकरणावरून शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पावसात भिजले. त्यांनी पावसासोबतही आघाडी केली आहे की काय, असा प्रश्न आपल्या मनाला पडू शकतो. यावेळी शरद पवारांनी एक शपथ घेतली आणि उपस्थित लोकांनाही शपथ घ्यायला लावली. महिलांचं रक्षण करण्याची ही होती. याबाबत शरद पवार यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हा चांगलाच निर्णय आहे. कारण, महिलांचं रक्षण झालंच पाहिजे, त्यांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. त्यांच्यावरील अन्याय थांबलेच पाहिजेत. याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. त्यानंतर भीमाने दुःशासनाची छाती फाडली आणि त्याच्या रक्ताने द्रौपदीने आपले केस धुतलेले आहेत. महिलांचं रक्षण करणं, मान देणं ही हिंदू संस्कृती आहे.
हेही वाचा : उबाठाकडून निव्वळ ढोंगबाजी
काहीच वर्षांपूर्वी बेस्ट सीएम उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा कोविड सेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला होता. अशा अनेक घटना घडल्या होत्या. मात्र, त्यावेळी Sharad Pawar पवार उद्धव ठाकरेंना शपथ द्यायला विसरले. २०१३ मध्ये शक्ती मिल बलात्कार प्रकरणाच्या वेळी आर. आर. पाटील हे गृहमंत्री होते, पण पाटलांना शपथ देण्याची आठवण पवारांना झाली नाही. आघाडीचे सरकार असताना साकीनाका, परळी, बीड अशा अनेक ठिकाणी महिलांवर अनेकदा अत्याचार झाले होते. पण पवारांना त्यावेळी महिलांची सुरक्षा महत्त्वाची वाटली नाही. कारण या विषयावरून त्यांना त्यांची राजकीय पोळी भाजता येणार नव्हती का? बरं, पवारांनी ज्या लोकांना शपथ दिली आहे, ते महिलांचे आहेत का? जितेंद्र आव्हाड यांचा महिलेविषयीचा ऑडिओ सध्या चांगलाच गाजतोय. अनंत करमुसेला केलेली मारहाण, त्यामुळे त्यांच्या दोन लहान मुली आणि पत्नीला झालेला मनस्ताप पवार विसरले आहेत का? मागे आव्हाडांवर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केला होता; तो विनयभंग नसला, तरी त्यांनी त्या महिलेशी चांगली वर्तणूक केली नव्हती. कळव्याला मुख्यमंत्री शिंदेंना जी महिला जात होती, तिचे दोन्ही खांदे दाबून ‘काय उभी आहेस, बाजूला हो’ म्हणत तिला ढकललं, अशी तक्रार त्या महिलेने केली होती. त्या महिलेला बाजूला ढकलून अपमान करणारे आव्हाड एवढे कोण मोठे लागून गेले? त्यांना महिलांशी अशी वर्तणूक करण्याचा अधिकार कोणी दिला? ते आमदार झाले म्हणजे काय त्यांनी महाराष्ट्र घेतला का? ते संविधानापेक्षा, कायद्यापेक्षा खूप मोठे आहेत का? याविषयी शरद पवारांचे काही मत आहे का? या मोर्चात संजय राऊत हे मुंबईतून सहभागी झाले होते. संजय राऊत यांची महिलांविषयीची गलिच्छ, घाणेरडी वक्तव्ये सर्वश्रुत आहेत. ते महिलांना उघडपणे शिव्या देतात. विचार करा, खाजगीत काय काय बोलत असतील? स्वतः सुप्रिया सुळे बलात्कार प्रकरणात ‘अशा गोष्टी होत असतात’ असं म्हणाल्या होत्या. महिलांचा अपमान करणार्या अशा लोकांना घेऊन पवार महिलांचं संरक्षण करणार आहेत का? मग पवारांनी घेतलेली ही शपथ महिलांच्या सुरक्षेसाठी होती की फडणवीसांना महाराष्ट्रातून घालवण्यासाठी होती? असा दुर्गंध आपल्याला येऊ लागतो. मराठा आरक्षण इत्यादी मुद्दे सोडून पवार अचानक महिलांच्या सुरक्षेकडे कसे की आरक्षणावरून रान पेटवून झालेलं आहे.
राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरून आता पवारांनी राजकारण सुरू केले आहे. ही घटना दुर्दैवीच आहे. याविषयी सखोल चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे. मात्र, आता आघाडी हा मुद्दा चिघळण्याचा व यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राचा मणिपूर ते विविध मुद्दे हाताळत असल्याचा संशय ते स्वतःच निर्माण करत आहेत. ज्या पवारांना छत्रपतींचा पुतळा भंग झाला म्हणून राजकारण करावसं वाटतं, त्या पवारांनी छत्रपतींचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत काय काय प्रयत्न केले आहेत? छत्रपतींनी अठरापगड जाती एकत्र आणल्या आणि स्वराज्य निर्माण केलं. राज ठाकरे म्हणतात, Sharad Pawar पवारांनी जातिवादाचं विष पेरलं. म्हणजेच पवारांनी छत्रपतींच्या इच्छेविरुद्ध काम करून जाती-जातीत भांडणे लावली, असा याचा अर्थ होतो का? विरोधक देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या जातीवरून हिणवतात. कोल्हापूरच्या संभाजीराजे यांना राज्यसभेची खासदारकी दिली तेव्हा पेशवे आता छत्रपतींची नेमणूक करू लागले, अशा प्रकारचं विधान शरद पवारांनी केलं होतं. यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे? आणि ब्राह्मण समाजात त्यांना फूट का पाडायची आहे? महाराष्ट्राचा मणिपूर होईल, अशी वक्तव्ये ते का करतात? त्यापेक्षा महाराष्ट्राचा आनंदवनभुवन होईल, असे प्रयत्न ते का करत नाहीत? त्यांचा अनुभव ते महाराष्ट्राच्या विकासासाठी का खर्च करत नाहीत? २०१४ पासून फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ते इतके का झटत आहेत?
Sharad Pawar : लक्षात घ्या, शरद अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीऐवजी इतर पक्षाचाच मुख्यमंत्री बसवून त्यांनी राज्याची सूत्रे हलवली आहेत. २०१४ साली जेव्हा भाजपाचं बहुमत हुकलं तेव्हा पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. तोपर्यंत त्यांना फडणवीसांचा स्वभाव आणि कार्य करण्याची पद्धत माहीत नव्हती. पण जेव्हा पवारांना कळलं की, फडणवीस हे स्वयंभू आणि स्वतंत्र वृत्तीचे अभ्यासू नेते आहेत. त्यांना येणार नाही. त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसू दिलं तर आपल्याला सूत्रे हलवता येणार नाहीत. तेव्हापासून पवार आणि फडणवीस संघर्ष सुरू झाला. पवारांना कोणतंही सरकार स्थापन झालेलं चालणार आहे. पण मुख्यमंत्री त्यांच्या मर्जीतला हवा. फडणवीस त्यांना नकोत. कारण महाराष्ट्रात फडणवीस पवारांना मात देतात, त्यांचं ऐकत नाहीत. म्हणूनच कोणतंही आंदोलन असेल, मोर्चा तेव्हा दोष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न देता एकट्या फडणवीसांना लक्ष्य केलं जातं. यामागचा अर्थ सामान्य जनतेला कळत नाही, असं आघाडीतल्या नेत्यांना वाटतं. पण जनता हुशार आहे. फडणवीसांनी जनतेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. बदलापूर प्रकरणातही त्यांनी आरोपीला पाठीशी न घालता कठोर शिक्षा होईल काळजी घेतली, पुणे पोर्शे अपघातातदेखील उच्चभ्रू गुन्हेगारांना शिक्षा होईल, अशी कारवाई केली. अशी चांगली कामं करणारा नेता महाराष्ट्रात नको, यासाठी मोठा डाव आखला जात आहे. पण काही केल्या फडणवीसांना मात देता येत नाही. ते मुख्यमंत्री नसले तरी आजही सत्तेत सहभागी आहेत आणि हीच विरोधकांची खरी पोटदुखी आहे. म्हणूनच पवार भिजून अचानक महिलांच्या संरक्षणाची शपथ घेतात तेव्हा मनात धडकी भरते. फडणवीसांना पाडण्यासाठी पुढे काय काय होणार आहे, याचा विचार करून मन सुन्न होतं. ही विधानसभेची निवडणूक एक महत्त्वाची परीक्षा असणार आहे. महाराष्ट्रात पवार जिंकतात की फडणवीस यावरून महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाला गती मिळणार आहे. पवार हे प्रचंड अनुभवी, ज्येष्ठ नेते तेल लावलेला पैलवान आहे. पण फडणवीस यांची बाजू सत्याची आहे. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करीत आहेत.