किती मुली अशा जिवानिशी जाणार?

04 Aug 2024 14:25:00
- सायली शिगवण
 
 
Love and attraction : देशामध्ये मुली खरेच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गैरसमज, कमी होत चाललेली संवेदनशीलता अशा बर्‍याचशा कारणांमुळे मुली/महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आजकाल बर्‍याच मुली उच्च शिक्षणासाठी परगावी जातात. तिकडे जाऊन स्वत:चे ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगतात. संबंधित शहराशी ओळख करून घेत असतानाच इतर ओळखी होतात. त्यातून मैत्री वाढते. याच मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात किंवा एकतर्फी होते आणि इथेच सगळा घोळ होतो. काही अपवाद वगळता हे प्रेम फार दिवस टिकत नाही आणि त्यातूनच अत्याचाराच्या मन हेलावून टाकणार्‍या घटना समोर येतात. कारण नकार पचवण्याची क्षमता गमावून बसलेली क्रूर वृत्ती या प्रेमाचा फडशा पाडते. यातूनच पुरुषप्रधान संस्कृतीला खतपाणी घातले जात आहे का, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आहे म्हणून मी सगळे हक्क गाजवू शकतो, ही मानसिकता वाढत आहे. परंतु, मुलींनाही हक्क, अधिकार आहेत या मुद्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि कायदा हातात घेऊन नाहक बळी घेण्यासही ही वृत्ती कचरत नाही. या सगळ्याचे मूळ म्हणजे वाढत चाललेली असंवेदनशीलता. याला आळा घालायचा असेल तर नकार पचवायला शिकवणे महत्त्वाचे वाटते. अजूनही आपण नकार शिकवण्याबद्दल बोलत असू तर ते फार दुर्दैवी आहे. कारण अशा घटनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.
 
 
Love
 
Love and attraction काही दिवसांपूर्वी एका निष्पाप तरुणीचा भर रस्त्यामध्ये खून करण्यात आला. संशयावरून ही घटना घडल्याचे समोर आले. पण अशा वेळी रस्त्यावरून ये-जा करणार्‍या लोकांमध्ये थोडी तरी संवेदनशीलता आहे का, असा प्रश्न पडतो. सर्व गदारोळामध्ये आपण समाज म्हणून कुठे कमी पडतोय का, हा विचार प्रत्येकाने करायला हवा. या घटनांची पृष्ठभूमी अनेकदा घरच्यांना, मित्रमैत्रिणींना किंवा जवळ राहणार्‍या लोकांना माहीत असते. परिणामी संबंधित मुलीलाच घरी बसवले जाते. तिला बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली जाते. परंतु, या समस्येविरोधी वेळीच सविस्तर माहिती घेऊन पावले उचलली अनेक निष्पाप जीव सुरक्षित राहतील. त्यामुळे अशा प्रसंगी मुलीलाच खडे बोल सुनावण्यापेक्षा तिच्या पाठीशी उभे राहिल्यास अनेक निष्पाप जीव सुरक्षित राहू शकतील. याच बरोबरीने पोलिस व्यवस्थेवरचा नागरिकांचा विश्वास हाही मुद्दा ऐरणीवर आहे. अशा घटनांची वेळीच नोंद घेतली जात नाही, हे पोलिस यंत्रणेचे अपयश म्हणायला हवे. काहीही चूक नसताना केवळ एखाद्या मुलीचा बळी गेल्यानंतरच यंत्रणा खडबडून जागी होते. समाजामध्ये त्या घटनेची धग असेपर्यंतच आरोपीचा तपास केला जातो. परंतु, त्याचा पाठपुरावा केला जात नाही. हत्येनंतर आरोपी मोकाट फिरत असतो आणि पुन्हा अशा घटनेची पुनरुक्ती झाली तरी यंत्रणा चाकोरीबाहेर जात ठोस पावले उचलत नाही. समाज, पोलिस यंत्रणा, न्यायव्यवस्था या सर्वांनी मिळून गुन्हेगारी प्रतिबंधासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण गुन्हा घडून गेल्यावर तो का घडला, कसा घडला यावर चर्चा करून फायदा होत नाही. मात्र हे विचारमंथन घडत नाही आणि घृणास्पद खुनाखुनीची पुनरुक्ती घडत राहते.
 
 
अशा घटनांच्या मुळाशी असणारा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरजातीय विवाह. देश अगणित पातळ्यांवर पुढे जातोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले जात आहेत. परंतु, समाजाचा एक हिस्सा मात्र त्याच पुरोगामी विचारांमध्ये अडकून पडला आहे. आंतरजातीय विवाहातून होणारी हिंसा हा जणू दैनंदिन जगण्यातील एक भाग म्हणून स्वीकारल्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. दोन व्यक्ती एकमेकांवरील प्रेमाखातर एकत्र राहायचा निर्णय घेतात. परंतु, जात-धर्म या पातळ्यांवर त्यांचे प्रेम निष्फळ ठरते. नात्याला जातीचे लेबल लावले जाते. कारण लोक ‘सैराट’च्या प्रिन्ससारख्या मानसिकतेतून अजून अडकून पडले आहेत आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे हे म्हणूनच समजून घेणे आवश्यक आहे. अलिकडेच उच्च जातीच्या मुलीने एका खालच्या जातीच्या मुलाबरोबर लग्न केले, म्हणून मुलीच्या वडिलांनी त्या मुलाचा खून केला. अशा प्रकरणांमध्ये आपल्या जवळच्या माणसाच्या खून करून काय मिळविले, असा प्रश्न पडतो. अशी प्रकरणे वारंवार समोर येत असतात. परंतु, या प्रकरणांना आळा बसेल, अशी कोणतीच पावले उचलली जात नाहीत.
 
 
Love and attraction आंतरजातीय लग्नाच्या रागातून झालेल्या हिंसक घटना आपण तपासून बघितल्या तर उच्च-कनिष्ठ वर्गवारी आणि त्यामुळे घरात कोणी आंतरजातीय विवाह केला तर आपल्या घराण्याचे नाक कापले गेल्याची आढळते. त्यामागे मुलीला आपली संपत्ती मानण्याची खोलवर दडलेली प्रवृत्तीदेखील आहे. आंतरजातीय विवाहातून होणार्‍या हत्यांचे सूक्ष्म निरीक्षण केले तर लक्षात येईल की, असा विवाह करणारी मुलगी उच्च जातीतील असेल तर या हिंसाचाराची तीव्रता जास्त असते. घराण्याची कथित इभ्रत वाचवण्याची बुरसटलेली मानसिकता यामागे दिसून येते. अशा हिंसेमध्ये खास करून वडील, चुलते, मोठ्या प्रमाणात सहभागी असतात. आपल्या बहिणीवरील किंवा मुलीवरील त्यांचे प्रेम यावेळी कुठे जाते, असा एक प्रश्न निर्माण होतो. ‘सैराट’मधील प्रिन्सच्या मानसिकतेशी समांतर मानसिकता असणारे तरुण हे अचानक निर्माण होत नसतात. अनेक पिढ्या अंगात मुरलेला जातीचा वृथा अभिमान आणि पुरुषप्रधानता यातून ते जन्माला येत असतात. अगदी टोकाचे मतभेद झाले तर वाटा वेगळ्या करून स्वतंत्र आयुष्य जगण्याचादेखील पर्याय असतो. अशा स्थितीत केवळ मतभेद आहेत म्हणून किंवा आपल्या कुळाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली म्हणून दुसर्‍या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार कोणालाही असू शकत नाही. मात्र, आंतरजातीय विवाह केला म्हणून घरातील व्यक्तींपैकी कोणाची तरी मानसिकता खून करण्यापर्यंत जाते आहे, हे कुटुंबातील बाकी व्यक्तींना अजिबात नसते यावर विश्वास ठेवणे अवघड आहे.
 
 
Love and attraction प्रेम आणि आकर्षणापुढे जाऊन जोडीदाराची निवड, त्याविषयी मुलांना असलेला अधिकार तसेच आंतरजातीय विवाह याविषयी प्रत्येक कुटुंबात चर्चा सुरू होणे खूप महत्त्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये तरुणींना सहकार्य करू शकलो तर उत्तमच, पण ते न जमल्यास त्यांना आपले आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा असलेला अधिकार तरी मान्य हवा. अशा वेळी आपल्या जवळच्या परिसरातील कोणी हिंसक कृती करण्याचा विचार करत असेल तर त्यामध्ये कृतिशील हस्तक्षेप करून गुन्हा घडण्याआधी ही कृती थांबवली पाहिजे. आंतरजातीय विवाहांच्या पृष्ठभूमीवर आपण गांभीर्याने विचार करून पाऊल उचलू शकलो तरच भविष्यात अनेक जीव वाचवण्यात यशस्वी होऊ असे वाटते.
 
 
Love and attraction या सर्व घडामोडींमधून लक्षात येते की, मानसिकता बदलण्याचे धडे लहानपणापासून दिले गेले पाहिजेत. हिंसेला प्रवृत्त होणार्‍या मुलांना सभोवतालच्या जगातूनच बाळकडू मिळत असते, त्या संदर्भात कानावर पडणारे आई-वडिलांचे आणि इतरांचे भाष्य यांचे संस्कार त्यांच्यावर कळत-नकळत होत असतात. त्यामुळे लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून घरात चर्चिल्या जाणार्‍या गप्पा-गोष्टी काय स्वरूपाच्या असल्या पाहिजेत, याकडे लक्ष द्यायला हवे. कारण लहानपणापासूनच आणि मुलगी यांच्यामध्ये होत असलेला भेदभाव, अवघडलेपणा या गोष्टी तरुण होत असलेला घरातला मुलगा शिकत गेल्यास त्याचे काय परिणाम होतात, हे आपण बघतच आहोत. आपली जात, आपले लोक, आपला धर्म यापलीकडेही जग असते, याची जाणीव लहानपणापासून रुजवली गेली पाहिजे. परिणामी मूळ शिक्षणामध्येच या सर्व मूल्यांचा समावेश करायला हवा. अन्यथा म्हणून आपण प्रगतीऐवजी अधोगतीकडे वाटचाल करतोय का, असा प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही. त्यामुळे या पुढील काळामध्ये मुलांमध्ये उच्च-नीचतेपलीकडे जाणारी, माणसाचे माणूसपण- त्याचे अधिकार मान्य करणारी जीवनमूल्ये रुजवणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे काम अवघ्या समाजालाच करावे लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0