अमेरिकेच्या मातीच्या कणाकणांत शेक्सपिअर

    दिनांक :01-Sep-2024
Total Views |
विश्वसंचार
William Shakespeare : तुम्ही पु. ल. देशपांड्यांचा ‘वार्‍यावरची वरात’ हा फर्मास पाहिलाय का? असे दचकू नका. मी बरोबर शब्द वापरलाय. ‘वार्‍यावरची वरात’ हा तमाशाच आहे. हल्ली ‘तमाशा’ हा शब्द उगीचच बदनाम झालाय. तमाशा म्हणजे पाचकळ, द्वयर्थी विनोद आणि उत्तान शृंगारिक नाच, लावण्या यांनी मंचावर घातलेला धुडगूस, असे जे रूप त्याला प्राप्त झाले आहे, त्याला मराठी चित्रपट मुख्यत: कारणीभूत आहेत. मुळातला किंवा नाटकाचा तमाशा हे एक अतिशय समकालीन, प्रवाही, रसरशीत असे लोकनाट्य होते. समकालीन घटनांवरचा अतिशय खुसखुशीत विनोद आणि त्याचा जोडीला नृत्य-नाट्य-गीत आणि संगीत यांची बहारदार मेजवानी, असे या लोकनाट्याचे सैलसर रूप असायचे. सुरुवातीच्या अर्ध्या भागात गण, गौळण, बतावणी, रंगबाणीचा फार्स अशा छोट्या-छोट्या नाटिका किंवा सध्याच्या ‘हास्यजत्रा’ भाषेत ‘स्किटस्’ असायची. अर्ध्या भागात वग म्हणजे एक सलग कथा उलगडून सांगणारे नाटक असायचे. तमाशाच्या फडाचा प्रमुख ज्याला सरदार किंवा नाईक असे म्हणत, तोच या नाटकाच्या तमाशाचा निर्माता, दिग्दर्शक, लेखक सर्व काही असे.
 
 
william-shakespeare
 
आता हा फॉर्म्युला ‘वार्‍यावरची वरात’ला लावून पहा. उत्तरार्धात ‘एका रविवारच्या कहाणी’मधून चाळमालक बापूसाहेब आणि त्यांच्या घरात गाणी-बजावणी करण्यासाठी जमलेले चाळीतले एकापेक्षा एक भारी नमुने यांनी विनोद आणि नाट्यसंगीताची बहार उडवून दिलेली आहे. तर, पूर्वार्धात गरुडछाप तपकिरीची फिरता विक्रेता, महाराष्ट्रगीत, दारू म्हणजे मादक पेय हा शाळकरी मुलांचा संवाद इत्यादी नाटुकल्यांमधून समाजातला अनेक समकालीन घटनांच्या, व्यक्तींच्या, प्रवृत्तींच्या फर्मास फिरक्या घेण्यात आल्या आहेत. यातलेच एक नाटुकले एका शाळेत घडते आहे. मंचावर म्हणून साहित्यिक पु. ल. देशपांडे विराजमान झाले आहेत. भाषणात दर एका वाक्याला चार शिव्या हासडणारा शाळेचा मुख्याध्यापक, ‘बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे आणि आजचे आमचे हे नुसतेच देशपांडे’ असा उल्लेख करीत सगळ्यांचाच निकाल लावतो. मग शाळेच्या आश्रयदात्या आणि गावातल्या महिला मंडळाच्या अध्यक्ष सौभाग्यवती गुणवंताबाई बेचरदास शाह यांचे भाषण होते. त्या ‘आम्ही सारख्या एका फॉरेनहून दुसर्‍या फॉरेनला फिरत असतो. नुकताच आम्ही अमेरिकेच्या फॉरेनला जाऊन आलो. तिथे आम्ही शेक्सपिअरचे थडगे पाहिले.’ इथे पु. ल. म्हणतात, ‘अहो, शेक्सपिअरचे थडगे इंग्लंडमध्ये आहे.’ एखाद्या मच्छराचे हाताने निवारण करावे तसे अध्यक्षपदावरच्या पु. लं. ना झटकून टाकीत गुणवंताबाई म्हणतात, ‘आम्ही या-या डोळ्यांनी पाहिले. शेक्सपिअरचे थडगे अमेरिकेत अमेरिकेच्या मातीच्या कणाकणांत शेक्सपिअर आहे.’
 
 
William Shakespeare : महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या शाळा, शिक्षक, विद्यार्थी, महिला मंडळे, त्यांची राजकारणे या सगळ्यांची अतिशय भेदक आणि कदाचित म्हणूनच अत्यंत मनोरंजक अशी खिल्ली या नाटुकल्यात उडवण्यात आलेली आहे. शेक्सपिअर खरोखरच अमेरिकेच्या मातीच्या कणाकणांत आहे. निदान असावा, अशी अमेरिकेच्या म्हणजे आधुनिक अमेरिकन राष्ट्राच्या ‘फाऊंडिंग फादर्स’ची इच्छा होती, एमिली फोल्गर हिनेच म्हटले आहे. कोण होती ही एमिली फोल्गर? एका फॉरेनहून दुसर्‍या फॉरेनला जाणारी कुणी गुणवंताबाई बेचरदास शाह नव्हती. स्टँडर्ड ऑईल या जगद्विख्यात तेल कंपनीचा अध्यक्ष हेन्री क्ले फोल्गर याची विद्वान, साहित्यप्रेमी आणि दानशूर पत्नी होती.
 
 
ओ खर्डेघासे पत्रकार स्तंभलेखक, काय भंकस लावलीय राव तुम्ही? पु. ल. देशपांडे तमाशा काय. शेक्सपिअर काय, अमेरिकेचे फाऊंडिंग फादर्स काय, नेमके सांगताय तरी काय तुम्ही आम्हाला? का गोविंदाला दह्यादुधाऐवजी भलताच कोणता द्रवपदार्थ पोटात ढकललाय?
 
 
थांबा, थांबा; प्रिय वाचक, असे एकदम एकेरीवर येऊ नका. सगळे काही तुम्हाला अगदी बयाजवार म्हणजे क्रमाने सांगतो. सन १७७५ साली अमेरिकेतले १३ प्रांत किंवा संस्थाने एकत्र आली त्यांनी आपला मूळ मायदेश जो इंग्लंड त्याच्याविरुद्ध बंड पुकारले. हेच ते प्रसिद्ध अमेरिकन क्रांतियुद्ध. या युद्धाच्या नेत्यांना युरोपातल्या गलिच्छ राजकारणाचा अगदी वीट आला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या नव्या देशाची राज्यघटना लिहीत असताना अनिर्बंध सत्ता आणि सत्ता राबवणार्‍या व्यक्तींची अनिर्बंध सत्तालालसा यांच्यावर शक्य तितके अंकुश लावून सत्ता ही लोककल्याणासाठीच राबवली असे पाहिले. या नेत्यांना ‘फाऊंडिंग फादर्स ऑफ अमेरिका’ असे म्हटले जाते. हे एकंदर १६ जण होते. आज त्यांच्यापैकी फारच प्रसिद्ध असलेले म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलीन, टॉमस जेफरसन, अलेक्झांडर हॅमिल्टन, जॉन अ‍ॅडॅम्स आणि सॅम्युअल अ‍ॅडम्स.
 
 
१७८९ साली ‘अमेरिक संयुक्त संस्थाने’ या स्वतंत्र आणि सार्वभौम लोकशाही राष्ट्राचा जॉर्ज वॉशिंग्टन हा राष्ट्राध्यक्ष बनला. प्रथमपासूनच हे नवे राष्ट्र युरोपीय गुंतागुंतीच्या राजकारणापासून दूर राहून आपली वेगळी वाटचाल करीत राहिले पण सत्तरेक वर्षांतच ते यादवी युद्धाच्या वावटळीत सापडले. आफ्रिकेतल्या काळ्या लोकांना युरोपीय गोर्‍या लोकांनी गुलाम म्हणून राबविण्यासाठी पळवून आणले होते. ही गुलामगिरीची प्रथा चालू ठेवणे हा लोकशाहीची उच्च मूल्ये सांगणार्‍या अमेरिकन राष्ट्रावरचा कलंक त्यावरून यादवी युद्ध पेटले. पण शाबास त्या राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकनची. युद्ध पेटलेले असतानाच त्याने गुलामगिरी रद्द करणारा कायदा संमत करून टाकलासुद्धा. आणि मग रुबाबात युद्ध पण जिंकले. हे सर्व १८६१ ते १८६५ या काळात घडले.
 
 
यानंतर सन १९०० पर्यंतच्या काळात अमेरिकेने संशोधन, विकास, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्व भौतिक क्षेत्रांमध्ये पुढे एकदम मुसंडीच मारली. ऑटोमोबाईल इंजिनचा शोध आणि त्याचे इंधन असणारे तेल यांचा भावी काळात प्रचंड मागणी येणार हे ओळखणारे उद्योजक मुख्यत: अमेरिकन होते. त्यांनी भराभर तेल कंपन्या काढल्या. मोथिल, एक्झॉन, शेव्हरॉन, टेक्साको आता पुढच्या काळात दिगंत गाजलेल्या तेल कंपन्यांनी तेल विहिरी शोधून काढल्या आणि प्रचंड संपत्ती कमावली. यापैकीच होता स्टँडर्ड ऑईल कंपनीचा अध्यक्ष हेन्री क्ले फोल्गर. हा अमेरिकन राज्यघटनेचा एक लेखक बेंजामिन फ्रँकलिन याचा दूरचा नातेवाईक होता. आपला साधारणपणे असा अनुभव असतो की, यशस्वी धंदेवाला माणसाचा वाङ्मय, साहित्य, ग्रंथ यांच्याशी संबंध नसतो. छापलेल्या पुस्तकांपेक्षा नोटा छापण्यात त्याला जास्त स्वारस्य असते. पण हेन्री फोल्गर वेगळा माणूस होता. स्टँडर्ड ताळेबंद तो जितक्या आनंदाने वाचत असे, तितकाच किंबहुना जरा जास्तच आनंदाने तो शेक्सपिअर वाचत असे. त्यामुळेच एमिली जॉर्डन ही हुशार, रसिक वाचक आणि विदुषी स्त्री त्याची पत्नी झाली. दोघांनी मिळून शेक्सपिअरच्या स्वत:च्या पुस्तकांबरोबरच शेक्सपिअरवर लिहिले गेलेले साहित्य जमा करायला सुरुवात केली.
 
 
William Shakespeare : विल्यम शेक्सपिअर हा इंग्लंडच्या वॉरविकशायर परगण्यातल्या स्ट्रटफर्ड-अपॉन-अ‍ॅव्हॉन या सन १५६४ साली जन्मला. साधारण सन १५८५ साली तो लंडनला आला. सन १६१६ साली मृत्यू होईपर्यंत त्याने ३९ नाटके, १५४ सुनीत काव्ये आणि ३ खंडकाव्ये रचली. राणी एलिझाबेथ पहिली हिच्या राजवटीचा हा काळ होता. इंग्लंडची युरोपात एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू होती. नेमक्या या बहाराच्या काळात शेक्सपिअरची अनेक रंगमंचावर आली आणि अतोनात गाजली. नुसते तेवढेच नव्हते. शेक्सपिअरच्या नाटकांमधून, काव्यांमधून मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचे जे सूक्ष्म दर्शन घडत होते ते फारच उच्च दर्जाचे. अभिरुचीचे आणि सार्वकालिक होते. त्यामुळे सर्वसामान्य आणि दर्दी रसिक सगळेच थरारून गेले. शेक्सपिअरच्या समग्र साहित्याची पहिली छापील आवृत्ती त्याच्या मृत्यूनंतर सन १६२३ साली निघाली. तिला म्हणतात फोलिओ.’ असे मानले जाते की, या फस्ट फोलिओ आवृत्तीच्या त्यावेळी फक्त ७५० प्रती छापण्यात आल्या होत्या. आज यापैकी फक्त २३५ प्रती जगभरच्या विविध संग्राहकांकडे आहेत आणि त्यातल्या तब्बल ८२ प्रती हेन्री फोल्गरकडे आहेत. वेगवेगळ्या संग्राहकांकडून त्याने त्या म्हणतील त्या किमतीला खरीदल्या होत्या. सर्वात महाग प्रत त्याने १९०३ साली ४८ ७३२ डॉलर्स (आजचे १० कोटी ७० लक्ष डॉलर्स) देऊन मिळविली होती. या फर्स्ट फोलिओ खेरीज शेक्सपिअरची नि शेक्सपिअरविषयक अशी एकंदर २ लाख ७७ हजार पुस्तके आणि ६० हजार हस्तलिखिते असा हा अतिशय समृद्ध संग्रह आहे.
 
 
१९३० साली हेन्री फोल्गर मरण पावल्यावर १९३२ साली फमिली फोल्गरने ‘फोल्गर शेक्सपिअर लायब्ररी’ अशी वास्तूच उभी केली. कुठे? तर अमेरिकेची राजधानी असणार्‍या वॉशिंग्टन शहरातच अमेरिकन संसद आणि अमेरिकन सर्वोच्च न्यायालय या लोकशाही मूल्य व्यवस्था सुदृढ करणार्‍या विशाल इमारतीच्या कॅपिटॉल हिलवर आहेत. अगदी तिथेच, फोल्गर शेक्सपिअर लायब्ररीच्या स्थापनेच्या वेळी एमिली फोल्गर म्हणाली होती, ‘हा कवी आमचा (म्हणजे अमेरिकेचा) एक महान प्रेरणास्त्रोत आहे. एक असा की, ज्याच्यापासून आम्ही अमेरिकन लोक राष्ट्रीय विचार, श्रद्धा आणि अक्षय आशा मिळवत राही.’ पुढे ती म्हणते, ‘अमेरिकन राज्यघटनेच्या निर्मात्यांनादेखील शेक्सपिअरबद्दल अतीव आदर होता. कारण त्याच्या व्यक्तिरेखांमधील अन्यायी हुकूमशहांमुळे, अनिर्बंध होऊ पाहणार्‍या सत्ताधार्‍यांना व्यवस्थेचे लगाम कसे लावायचे, हे त्यांना (म्हणजे राज्यघटनाकारांना) समजले.
 
 
तर, अशी ही फोल्गर लायब्ररी २०२० पासून नूतनीकरणासाठी होती. ती आता नुकतीच म्हणजे जुलै २०२४ मध्ये पुन्हा सुरू झाली आहे. तब्बल ८० कोटी ५० लक्ष डॉलर्स खर्चून झालेले हे नूतनीकरण अर्थातच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे समृद्ध आहे. ‘फर्स्ट फोलिओ’ आवृत्तीच्या ८२ प्रती हा या लायब्ररीचा सगळ्यात मोठा आकर्षण बिंदू आहे. त्या सर्वांच्या सर्व प्रती सुंदरशा काचेच्या कपाटांमधून मांडलेल्या तुम्ही त्या आभासी पद्धतीने चाळूसुद्धा शकता.
 
 
William Shakespeare : वेळोवेळी विविध युरोपीय किंवा अमेरिकन संशोधकांनी अशी संशोधने जगासमोर मांडलेली आहेत की, विल्यम शेक्सपिअर नावाचा खराखुरा माणूस कधी अस्तित्वातच नव्हता किंवा शेक्सपिअरची म्हणून समजली जाणारी नाटके अन्यच लोकांची आहेत. या लोकांना आपल्या खर्‍या नावाने लोकांपुढे यायचे नव्हते. म्हणून त्यांनी आपली नाटके शेक्सपिअरच्या नावावर यांमध्ये ख्रिस्तोफर मार्लो, ऑक्सफर्डचा सरदार फडवर्ड डि व्हेर इत्यादी बरीच प्रसिद्ध मंडळी होती. फोल्गर ग्रंथालयाने असे संशोधन ग्रंथसुद्धा आवर्जून संग्रही ठेवले आहेत.
 
 
एकंदरीत पु.लं.च्या गुणवंताबाईचा शेक्सपिअर खरोखरच अमेरिकेच्या मातीच्या कणाकणांत मुरलाय. आता पुढे डोनाल्डतात्या ट्रम्प आणि कमळाक्का हॅरिस त्याचे काय करतात बघूया.
 
- मल्हार कृष्ण गोखले
-७२०८५५५४५८
(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक आहेत.)