बीबीसीचा पुन्हा खोडसाळपणा; स्वस्तिकचे नकारात्मक चित्रण

हिंदू प्रतीकांचे विकृतीकरण सुरूच

    दिनांक :13-Sep-2024
Total Views |
Swastika symbol : हिंदू धार्मिक प्रतीकांना परत अपमानित करण्याचा, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) ने केला आहे. हिंदूंच्या अतिशय प्राचीन अशा ‘स्वस्तिक’ या प्रतीक चिन्हाशी जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि त्याच्या नाझी पक्षाशी संबंध जोडणारा लेख अलिकडेच बीबीसीने प्रकाशित आहे. ‘हिटलरने स्वस्तिक चिन्ह का निवडले? ‘त्याचा हिंदू धर्माशी काय संबंध?’ या शीर्षकाअंतर्गत ५ सप्टेंबर २०२४ रोजी हा लेख प्रकाशित झाला असून हिंदू परंपरांचा अविभाज्य अंग असलेले पवित्र स्वस्तिक आणि द्वेष व नरसंहाराशी संबंधित नाझी चिन्ह यांच्यात ओढूनताणून संबंध दाखविण्याचा प्रयत्न बीबीसीने या लेखातून केला आहे.
 
 
BBC-1
 
जर्मन आणि संस्कृत ऐतिहासिक आणि भाषिक संबंधांमुळेच नाझी पक्षाने स्वस्तिकचा स्वीकार केल्याचे या लेखात नमूद केले आहे. हिटलरने ‘स्वस्तिक’ हे आपल्या नाझी पक्षाचे चिन्ह म्हणून स्वीकारण्याचे मुख्य कारण म्हणजे जर्मन भाषा आणि संस्कृतमधील समानता आहे, असे या लेखात म्हटले आहे. लेखात १९व्या शतकातील ट्रॉयच्या उत्खननादरम्यान मातीच्या भांड्यांवर जवळपास १,८०० स्वस्तिक चिन्हे सापडल्याचा देखील देण्यात आला आहे. ही स्वस्तिक चिन्हे म्हणजे प्राचीन आर्य संस्कृती आणि नाझींच्या वांशिक विचारसरणीमधील दुवा आहे, असे अकलेचे तारे या लेखात तोडण्यात आले आहेत. ऑस्ट्रियातील बेनेडिक्टाईन मठात अ‍ॅडॉल्फ हिटलरने आपला बालपणीचा काही काळ घालवला असल्यामुळे त्याने स्वस्तिकची निवड केली होती, असाही त्रोटक उल्लेख या लेखात करण्यात आला आहे.
 
 
दिशाभूल करणारे कथन
Swastika symbol : ‘स्वस्तिक’ हे चिन्ह नाझींनी स्वीकारले होते या एकमेव मुद्यावर या लेखात भर देण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हिंदू संस्कृतीत ‘स्वस्तिक’ चिन्हाचे असलेले सखोल व अधिक प्राचीन महत्त्व या मुद्याकडे लेखात दुर्लक्ष करण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्वस्तिक हे केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर बौद्ध आणि पंथातही एक पवित्र प्रतीक मानण्यात आले असून ते शांतता, समृद्धी आणि कल्याण दर्शवते. २० व्या शतकात नाझींनी याचा गैरवापर केला असला तरी हे हे चिन्ह हजारो वर्षांपूर्वीचे आहे व त्याचा नाझी पक्षाशी व हिटलरशी सुतराम संबंध नाही, या वास्तवाकडे या लेखात साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे.
 
 
हिंदू विधी, अनुष्ठान रीति-रिवाजांमध्ये स्वस्तिकचा वापर सर्वव्यापी आहे; शुभ आणि सौभाग्याला आमंत्रण देण्यासाठी स्वस्तिक देवघरात, तुळशी वृंदावनाजवळ, द्वार आणि पवित्र स्थानांवर रेखाटले जाते. शुभ, मंगल व पवित्र चिन्ह म्हणून कोट्यवधी हिंदूंच्या मनात स्वस्तिकला आदराचे स्थान आहे. मात्र, या सगळ्या सांस्कृतिक तसेच श्रद्धेशी संबंधित मुद्यांकडे साफ दुर्लक्ष करून ‘हे चिन्ह नाझींनी स्वीकारले व या एकमेव मुद्यावर लक्ष केंद्रित करून हिंदू धर्म आणि नाझी विचारसरणी यांच्यातील थेट संबंध सूचित करण्याचा खोडसाळपणा करून बीबीसीने आपली बौद्धिक व वैचारिक दिवाळखोरी दाखवून दिली आहे. बीबीसीच्या या लेखामुळे जागतिक स्तरावर हिंदू समुदायांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. हिंदूंचा धार्मिक वारसा कलंकित करण्याचा आणखी एक प्रयत्न या दृष्टिकोनातून या लेखाकडे पहात आहेत. त्याचप्रमाणे, हिंदू धर्म, परंपरा, संस्कृतीविषयी तसेच त्यांच्या रीति-रिवाजांविषयी कुठलेही तथ्य, वस्तुस्थिती जाणून न घेता, सुयोग्य संदर्भ ग्रंथ न तपासता, कसलेही पुरावे न देता पक्षपाती वृत्तांकन करण्याचा आरोप बीबीसीवर करण्यात आला आहे. विशेषत: हिंदू रीतिरिवाज आणि हिंदू अल्पसंख्यकांचा समावेश असलेल्या वर्तमान घटनांचे चित्रण करताना बीबीसीने हे वृत्तांकन केल्याचा आरोप होत आहे. अलीकडेच बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांची, त्यांच्यावरील अत्याचारांची तीव्रता कमी करणारे वृत्तांकन बीबीसीने केले होते. धर्माने केवळ हिंदू आहेत म्हणून बांगलादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवर देशभरात विविध ठिकाणी अत्याचार झाले. मात्र, बीबीसीने या हिंसक घटनांची नोंद घेतली नाही. उलट जे वृत्तांकन केले ते पक्षपाती स्वरूपाचे, एकांगी होते.
 

Hindu-Swastik-1 
 
स्वस्तिक काय?
Swastika symbol : स्वस्तिक हे शुभ चिन्ह आहे. ते हिंदू धर्म तसेच जैन आणि बौद्ध पंथात अत्यंत पूजनीय असे प्रतीक आहे. प्राचीन काळापासून मांगल्याचे प्रतीक म्हणून भारतीयांनी या चिन्हाकडे पाहिले आहे. भारताप्रमाणेच भारताबाहेरही स्वस्तिक या चिन्हाचा वापर झालेला दिसतो. प्राचीन भारतातील वेदपूर्व सिंधू संस्कृतीतही स्वस्तिक आढळते. मोहेंजोदडो येथे सापडलेल्या मुद्रांवर आणि स्वस्तिक रेखाटलेले आढळते. पुढे वेदकालापासून आजतागायत एक पवित्र चिन्ह म्हणून मंदिरांच्या भिंतींवर ते कोरलेले दिसते. घरांच्या भिंतींवर ते रंगविलेले दिसते. तसेच घरासमोर रांगोळी काढतानाही स्वस्तिकाकृती काढली जाते. स्वस्तिक हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील असून ‘सु’ आणि ‘अस्ति’ पासून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे. ‘सु’ म्हणजे चांगले किंवा कल्याण असा होतो आणि ‘अस्ति’ म्हणजे असणे. याचा एकत्रितपणे विचार करायचा झाल्यास स्वस्तिक हे मांगल्य, शुभ, कल्याणकारक प्रतीक आहे. एक उभी रेषा आणि त्या रेषेवर तिच्याइतक्याच लांबीची एक आडवी रेषा काढली की क्रॉसची आकृती तयार होते. या क्रॉसची सर्व टोके काटकोनात वळवली, की स्वस्तिक बनते. भारतीय परंपरेत स्वस्तिकाची रेखाकृती तयार करण्यापूर्वी उभी रेषा आणि तिच्यावर काढलेली आडवी रेषा यांना विशिष्ट अर्थ दिलेले आहेत. उभी रेषा हे ज्योतिर्लिंगाचे प्रतीक होय. ज्योतिर्लिंग हे मूळ विश्वोेत्पत्तीचे कारण मानले आहे, तर आडवी रेषा ही सृष्टीचा विस्तार दाखविते. काही अभ्यासकांच्या मते स्वस्तिक हे जिवंत ज्वालेच्या स्वरूपातील पवित्र अग्नीचे प्रतिनिधित्व करते. या पवित्र चिन्हाचा विविध सांस्कृतिक धार्मिक संदर्भांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. जसे की लेखा पुस्तके, पवित्र ग्रंथ, दुकाने, वाहने, गृहप्रवेश, मुलांचे नामकरण विधी आणि विवाहसोहळ्यासारखे प्रसंग. या धार्मिक समारंभ आणि विवाहादरम्यान, प्रतीक चिन्ह रेखाटताना ‘स्वस्तिक मंत्रा’चा जप केला जातो. आरोग्य आणि समृद्धीसाठी वरुण, इंद्र, सूर्य, गुरू आणि गरुड या देवतांकडून आशीर्वाद प्राप्त होतो. हिंदू परंपरांमध्ये शांतता, आरोग्य आणि सार्वभौम कल्याणासाठी प्रार्थनेचे प्रतीक म्हणून स्वस्तिकचे खूप महत्त्व आहे.
 
 
सोयीचे वृत्तांकन आणि चुकीचे सादरीकरण
‘बांगलादेशातील मुस्लिमांच्या हिंदूंवरील हल्ल्यांंबाबत उजव्या विचारसरणीचे लोक खोटे दावे पसरवतात’ या लेखात बीबीसीने हिंदूंविरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आणि भीती निर्माण आरोप भारतीय नेटिझन्सवर, विशेषत: हिंदुत्ववाद्यांवर केला आहे. हिंसाचाराच्या बातम्या हिंदू संघटनांनी अतिरंजित स्वरूपात प्रसारित केल्या असे या लेखात म्हटले आहे. हे हल्ले राजकीय तणावामुळे, राजकीय कारणांमुळे झाले धार्मिक वैमनस्यामुळे नाही. सत्ताधारी अवामी लीग पक्षाला लक्ष्य करण्यात आले होते. या पक्षात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायाचे लोक आहेत, असेही लेखात नमूद केले आहे. मात्र, बीबीसीचा हा लेख विपर्यास करणारा तसेच लोकांचा बुद्धिभेद करणारा असल्याची टीका समीक्षकांनी केली आहे. हे हल्ले जर केवळ राजकीय स्वरूपाचे असते तर हिंदूंच्या घरांना व मंदिरांना जसे लक्ष्य करण्यात आले तसेच मुस्लिम प्रार्थनास्थळांना देखील लक्ष्य केले गेले असते. मात्र, तसे झाले नाही. केवळ हिंदूंना व त्यांच्या मंदिरांनाच लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे बीबीसीच्या युक्तिवाद अतिशय पोकळ, तकलादू व तर्कविसंगत आहे, अशी सडकून टीका समीक्षकांनी केली आहे.
 
 
पक्षपाताचा एक सुसंगत नमुना
Swastika symbol : हिंसाचाराच्या वेळी मुस्लिमांनी हिंदू मंदिरांचे रक्षण केल्याच्या उदाहरणांवर बीबीसीच्या लेखात भर देण्यात आला आहे. मात्र, अशास्वरूपाचे उल्लेख म्हणजे सांप्रदायिक सौहार्दाचे नॅरेटिव्ह रचण्याचा प्रयत्न असल्याची टीका समीक्षकांनी केली आहे. मात्र, जिहादी मुस्लिमांनी अनेक अल्पसंख्यक हिंदूंची कत्तल केली, महिला व मुलींवर अत्याचार केले, याविषयी बीबीसीच्या लेखात काडीचाही उल्लेख नाही, या विसंगतीकडेही समीक्षकांनी लक्ष वेधले आहे. बांगलादेशातील घटनांची निवडक व सोयीस्कर उदाहरणे देऊन खर्‍या जिहादी गुन्हेगारांच्या काळ्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न असल्याचेही समीक्षकांनी म्हटले आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार व त्यांच्यावरील हल्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक कारणे दुर्लक्षित करून बीबीसी एक अपूर्ण आणि संभाव्य दिशाभूल करणारे नॅरेटिव्ह तयार करीत आहे, असेही समीक्षकांनी म्हटले आहे. हिंदूंच्या धार्मिक भावनांची उपेक्षा केल्याचा आरोप बीबीसीवर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अलिकडच्या वर्षांत अशी अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यात बीबीसीने आपल्या विविध लेखात हिंदू धर्म, संस्कृती, रीति-रिवाजांबाबत त्यांच्यापुढील आव्हानांबाबत एकांगी व पक्षपाती दृष्टिकोन अंगीकारला आहे. स्वस्तिक विषयावर नुकताच प्रकाशित झालेला लेख हा याच साखळीची एक कडी असल्याचे मानले जाते. खासकरून हिंदू चिन्हे, प्रतीके यांचे वारंवार नकारात्मक चित्रण करण्यात येते व त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व दुर्लक्षित केले जाते किंवा त्यांची उपेक्षा केली जाते. बीबीसीचे अलीकडील लेख सोयीस्कर वृत्तांकनाचा एक व्यापक नमुना दर्शवितो जो हिंदू संस्कृती आणि रीति-रिवाजांना कमी लेखतो, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. स्वस्तिक सारख्या हिंदू प्रतीकांची वारंवार उदाहरणे देऊन किंवा त्यांना नकारात्मक ऐतिहासिक घटनांशी जोडून बीबीसीसारखी माध्यमे हिंदू धर्माच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारशाबद्दल जागतिक समुदायाची दिशाभूल करणारे नॅरेटिव्ह रचत आहे, असेही समीक्षकांचे निरीक्षण आहे.
 
(ऑर्गनायझरवरून साभार)