चीनचे भारताविरुद्ध कॉग्निटिव्ह वॉर फेअर

15 Sep 2024 05:50:00
राष्ट्ररक्षा
विश्लेषण भाग-१
कॉग्निटिव्ह वॉर फेअर वापरून तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण
China Cognitive Warfare : अमेरिका आणि मित्रराष्ट्रे तैवानची लढण्याची क्षमता वाढवत आहे. ही क्षमता आता एवढी वाढली की, चीनने तैवानवर समुद्रातून हल्ला करून तैवानवर कब्जा करण्याची शक्यता कमी होत आहे. चीनने तैवानवर हल्ला केला तर, त्यांना लढाईत खूप रक्त सांडावे लागेल, ज्याकरिता चिनी जनता कधीही तयार होणार नाही.
 
 
Cognitive Warfare
 
म्हणून आता चीन वेगळ्या प्रकारच्या युद्ध पद्धतीने तैवानवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एक पद्धत आहे कॉग्निटिव्ह फेअर आजच्या युद्धक्षेत्रात, शस्त्रास्त्रांपेक्षा मनावर हल्ले करणारी शस्त्रे अधिक प्रभावी ठरत आहेत. या युद्धात, माहिती, विचार आणि भावना यांचा वापर करून समाजातील लोकांच्या विश्वासांवर, निर्णयांवर आणि कृतींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामध्ये एआयसारखे तंत्रज्ञान वापरून शत्रुराष्ट्राच्या मनावर कब्जा करायचा, ज्यामुळे ते असे निर्णय घेतील की जे चीनच्या बाजूने म्हणजेच तैवानच्या मनावर विजय मिळवून युद्ध न करता तैवानचे चीनमध्ये विलीनीकरण करायचे.
 
 
कॉग्निटिव्ह वॉर फेअर
चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचा वापर करून २०३० पर्यंत जगातली महाशक्ती बनायचा प्रयत्न करत आहे. या कॉग्निटिव्ह युद्धामध्ये चीन त्यांचे मिलिटरी आणि सिव्हिल दोन्ही क्षेत्रांचा वापर करून ही लढाई जिंकणार आहे. याचा वापर युद्धभूमीच्या क्षेत्रामध्ये केला जाईल, ज्यामध्ये इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, अनमॅन्ड वेपन्स आणि डिजिजन मेकिंग क्षेत्रे असतील. कॉग्निटिव्ह वॉर फेअरचा वापर करून चीन आधुनिक पद्धतीने लढाई लढेल.
China Cognitive Warfare कॉग्निटिव्ह वॉर फेअर ही एक महत्त्वाची युद्ध पद्धती म्हणून पुढे येत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी याचा वापर लॅण्ड वॉर फेअर, मेरिटाईम वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेशल वॉरफेअर वापर करणार आहे.
 
 
प्रचंड प्रमाणामध्ये शत्रुराष्ट्रांचा डेटा गोळा करायचा
हे युद्ध लढण्याकरिता चीन प्रचंड प्रमाणामध्ये शत्रुराष्ट्रांची माहिती, नेतृत्वाची पर्सनल इन्फॉर्मेशन, इतर डेटा हा साम, दंड, भेद याचा वापर करून गोळा करत आहे. नंतर डेटा मायनिंग केले जाईल. आणि मग त्यांचे विश्लेषण करून, नेमके कसे युद्ध लढायचे, हे ठरवले जाईल. अमेरिकेचा डेटा मोठ्या प्रमाणामध्ये गोळा केला आहे. २०१५ मध्ये अमेरिकेला कळले की, त्यांच्या सरकारची वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती चोरीला गेली आहे आणि हे केवळ एकदाच झाले असे नाही, अनेक वेळा अमेरिकेच्या सरकारची माहिती चोरण्यात आली. आता ही माहिती एक शस्त्र (weaponization of data) म्हणून चीन येणार्‍या काळामध्ये वापरू शकेल.
 
 
वापर आपल्या सैनिकांवरसुद्धा
China Cognitive Warfare : चीन कॉग्निटिव्ह वॉर फेअरचा वापर आपल्या सैनिकांवरसुद्धा करत आहे. चीन संशोधन करत आहे की त्यांचे सैनिक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशाप्रकारे वागतात/काम करतात. म्हणून चीन पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या मनगटावर स्मार्ट सेन्सर ब्रेसलेट लावून महत्त्वाच्या सैनिकी नेतृत्वाची माहिती गोळा करत राहील म्हणजे त्यांचे हावभाव, मानसिकता, मन:स्थिती वगैरे. यामुळे त्या सैनिकांचे पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स युद्ध परिस्थितीमध्ये कळतील. ज्यामुळे योग्य सैनिक, योग्य कामाकरिता वापरणे हे चीनला सोपे जाईल. कारण लढाईचे सर्वात महत्त्वाचे तत्त्व असते राईट मॅन, अ‍ॅट राईट प्लेस, अ‍ॅट राईट टाईम.
हे कॉग्निटिव्ह वॉर फेअर किती यशस्वी होईल? सर्वांत महत्त्वाचे की तुम्ही कशाप्रकारे अल्गोरिदम तयार करता, जे माहितीचे विश्लेषण तुम्हाला मिळालेली माहिती ही कुठल्या दर्जाची आहे? कारण चांगली माहिती गोळा केली तर तुम्हाला चांगले विश्लेषण करता येईल.
 
 
विश्लेषण करून उपाययोजना
आज चीन प्रचंड प्रमाणामध्ये कॉग्निटिव्ह वॉर फेअरचा वापर तैवान आणि हाँगकाँगच्या विरोधात करत आहे. हाँगकाँग आणि तैवान ही एक प्रयोगशाळा आहे, जिथे चीन कॉग्निटिव्ह वॉर फेअर वापरत आहे, कॉग्निटिव्ह वॉर फेअरचा वापर चीन अमेरिका आणि युरोपच्या विरोधात सुद्धा करत आहे. याचा अभ्यास करून भारताने, चीन ही युद्ध पद्धती भारताविरुद्ध कशी वापरेल किंवा वापरत आहे याचे विश्लेषण करून उपाययोजना करायला पाहिजे.
 
 
चीन भारताविरुद्ध कॉग्निटिव्ह युद्धाचा वापर कसा करत आहे
चीन भारताविरुद्ध कॉग्निटिव्ह युद्ध (Cognitive Warfare) तंत्राचा वापर अत्यंत पद्धतीने करत आहे. या तंत्राचा उद्देश भारत सरकारची, जनतेची, मानसिकता बदलणे, त्यांना गोंधळात टाकणे हा आहे. चीन या युद्ध तंत्रामध्ये माहिती, प्रचार, मनोवैज्ञानिक तंत्रे, आणि सायबर ऑपरेशन्सचा समावेश करून भारताच्या धोरणांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या कॉग्निटिव्ह युद्धाच्या धोरणांमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे खाली दिले आहेत -
माहितीचे शस्त्रीकरण
(Weaponization of Information)
चीन भारताच्याविरुद्ध माहिती युद्ध (Information Warfare) तंत्राचा वापर करत आहे. भारताच्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जातो. चीन खोटी माहिती, प्रपोगंडा आणि खोट्या बातम्या पसरवून भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतो. जनमत बदलून चीन भारतीय समाजाचा देशावरील विश्वास कमी करण्याचे तंत्र वापरतो. काही भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर यांनी विधान केले होते की, चीन भारताकरिता एक मोठी समस्या आहे. या विधानावर ९ सप्टेंबरला चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने अग्रलेख लिहिला. डॉ. जयशंकर यांचे चीनच्या विरोधातील परराष्ट्र धोरण हे भारताकरिता धोकादायक आहे. त्याचा परिणाम भारताच्या राष्ट्रीय हितावर होईल. हे धोरण अनेक भारतीयांना मान्य नाही, पूर्ण असत्य आहे. म्हणजेच ग्लोबल टाईम्स भारत सरकारमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे.
 
 
सायबर हल्ले आणि तंत्रज्ञान चोरणे
China Cognitive Warfare : चीन सायबर हल्ल्यांद्वारे भारताच्या सरकारी, सैनिकी आणि आर्थिक संस्थांवर हल्ला करून गुप्त माहिती गोळा करत आहे. सायबर हल्ल्यांमुळे भारताच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो आणि त्यांच्या निर्णयक्षमतेला गोंधळात टाकले जाते. तंत्रज्ञान चोरणे हे कॉग्निटिव्ह युद्धाचे महत्त्वाचे अंग आहे, ज्याद्वारे चीन भारताच्या विकास धोरणांवर थेट परिणाम करतो.
 
 
मनोवैज्ञानिक ऑपरेशन्स
(Psychological Operations)
चीन भारतीय राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर परिणाम करण्यासाठी मनोवैज्ञानिक ऑपरेशन्सचा वापर करतो. चीनच्या प्रचारयंत्रणा भारताच्या समाजातील वांशिक, धार्मिक आणि सामाजिक संघर्षांना जसे की माओवादाला चालना देत आहे. अशाप्रकारे, भारतात अंतर्गत संघर्ष आणि निर्माण करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे.
 
 
संस्कृतीचे प्रभावशाली शस्त्र म्हणून वापर
चीन सॉफ्ट पॉवर धोरणाचा वापर करून भारतीय विचारांवर परिणाम करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या सांस्कृतिक संस्थांचे (जसे की Confucius Institutes) माध्यमातून, चीन भारताच्या शैक्षणिक संस्था आणि विचारसरणींवर प्रभाव टाकतो.
 
 
प्रपोगंडा आणि माध्यमांवर नियंत्रण
चीन आपल्या प्रपोगंडा मशीनचा वापर भारताच्या करत आहे. चीन आपले राष्ट्रहित सुरक्षित ठेवण्यासाठी जागतिक माध्यमांवर नियंत्रण ठेवतो आणि त्याद्वारे भारताच्याविरुद्ध चांगली आणि प्रभावी कथा मांडण्याचा प्रयत्न करतो. माध्यमांद्वारे चीनची बाजू अधिक सकारात्मक आणि भारताच्याची नकारात्मक दाखवली जाते.
 
 
वैज्ञानिक सहकार्य आणि डेटा चोरी
China Cognitive Warfare : चीन भारताच्याच्या वैज्ञानिक समुदायाशी सहकार्य वाढवून गुप्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संस्थांचा गोपनीय डेटा चोरणे, तंत्रज्ञान हस्तगत करणे आणि भारताच्या धोरणात्मक योजना धोक्यात आणणे यांचा समावेश होतो. चीनचे कॉग्निटिव्ह युद्ध धोरण हे भारतीय संस्थांवर, समाजावर आणि निर्णयक्षमतेवर एक व्यापक हल्ला आहे, ज्याचा उद्देश भारताला चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येऊ द्यायचे नाही. चीन प्रचंड वेगाने या विषयावर काम करत आहे आणि सुद्धा कॉग्निटिव्ह वॉर फेअर या क्षेत्रात संशोधन करून आपली लढण्याची क्षमता वाढवली पाहिजे. याकरिता आपल्याला आपले शास्त्रज्ञ, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर आणि सगळ्यांच्या ज्ञानाचा वापर करून या क्षेत्रामध्ये प्रगती करावी लागेल. लेखाच्या पुढच्या भागांमध्ये हे युद्ध जिंकण्याकरिता भारताने नेमके काय करायला पाहिजे, यावर आपण चर्चा करू.
(लेखक संरक्षणविषयक तज्ज्ञ
- ब्रिगेडियर हेमंत महाजन
- ९०९६७०१२५३
Powered By Sangraha 9.0