फुटीच्या उंबरठ्यावर पाकिस्तान

    दिनांक :15-Sep-2024
Total Views |
- आरिफ शेख
Pakistan : बलुचिस्तान गेल्या दोन दशकांपासून हिंसक बंडखोरीच्या विळख्यात आहे. बलुचिस्तानच्या प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चौकात शाहबाज शरीफ यांच्या राजवटीच्या विरोधात आवाज उठवला जात आहे. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या लोकांनी आधीच पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारापासून मुक्तीसाठी बंदुका हाती घेतल्या आहेत. आता या पुन्हा एकदा रक्तरंजित रूप धारण केले आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा अर्थ पाकिस्तानचे विघटन निश्चित आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे आता तुकडे होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो. बलुचिस्तान पाकिस्तानच्या तावडीतून बाहेर पडून स्वातंत्र्याचा श्वास घेऊ शकेल का? अलिकडेच ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’(बीएलए) ने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये २३ गोळ्या झाडून हत्या केली. ‘बीएलए’ फुटीरतावाद्यांनी लोकांना बसमधून उतरवले. त्यांची ओळखपत्रे पाहिली आणि पंजाब प्रांतातील किती लोक आहेत हे तपासले. त्यानंतर त्यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. धर्म आणि जातीच्या आधारावर प्रदीर्घ काळ पेटलेल्या पाकिस्तानमधील बलुचींनी शस्त्रे उचलून रक्तरंजित युद्धाचा नवा अध्याय सुरू केला आहे. पाकिस्तानमधील बहुतेक नैसर्गिक सिंध आणि बलुचिस्तानच्या भागात आहेत; पण केंद्र सरकारकडून देशातील पैसा, सुविधा आणि राजकारणावर पंजाब प्रांताचे सर्वाधिक नियंत्रण आहे. याविरोधात बलोच आणि सिंध प्रांतात अनेक दिवसांपासून लढा सुरू आहे; मात्र आता हा संघर्ष रक्तरंजित झाला आहे. पाकिस्तानमध्ये दररोज गोळीबार होत आहे. लोकांचे रक्त सांडत आहे. पाकिस्तानचे तुकडे तुकडे झाल्याचा प्रतिध्वनी प्रांतात रोज ऐकू येत आहे.
 
 
baluchistan
 
Pakistan : पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, बलुचिस्तान प्रांतात बंदुकीच्या ढिगार्‍यावर उभ्या असलेल्या ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने हिंसेचा मार्ग पत्करला आहे. दरम्यान, बलुचिस्तानमधील राराशम भागात सशस्त्र लोकांनी आंतरराज्य महामार्ग अडवला. सशस्त्र लोकांनी १० हून अधिक वाहनांनाही आग लावली. रक्तरंजित युद्धांचा क्रम जुना आहे. असे रक्तरंजित हल्ले पाकिस्तानच्या विविध प्रांतात दिवसांपासून सुरू आहेत. पाकिस्तानचे अंधकारमय भविष्य आधीच ठरले होते; पण बलुचिस्तानसारख्या या प्रांतात अशा रक्तरंजित बंडाने ‘जिनालँड’चा अंत निश्चित केला आहे. निरपराध लोकांच्या रक्ताने आणि गृहयुद्धाच्या आगीने वेढलेल्या पाकिस्तानला प्रदेश आणि प्रांतांच्या आधारावर रक्तरंजित युद्धांचा मोठा इतिहास आहे. बलुचिस्तानशिवाय पंजाब आणि सिंधमध्येही बंडखोरीची आग पाकिस्तानला भस्मसात करण्यास सज्ज आहे.
 
 
रक्तरंजित संघर्ष हे Pakistan : पाकिस्तानच्या विघटनाच्या दिशेने पहिले पाऊल मानले जात आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, बलुचिस्तानमधील रक्तरंजित हत्याकांडाची ही घटना ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने ‘ऑपरेशन हेअरऑफ’अंतर्गत घडवून आणली. संपूर्ण बलुचिस्तानमध्ये ‘ऑपरेशन हेअरऑफ’ सुरू आहे. ‘बीएलए’च्या दाव्यानुसार कारवाईअंतर्गत ६२ पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी मारले आहेत. ‘बीएलए’ने म्हटले आहे की मारले गेलेले पाकिस्तानी सुरक्षा कर्मचारी वेशभूषेत बसमधून प्रवास करत होते आणि त्यामुळेच त्यांची ओळख पटवून हत्या करण्यात आली. या संघटनेने एक रेल्वे पूलही उडवून दिला. आपला नेता नवाब बुगतीच्या स्मरणार्थ या मंडळींनी हा हल्ला केल्याचे मानले जाते. नवाब बुगतीच्या पुण्यतिथीनिमित्त पाकिस्तान हादरला आहे. परवेझ मुशर्रफ यांच्या काळात नवाब बुगतीची हत्या झाली होती. संपूर्ण बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारविरोधात संताप आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि तेथील तज्ज्ञांचेही मत आहे की पाकिस्तानी सरकारची बलोच नागरिकांविरुद्धची वृत्ती नेहमीच दडपशाहीची राहिली आहे. राजकारणात पंजाब प्रांताचा दबदबा असल्याने बलुचिस्तान आणि सिंधमध्ये बंडाचे वादळ आले आहे. कारण पाकिस्तानमधील नैसर्गिक संसाधने बहुतेक सिंध आणि बलुचिस्तानच्या भागात आहेत; पण पाकिस्तानची सरकारे पंजाब प्रांताला जास्तीत निधी, सवलती आणि सुविधा देतात. पाकिस्तानच्या राजकारणातही पंजाब प्रांताचे वर्चस्व राहिले आहे.
 
 
Pakistan : या अन्यायामुळे बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात बर्‍याच दिवसांपासून पाकिस्तानी राज्यकर्त्यांविरुद्ध बंडाचा बिगुल वाजत आहे आणि रक्तरंजित चकमकी होत आहेत. बंडखोरी, दहशतवाद आणि शत्रूंनी पाकिस्तान वेढला आहे. पाकिस्तान बलुचिस्तानमधील चीनच्या प्रकल्पांमुळे येथील लोकही प्रचंड संतापले आहेत. याबाबत अनेक हिंसक निदर्शनेच नव्हे, तर हत्याही झाल्या आहेत. पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती इतकी बिकट आहे की त्याच्या विघटनाबद्दल शंका नाही. खुद्द पाकिस्तानीही ‘जिनालँड’ गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे असे मानतात. पाकिस्तान पूर्णपणे बंडखोरी, दहशतवाद आणि शत्रुंनी वेढलेला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांमुळेच देशांतर्गत बंडखोरी आणि गृहयुद्धाच्या धोक्याला बळ मिळाले आहे, असे तज्ज्ञांचे मत पाकिस्तानातील सिंध प्रदेशालाही बलोच आणि पश्तूनप्रमाणे पाकिस्तानपासून वेगळे व्हायचे आहे. बलुचिस्तानप्रमाणेच सिंध हाही पाकिस्तानचा प्रांत आहे. त्यालाही पाकिस्तानच्या क्रूर राज्यकर्त्यांपासून दीर्घकाळ सुटका हवी आहे. सिंधमध्ये जवळपास पाच दशकांपासून स्वातंत्र्याचा नारा घुमत आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे सैन्य बंदुकींनी हे आवाज शांत करत होते; पण आता हा आवाज उघडपणे जगापर्यंत पोहोचत आहे.
 
 
Pakistan : हा पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत प्रांत आहे. पाकिस्तानचे ७० टक्के उत्पन्न सिंधमधून येते; मात्र त्यावर सिंधींचा अधिकार नाही. आर्थिक संकट, अन्नधान्याचे संकट आणि वीजसंकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानमध्ये सुरक्षेचेही मोठे संकट आहे. १९७१ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांगलादेश) गमावणारा पाकिस्तान पुन्हा एकदा विघटनाच्या मार्गावर आहे. तिथल्या नेत्यांच्या वक्तव्यातून आणि परिस्थितीवरून संकेत मिळत आहेत. गेल्या महिन्यात पाकिस्तानी खासदार मोहसीन दावर म्हणाले की दहशतवाद्यांनी उत्तर वझिरीस्तानमधील अनेक भाग ताब्यात घेतले आहेत. मुद्दा असा आहे की आम्ही अजूनही वस्तुस्थिती मान्य करण्यास नकार देत आहोत; जणू काही झालेच नाही. पाकच्या गृहमंत्र्यांनी सुमारे १० हजार दहशतवादी कार्यरत असल्याची कबुली दिली. एवढेच नाही, तर डिसेंबर मध्ये पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी स्वतः कबूल केले होते की खैबर पख्तूनख्वा प्रांतात सात ते दहा हजार दहशतवादी आहेत. टीटीपी ही संघटना आज पाकिस्तानसाठी मोठा धोका बनली आहे. ती पाकिस्तानवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित करत आहे. ‘टीटीपी’ने पाकिस्तानमध्ये आपले सरकार जाहीर केले. त्यांनी आपले मंत्रिमंडळही केले आहे. ज्यातील विविध लोकांना संरक्षण, राजकीय व्यवहार, आर्थिक व्यवहार, शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे प्रतिकात्मक पाऊल असले तरी पाकिस्तानसाठी खुले आव्हानही आहे. गिलगिट बाल्टिस्तानमध्येही पाकिस्तानविरोधात असंतोष आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. त्यातही स्वातंत्र्याची मागणी केली जात आहे. येथे आंदोलक रस्ता करा, कारगिल रस्ता खुला करा अशा घोषणा देत आहेत. आंदोलक गिलगिट, बाल्टिस्तान आणि लडाखला जोडणारा रस्ता खुला करण्याची मागणी करत आहेत. काही रिपोर्टसमध्ये असा दावा करण्यात आला आहे की येथील लोकांना लडाखमध्ये राहणार्‍या बाल्टी समुदायाच्या लोकांशी पुन्हा संपर्क साधायचा आहे. त्यातच चीनच्या ‘सीपीईसी’ (चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर)ला स्थानिकांचा विरोध आहे. संपत्ती लुटून चीन या प्रांताचा फायदा घेत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तिथे चिनी नागरिक आणि अधिकार्‍यांवर हल्ले होत आहेत. पाकिस्तानचे तुकडे होणे भारतालाही परवडणारे नाही. आशिया खंडातील भूतान वगळता एकही देश भारताच्या बाजूने नाही. त्यातच पाकिस्तानचे आणखी देश झाले, तर भारताची सीमा आणखी असुरक्षित होण्याचा धोका आहे. बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात मदत केली; परंतु तोच बांगलादेश भारताची डोकेदुखी ठरतो. या पृष्ठभूमीवर पाकिस्तानमध्ये मजबूत लोकशाही आणि चांगले सरकार असणे भारताच्या हिताचे आहे.