शुद्ध बीजा पोटी, फळे रसाळ गोमटी!

    दिनांक :15-Sep-2024
Total Views |
संत प्रबोधन
Saint Awakening : संतांनी त्यांच्या अभंगवाङ्मयात सर्व मनुष्यमात्रांना जो आचारसंहितेचा, कर्तव्याचा उपदेश केला आहे, तो आजही लक्षात घेण्यासारखा आहे. मनुष्यमात्रांनी वेदविहित धर्माचरण करावे, हे सर्व कर्तव्याचे मुख्य सूत्र आहे. त्यासोबतच कुणी कोणती कर्तव्ये कशा प्रकारे करावीत, याची आचारसंहिता संत अभंगवाङ्मयातून सविस्तर वर्णन करतात.
ब्रह्महचारी धर्म घोकावें अक्षर |
आश्रमी विचार षटकर्मे ॥
वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग |
संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥
परमहंस तरी जाणे सहज वर्म |
तेथे याती धर्म कुळ नाही ॥
बोले वर्म जो चाले या विरहित |
तो जाणा पतित श्रुति बोले ॥
तुका कांही नाही नेमाविण |
 
 
sant-tukaram
 
मोकळा तो सीण दुःख पावे ॥ (तु. गा.१४७९)
१) ब्रह्मचार्‍याने ब्रह्मचर्याश्रमात वेदाक्षरे घोकावीत. पाठांतर करावे. वेद जाणावा.
२) गृहस्थाश्रमात षट्कर्मसंपन्न असावे.
३) वानप्रस्थाश्रमात परिग्रहात राहूनही वनात किंवा गावात अपरिग्रह वृत्तीने राहावे.
४) संन्याशाने अहमतेचा त्याग करावा.
५) परमहंसाला मात्र विधीचे बंधन नाही.
याप्रमाणे चार आश्रमांची सांगितली आहेत. चार वर्ण एकाच हरीपासून झालेले आहेत, असेही ते सांगतात.
चारी वर्ण झाले एकाचिये अंगी |
पाप पुण्य भागी विभागिले (तु.गा.१४६)
एकाच हरीपासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र निर्माण झाले आहेत. संत तुकारामांनी सांगितलेला कर्तव्योपदेश, असा आहे, प्रत्येकाने सत्याचे आचरण करावे. भूतमात्राविषयी दया असावी. विषयासक्त नसावे. काम, क्रोध, यांचा त्याग करावा. संतसंगती धरावी. परोपकार करावा. सेवकाने स्वामिनिष्ठ सेवा करावी. सैनिकाने राजनिष्ठ असावे. पतिव्रतेने पतीची शुश्रूषा करावी. पुत्राने मातापित्यांची सेवा करावी. मुमुक्षूने गुरूची सेवा करावी. गायत्री, कन्या, गाय, हरिकथा यांचा विक्रय करू नये. एकादशी, सोमवार उपवास करावा व हरिनाम घ्यावे.
 
 
Saint Awakening : अशा प्रकारचा कर्तव्योपदेश सर्वकाळात आदर्श ठरणारा, सर्व काळात पडणारा, सर्वांचे कल्याण साधणारा त्यांनी आचरावयास सांगितला आहे. या कर्तव्योपदेशाचे पालन करणार्‍या व्यक्ती नेहमी समाधानी जीवन जगताना दिसतात. त्याच्याकडे कदाचित भौतिक सुख नसेल, परंतु त्यांच्याकडे असणारे आत्मिक समाधान इतरांकडे आढळणार नाही. त्याचा आचारधर्म समाजासाठी एक आदर्श असतो. उदाहरणार्थ- संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांनी सांगितलेला वारकरी पंथाचा उपदेश आजही महाराष्ट्रातील लाखो पाळताना दिसतात. त्यासाठी संत तुकारामांनी आपल्या अभंगगाथेत समाजातील सर्वांनाच जातिनिरपेक्ष, वयनिरपेक्ष, लिंगनिरपेक्ष आवाहन केले आहे. जसे -
या रे या रे लहान थोर | याति भलत्या नारी नर ॥
करावा विचार | न लगे चिंता कोणासी ॥
(तु.गा.५१९)
स्पर्शाने नव्हे, तर संकुचित विचारांनी विटाळ
अस्पृश्यांचा स्पर्श काही उच्चवर्णीय लोक परंतु, संत तुकाराम महाराज म्हणतात, विटाळ अस्पृश्यांच्या स्पर्शामध्ये नाही तर, तसे मानणार्‍या विचारांमध्ये आहे. जसे ज्याचे विचार असतील तशी त्याची जात ठरते. समत्वाचा, समब्रह्माचा विचार ते मांडतात. माणसामाणसातील समतेचा, सदाचाराचा, मांगल्याचा विचार मनात असेल तर, त्याची जात उच्च ठरते. इतरांना हीन लेखणारा, विषमता मानणारा असेल तर त्याची जात हलकी अधिकाराच्या बाबतीत संत तुकारामांनी विशद केलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. भागवत धर्माचा आचारधर्म पाळणारा सांप्रदायिक कसा असावा. त्याची आचारसंहिता संत तुकाराम पुढील अभंगातून सांगतात -
सदा सर्वकाळ अंतरी कुटिल |
तेणे गळा माळ घालू नये ॥
ज्यासी नाही दया क्षमा शांति |
तेणे अंगी विभूती लावू नये ॥
जयासी कळे भक्तीचे महिमान |
तेणे ब्रह्मज्ञान बोलो नये ॥
ज्याचे मन नाही लागले हातासी |
तेणे प्रपंचाशी टाकू नये ॥
तुका म्हणे ज्यासी नाही हरिभक्ती
तेणे भगवे हाती धरू नये ॥
(तु.गा.२७७९)
 
 
Saint Awakening : नित्य आणि नैमित्तिक कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा न करता विधिपूर्वक त्याचे आचरण आवश्यक आहे. स्वर्ग वा वैकुंठामध्ये नाही, असे सुख पृथ्वीवरच भगवंताच्या नामस्मरणाने, हरिनामामुळे मिळू शकते. ते भगवतनाम, हरिनाम घेण्याचा अधिकार पृथ्वीतलावरील सर्व मनुष्यमात्राला आहे. ब्राह्मण, वैश्य, क्षुद्र, चांडाळ, मुले, कुलीन स्त्रिया यांनाच नव्हे तर, गणिकांनाही आहे. सर्व वर्णांच्या लोकांनी तृप्ती मिळवावी. परिस ज्याप्रमाणे लोखंडाचे गुणदोष न पाहता त्याचा उद्धार करतो. त्याचप्रमाणे ईश्वर सर्वांचा उद्धार करतो.
घेतलेली ही भूमिका सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. वैदिक परंपरेने क्षुद्रांची अनेक बाजूंनी कोंडी केली होती. नाना तर्‍हांनी त्यांना हिणवले होते. ज्याच्यामुळे प्रतिष्ठेचे व सुखाचे जीवन जगता येईल, अशा सर्व गोष्टींची दारे त्यांच्यासाठी बंद केली होती. अशा गोष्टींचा अधिकार त्यांना नाही. अशा प्रकारचे असंख्य नियम त्यांच्यासाठी बनविण्यात आले होते. वैदिक ज्यांना ज्यांना अधिकार नाकारला होता, त्यांना अधिकार असल्याचे संत तुकारामांनी निर्धाराने सांगगितले.
त्यांनी कोणत्याही उच्चवर्णीयांचा अधिकार न नाकारता क्षुद्रासंह सर्व वर्णांच्या लोकांना अधिकार असल्याचे सांगितले. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना अधिकार देताना स्त्रियांमधील अतिशय हीन समजल्या मानल्या जाणार्‍या वेश्या व्यवसायातील स्त्रियांनाही अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हणूनच वारकरी संप्रदायात सर्वच जाती धर्मांचे आणि संत आपणास पाहावयास मिळतात. जसे गोरा कुंभार, सावता माळी, तुकाराम कुणबी, चोखा महार, सजन कसाई, संत कबीर, दासी जनाबाई, वेश्या असणारी कान्होपात्रा. संत ज्ञानेश्वरांनीही त्यांच्या मताला पुष्टी दिली आहे-
म्हणौनि कूळ जाति वर्ण | हे आघवेचि गा अकारण ॥
एथ अर्जुना माझेपण | सार्थक एक ॥
(ज्ञानेश्वरी ९/४५६)
 
 
शुद्ध | फळे रसाळ गोमटी
संत तुकारामांनी आपल्या अभंगगाथेत आपल्या आचरणाशी संबंधित असंख्य अभंग मांडलेले आहेत. प्रस्तुतच्या अभंगात आपले कर्तव्य जेवढे शुद्ध असेल तेवढे त्याचे फळ गोड असते, असे संत तुकाराम महाराज सांगतात
शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी ॥
मुखी अमृताची वाणी | देह वेचावा कारणी ॥
सर्वांगी निर्मळ चित्त जैसे गंगाजळ ॥
तुका म्हणे जाती | ताप दर्शने विश्रांती ॥
(तु.गा.६२)
Saint Awakening : संत तुकाराम म्हणतात, ज्याचे बीजच शुद्ध आहे, अशा बीजातून निर्माण होणारे प्रत्येक नवीन रोपटे हे अतिशय शुद्ध असणार आहे. त्याची फळेसुद्धा खूप रसाळ असतील. त्याचप्रमाणे ज्याच्या मुखामध्ये अमृतासारखी रसाळ वाणी आहे, ज्याचा देह निर्मळ आहे व देवाच्या कारणी सेवेत आहे, जो पुरुष सर्व अंगांनी पवित्र आहे व ज्याचे चित्त गंगाजलाप्रमाणे निर्मळ आहे, अशा सात्त्विक पुरुषाच्या दर्शनाने त्रिविध ताप जातात व जीवाला विश्रांती प्राप्त होते.
 
 
परद्रव्य - परनारी हा खरा विटाळ
संत तुकारामांनी सोवळ्या-ओवळ्याच्या व भेदभावाच्या संकल्पनेला मूठमाती दिली आहे. तथापि अशा प्रकारची भूमिका स्वीकारायचीच असल्यास एका महत्त्वाच्या विचाराने ती विशद केली आहे. ती म्हणजे, परद्रव्य व परनारी यांचा संग हाच खरा विटाळ होय. यापासून जो स्वतःला अलिप्त ठेवतो तोच खरा सोवळा व शुद्ध होय, अशी परखड भूमिका त्यांनी घेतलेली आहे.
 
- प्रा. डॉ. हरिदास आखरे
- ७५८८५६६४००